ईश्वराचे मंगेशकरी देणे

 

 

*ईश्वराचे मंगेशकरी देणे

- हेमंत सांबरे 

 

माणसाचे पोट भरायला अन्नाची गरज लागते . अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. तसेच मला वाटते की *संगीताशिवाय* आपण जगू शकत नाही . आपण जन्मल्यापासून ही संगीताची साथ आपल्याला सुरू होते ती थेट मरेपर्यंत सुरूच राहते . आपण उठतो , बसतो , चालतो , पळतो जे जे काही करतो त्या प्रत्येक वेळी संगीत आपल्या आजूबाजूला वाजत असते आणि आपले जगणे पुढे पुढे जात राहते . आपण आपले कान कायम उघडे ठेवले तर आपल्या आजूबाजूला *निसर्ग* ही हे *नादमधुर* संगीत कायम वाजवीत असतो . पक्षी मधुर गातात , नदी वाहताना खळखळ वाहत  गाते , पाऊस पडताना टपटप आवाज करतो  अशी कितीतरी प्रकारे निसर्ग ही आपल्याला संगीताच्या जवळ नेऊन जीवनाचा आनंद वाटत असतो , फक्त हे *संगीतसौंदर्य* टिपण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे  हवा

 

मा *दिनांनाथ मंगेशकर* म्हणजे मराठी नाट्यसंगीत विश्वातील एक *हिमालय* पर्वत ! त्यांना जिवंतपणी गाताना ज्यांनी बघितले, ऐकले , अनुभवले  ते खूप भाग्यवान ! अशा या संगीतसम्राटाला उणेपूरे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले . पण देवाने त्यांच्या ओंजळीत पाच मुलांच्या रूपाने असे काही अदभुत वरदान  टाकले होते की , कदाचित त्यांना ही त्यावेळी कदाचित   त्याची कल्पना आली नसेल! तशी येणे शक्यही नव्हते कारण तो काळ फार कठीण होता . पुढे हे वैभव पाहायला दिनांनाथ अल्पायुषी ठरल्याने राहिले नाहीत . एकाच घराण्याला देवाने इतके भरभरून दिले , मंगेशकर भावंडांनी ही हातचे काही राखून ठेवता ते इतके पुढे *वाटले* की ते मिळाल्याने किती कोटी कोटी   जीवने समृद्ध होऊन गेली.

 

वाचकहो , होय मी आज आपणासी या *मंगेशकर* *भावंडाबद्दल* बोलणार आहे ..तुम्हीही मान्य कराल की आपले  कानविश्व  आपले भावविश्व मंगेशकरांचे *ऋण* मान्य केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही त्यांच्याशिवाय आपले संगीत जीवन कसे पूर्ण होऊ शकेल ? हा विषय माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता , पण मी विचार करत होतो की मी संगीत या विषयातला काही फार मोठा जाणकार नाहीमग कसे लिहुमग परत काही दिवसांनी मनात विचार आला की एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे वाटते ते का लिहू नये ? हा विचार पक्का झाल्यावरच मी लेखणी हातात घेतली लिहू लागलो . प्रिय वाचकहो ! आशा आहे हे तुम्हांस आवडेल .

 

आपल्यातील बहुतेकांना चांगले संगीत म्हणजे काय खरेच कळते का ? शास्त्रीय संगीत म्हणजे तर दूर दूर पर्यंत त्याचा की  ठो  मला खरेच कळत नाही .  ' राग ' म्हणजे चिडल्यावर जो येतो तोच तो ' राग ' इतके तर आमचे knowledge 😂 . अशा वेळी या संगीताचा आनंद माझ्यासारख्याने घ्यायचा तरी कसा कुठेपण  कदाचित सकाळी झोपेतून उठल्यावर विविध भारतीवर अभंगवाणी मध्ये  , '  रुणु झुनू   रुणु झुनू रे  भ्रमरा ' हे लता दीदी च्या आवाजात गाणे  वाजू लागते आणि नकळत मी ही ते गुणगुणत माझी दिवसाची कामे सुरू करतो . मग दिवसभर हाच सिलसिला सुरू राहतो . कितीतरी चित्रपटांची मग ती हिंदी असो वा मराठी माझ्या आजूबाजूला दिवसभर वाजत राहतात ...त्यात मग कधी धीरगंभीर लताखोडकर आशा  ,  दादा कोंडकेच् चित्रपटगीते  गाणारी खट्याळ उषा , ' तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी' , असे म्हणत प्रेमगीत गाणारा हृदयनाथ ...म्हणजे ही भावंडे गाताना माझ्या दिवसाचा बहुतेक भाग अशा सुमधुर विविध भावनांची तार छेडून टाकतात . फक्त राजे-महाराजे श्रीमंत लोक यांचीच *जहागिरी* ज्या या संगीतावर एकेकाळी होती तेच हे संगीत मंगेशकरांनी तुमच्या-माझ्या साठी  भरभरून वाटले .....

 

 *लतादीदी* म्हणजे काय

बोलावे ? त्यांनी तर प्रत्येक भारतीयांचे *आयुष्य* व्यापून टाकले आहे , त्यांच्या शिवाय ते अपूर्ण आहे . विचार करा दीदींनी जर ठरविले असते की फक्त शास्त्रीय संगीत गायचे तर आपल्यासारख्या सामान्य कान रसिकांचे केव्हडे मोठे नुकसान झाले असते ! लता मंगेशकरांनी सगळ्या प्रकारची गाणी गायली .त्यासाठी त्यांनी कुठलेही बंधन बाळगले नाही , ही तुम्हा आम्हाला किती *भाग्याची गोष्ट* !  त्या फक्त गात गेल्या आणि फक्त  गातच राहिल्या  ! किती सारी हजारो गाणी , अन त्याचे किती रंग अन किती ढंग ! कुठल्या गाण्याचा उल्लेख करावा कुठल्या गाण्याचा करू नये ! ही अशी  किती मोठी आणि अक्षय संपत्ती त्यांनी निर्माण केली . जवळपास गेल्या सात पिढ्या ( एक पिढी किमान दहा वर्षे असे धरले तर ) आणि अजून पुढच्या कित्येक पिढ्या ( सांगता येत नाही ) लता मंगेशकरला ऐकत राहतील . कदाचित *चंद्र* , *सूर्य* , ही *पृथ्वी* आहे तोपर्यंतआज आपण बघतो की कुठलाही गायक/गायिका यांचे करिअर फार फार तर दहा पंधरा वर्ष यापलीकडे जात नाही पण लतादीदी सातत्याने  तब्बल दशके गात राहिल्या .हे वाटते तेव्हडे  सोपे नव्हते . त्यांनी त्यासाठी प्रचंड त्याग केला ..आयुष्यभर गाणे म्हणणे हाच एक ध्यास , हाच त्यांचा श्वास अशा त्या राहिल्या ....आपण  दिदींना बोलताना कधी ऐकले असेलच तर एक निरीक्षण केलेय का ? त्या बोलताना सुद्धा त्यांचा आवाज इतका सुमधुर आहे की विचारू नका ऐकतच राहवेसे वाटते , पण त्या स्वतःबद्दल खूप कमी बोलतातत्यांनी कितीतरी नव्या संगीतकार गायकांना आधार दिला ( सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे एक उदा ) .


मला नेहमीच वाटते की लता मंगेशकर म्हणजे सहजता , लता मंगेशकर म्हणजे नैसर्गिक ! तिथे असे ओढूनताणून असे काहीच नसते ! जसा नदीचा खळाळता प्रवाह , तसे झाडांच्या पानांचे सळसळणे , जसे पक्ष्यांचे गाणे तितकेच नैसर्गिक असते लता *दिदींचे गाणे* ! आणि वर आपण खूप काही केल्याचा *अविर्भाव* ही नाही ! खरे तर त्यांनी हिमालयाची उंची गाठली आहे , पण साधेपणा इतका की लता मंगेशकर म्हणजे  वेगळ्या कुणी वाटतच नाही . दीदी म्हणजे तुमच्या - माझ्या कुटुंबातीलच एक राहतात . तर हा साधेपणा ही अंगभूतच आहे , जो त्यांना *वारसा* म्हणून मिळाला आहे . तुमच्या माझ्या सारख्या सामान्य ( अशोक सराफ च्या भाषेत  कदाचित , " अतिसामान्य " इति धुमधडाका) लोकांचे आयुष्य *समृद्ध* करण्याचे काम दिदींनी केले आहे . त्यांचे गाणे वगळले तर कदाचित आपल्या भावविश्वात एक शून्य देखील उरत नाही , आणि त्यांचे गाणे ऐकल्याशिवाय एक क्षण ही जाऊ नये असे वाटते .

दीदी आम्हाला खूपच जवळच्या आहेत , म्हणूनच आज त्या नव्वदीच्या जवळपास असतानाही आपण सगळे त्यांना दिदींच म्हणतो बहुतेक एकेरी उल्लेख करतो . लता दीदींनी कुठले गाणे शेवटचे गायले किंवा त्यांचे वय आता किती आहे याने आम्हाला कुठलाही फरक पडत नाही कारण त्यांचा आवाज *चिरतरुण* होता पुढची कदाचित *हजारो वर्षे* तो *चिरतरुणच* राहील ....

 

मंगेशकर भावंडामधील  *आशा* *भोसले* म्हणजे भारतीय संगीतविश्वातील अदभुत *चमत्कारच* आहे ! किती प्रकारची गाणी , अन त्यात ती किती ,किती प्रकारची  विविधता ! एका बाजूला लता मंगेशकर नावाचे मोठे ताकदीचे शिखर भारतीय संगीत जगतात उभे असताना आशा भोसले या नावाने त्याच जगात स्वतःचे असे स्वतंत्र *वलयांकित* विश्व उभे केले ! आशा म्हणजे बंडखोरी ! आशा म्हणजे घोंगावते  वादळ ! आशा म्हणजे आवाजातील नजाकत ! आशा म्हणजे आवाजाचा लहेजा ! आशा म्हणजे आशाच फक्त ! दुसरे कुणी त्या शिखरावर उभे राहूच शकत नाही ! त्या ध्रुवाचे कसे अढळस्थान तसेच नाव म्हणजे आशा भोसले ! आशाताईंनी जे काही केले ते वेगळेच केले . मग ते पी नय्यर बरोबर असो , हृदयनाथ बरोबर असेल वा आर रहमान बरोबर केलेले असेल ! आशाताई सगळ्यात जास्त जर कुठे खुलल्या असतील तर आर डी बर्मन सोबत ! बर्मनदा नी आशाताई कडून खूप उत्तम उत्तम गाणी गाऊन घेतली . अजून एक मुद्दाम सांगावेसे वाटते त्यांनी बाबूजी ( महान गायक संगीतकार सुधीर फडके ) यांच्याबरोबर कित्येक गीते गायली . तो ही मराठी संगीत विश्वातील  अनमोल ठेवा आहे . त्यात माझे सगळ्यात आवडते गीत म्हणजे , " बाई मी विकत घेतला श्याम " ! 

 

आशा भोसले हे नाव तयार होण्यासाठी आशाताईंनी प्रचंड कष्ट घेतले त्यांनी ते करून दाखविले ....त्यांच्यातील जिद्द हा गुण खरेच घेण्यासारखा आहे .. आशाताईंच्या गाणे ऐकण्याचा अनुभव म्हणजे एक जबरदस्त तृप्ती मिळाल्याचा अनुभव असतो .. मन खूप भावनामय होऊन जाते खरोखर भारावून जातो आपण ...आणि हे भारावून जाणे खूपदा वैयक्तिक राहूच शकत नाही  हा असा त्यांचे गाणे ऐकून मिळालेला आनंद भरभरून वाटून द्यावा असे वाटत राहते ...... आपण ते प्रत्यक्षात करतोही ...तुम्ही बघितले असेलच की लता दिदींचे गाणे कितीही उत्तम असले तरी चर्चा होताना आशाताईंच्या गायनाचीच होते ...

 

मंगेशकर हा विषय म्हणजे तसा हा एक स्वतंत्र पुस्तकच  लिहण्याचा विषय आहे , एवढा तो गहन आहे . पण तरीही मी थोडक्यात माझ्या मनातील भावना विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे 🙏..

 

 

आता पुढे जाऊ *उषा मंगेशकर* या नावाकडेउषा म्हणजे लता आशा यांच्या गायनी कलेचा अद्भुत *संगम* वा *मिलाफ* आहे ...त्या दोघींचे ही चांगले चांगले जे काही आहे ते उषाताईनी  बरोबर उचलून परत त्यांस स्वतःच्या वेगळयाच *शैलीत* रसिकांना पेश केले .....खरे तर आशा भोसले लता मंगेशकर यांच्या स्पर्धेत उतरताही  जे काही गाणे उषाताईचे आहे ते अद्वितीय आहे ..... *शब्दांचे उच्चार* ही उषाताईंची भलतीच मोठी ताकद आहे ..माझा तर दावा आहे उषा मंगेशकर ज्या प्रकारे शब्दांचे उच्चार करतात ते त्यांच्या बहिणींनाही कधी जमले नसेलउदाहरणच देतोतुम्ही  , " _*_केळीचे सुकले बाग*_ "_ हे कवी अनिल यांचे गीत मधील , " सुकले " शब्द ऐकायात सु नंतर जो *"*" चा उच्चार उषाताई करतात ते लक्ष देऊन ऐका ! पुढे  शांता शेळके चे , " कान्हू  घेऊन जाय , धेनु घेऊन जाय " मधील कान्हू  धेनु शब्द ऐकाअशी किती उदाहरणे देता येतील ..त्याकाळात गाजलेले आजही प्रसिद्ध असलेले " *मुंगळा* *मुंगळा* "  गाणे आठवा ..काय जबरदस्त गायले आहे उषाताईंनी ! कुठेही पार्टी असो वा लग्नाचा बँड आजही हे गाणे वाजविले जाते हीच त्या गाण्याची ताकद आहे

 त्यांच्या आवाजात जो सहजपणा आहे तो ही आपल्याला मोहवून टाकतो .. सूर जर सारखे वर खाली होत असताना  तर  उषाताई ची त्या गाण्यात विविध रंग भरण्यातील नजाकत शब्दांत वर्णन करणे खरेच कठीण आहे ...कदाचित उषाताई *चित्रकार* देखील आहेत म्हणून गाण्यातही असे *विविध रंग* भरणे त्यांना जमत असावेम्हणजेच  उषाताईंनी गायलेले शब्द हे चित्र बनतात मग जसे  जिवंत होतात आपल्या  डोळ्यासमोर ते अक्षरशः जसेच्या तसे उभे राहतात .. हीच ती ताकद आहे की कदाचित कवी वा गीतकार यांनी जे लिहले ते गाण्याच्या माध्यमातून उषाताई अशा प्रकारे आपल्या समोर उभ्या करतात की आपण स्तिमित होऊन जातो आपण आपले राहतच नाही .....

 

मीना मंगेशकर वा *मीना खडीकर* यांनी तसे खूपच मोजके काम केले आहे ..त्यांची मराठी बालगीते विशेष गाजलेली आहेत ..तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेले , " *सांग सांग भोलानाथ* , पाऊस पडेल काय " , हे मीना खडीकर यांनीच संगीतबद्ध केलेले गाणे ! तसेच वर उल्लेख केलेले शांता शेळके लिखित , " *कान्हू घेऊन जाय* " हे ही मिनाताईंनी संगीत दिलेले गाणे ! खूप मोजके काम करूनही त्यांनी खूप उत्तम गाणी दिली .

 

आता शेवटी मंगेशकर कुटुंबातील सर्वात धाकटे म्हणजे *हृदयनाथ* *मंगेशकर* ! आधुनिक भारतीय संगीत ज्यांच्या उल्लेखाशिवाय  पुढे जाऊच शकत नाही इतके जबरदस्त काम त्यांनी केले आहे . त्यांना घरात सगळ्या बहिणी बाळ म्हणत तेच पुढे बाळासाहेब  म्हणून रूढ झालेमाझ्यासाठी तर ते सगळ्यात आवडते संगीतकार आहेत . *अभिजात संगीत* ऐकायचे असेल तर ते हृदयनाथ मंगेशकर यांचेच ऐकावे ! त्यांनी नुसते संगीत दिले नाही तर  त्यांस त्यांचा खास एक  , ' *मंगेशकरी* ' टच दिला ..वडिलांकडून मिळालेल्या समृद्ध वारशाचे त्यांनी अक्षरशः सोने केलेहृदयनाथानी कित्येक कवींच्या कवितेला सुंदर चाली देऊनआपल्या सारख्या श्रोत्यांचे कान तृप्त केले ...मग ते कवी ग्रेस असतील , सुरेश भट , शांता शेळके , बा बोरकर , कुसुमाग्रज वा सुधीर मोघे असतील ! त्यांच्या संगीतात *दर्जा* *गोडवा* असे हातात हात घेऊन सहजपणे चालतात ...त्यासाठी वेगळी मेहनत अशी त्यात नसतेच  ! तो  काळ असा होता की कुठलाही पिक्चर त्यांच्या संगीतासाठी ओळखला जायचा !   केवळ लता मंगेशकर चे भाऊ म्हणून काम मागायला  ते कधीही गेले नाहीजे केले ते स्वतःला आवडते म्हणूनच केले ..त्यामुळेच त्यांनी केलेले काम एक *वेगळीच उंची* असलेले आहेप्रत्येक गाण्यात त्यांना नेहमी *perfection* हवे असायचे , त्यामुळेच हृदयनाथ  मंगेशकर यांच्याकडे गाणे म्हणजे सोपे नसायचे ! तरीही अनेक दिग्गज गायक-गायिका त्यांच्याकडे गायला उत्सुक असायचे . गीतामधले शब्द कितीही अवघड असले तरी त्याला हृदयनाथांची चाल असेल तर ते अगदी सहज सोप्पे होतात ... काही मोजकी उदाहरणे देतो , ' भय इथले संपत नाही ' , ' तरुण आहे रात्र अजुनी ' जयोस्तुते जयोस्तुते ' , ..हिंदी मध्ये ' लेकिन ' , ' मशाल ' असे मोजकेच पण एकदम भारी गाणे त्यांनी दिले .

जे जे *उस्फुर्त* तेच मी करेन  असे हृदयनाथ कायम म्हणतात  ! संगीत हे त्यांच्या साठी फक्त काम नसून , जे काही नैसर्गिक पणे होईल तेच मी करतो असे ते नेहमी म्हणतात .. म्हणूनच त्यांचे *संगीत अक्षय्य* आहे , चिरकाल टिकणारे आहे ..सर्व वयातील लोकांना ते आवडते ..जी पहिल्यांदा सुचते तीच खरी गाण्याची चाल , बाकी नंतर जे येते ते ओढूनताणून केलेले असे त्यांना वाटते !

 

भारतीय संगीताचा इतिहास जेव्हा केव्हा लिहला जाईल , तेव्हा मंगेशकर कुटुंबिय  त्यात अग्रस्थानी असतीलतसेच आपण सारे कदाचित आयुष्याच्या शेवटी वगैरे आपण जेव्हा खऱ्या आनंदाचा विचार करूतेव्हा ही मंगेशकर भावंडांनी जो आनंद आपल्याला दिलाय तो नक्कीच सगळ्यात मोठा कधीही संपणारा आनंद असेल असे मला वाटते 🙏

 म्हणूनच  आपण भारतीय खूप  नशीबवान आहोत की " *ईश्वराचे* *हे* *मंगेशकरी देणे* " आपल्याला मिळाले आहे . हा ठेवा म्हणजे द्रौपदी ला श्रीकृष्णाकडून मिळालेल्या अक्षय्य पात्रासारखा  आहेज्यातून कितीही घ्या ते कधी संपतच नाही .

 

© हेमंत सांबरे 

१५.०८.२०२०.C

Contact -9922992370.

 


Comments

  1. खूपच छान हेमंत राव

    ReplyDelete
  2. अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
  3. अप्रतिम विश्लेषण सांबरे सर

    ReplyDelete
  4. खूपच भारी लिहिलेत हेमंत

    ReplyDelete
  5. Mojkyach shbdat sundar lekhan mala ya sarwanche anshata sahawas labhala aahe.sambare sir shubeccha 🌹🌹🌹🌹🌹🌹joshi guruji murbad jyotish aabhyasak.

    ReplyDelete
  6. Aapan nagrche mahanje tumi murbad warun jata so aapan maze kade yawe hich ichha.😊

    ReplyDelete
  7. Joshi guruji murbad. 9673531986.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर