#समाजक्रांतिकारक सावरकर
{ या लेखात अनेक नव्या गोष्टींचा उहापोह केला आहे , आपणास नक्की आवडेल याची खात्री आहे }
"सावरकर समजून घेताना "या लेखमालेची सुरुवात मागच्या वर्षी २८ मे ला सावरकर जयंती च्या निमित्ताने झाली . या लेखमालेचा उद्देश वीर सावरकर लोकांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणे व वीर सावरकरांचे *तेजस्वी* व *कालातीत* विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे .या लेखमालेतील पहिल्या लेखाला गेल्या आठ महिन्यांत संपुर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला , अनेकांनी स्वतः फोन करून लेख आवडल्याचे सांगितले , फेसबुक , तसेच माझ्या ब्लॉगवर खूप उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या .यावरून परत एकदा जाणीव झाली की घराघरात सावरकर चरित्र पोहोचणे खरेच गरजेचे आहे .
महापुरुष हे द्रष्टे असतात , काळाच्या पुढे जाऊन ते विचार करतात .वीर सावरकर हे असेच दूरदृष्टी असलेले महान व्यक्तिमत्त्व होते .त्यांना खरेतर जास्त करून एक थोर क्रांतिकारक नेते म्हणून ओळखले जाते ,पण त्यांच्या आत एक *समाजसुधारक* ही होता , ज्याबद्दल जनमानसात फारसी माहिती पुढे आलीच नाही .आपण आज पुरोगामी हा शब्द अनेक वेळा ऐकतो , पण सावरकर खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे पुरोगामी व्यक्ती होते .
मला असे वाटते की अंदमानात असताना त्यांच्यातील हा पैलू बाहेर आला असावा . कारण त्यांचा स्वभावच असा होता की कुठेही असले तरी देशाच्या व लोकांच्या कसे उपयोगी पडता येईल हे बघणे!
या भयंकर कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी जसे राजकीय कैदी ( देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे) , तसेच क्रूर , खुनशी असे दरोडेखोर ही होते .सावरकर बंधू अंदमानात जाण्याआधी हे जेल म्हणजे सतत भांडणे , मारामाऱ्या यांचे आगारच होते .तेथील जेलर चे नाव बारी असे होते .तो अर्धवट शिक्षित असल्याने , त्याची काम करण्याची पद्धत त्याच्या अर्धवट शिक्षणाला अनुसरूनच होती . सावरकर बंधूनी अंदमानात येताच अशिक्षित कैद्यांना शिकवायला सुरुवात केली .अर्थात जेलर बारीचा हे करण्याला विरोध होताच , कारण त्याला असे वाटायचे की हे कैदी शिकल्याने त्याचे जेलमधील वर्चस्व कमी होईल .त्यामुळे हे कार्य सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना लपूनछपून करावे लागे .तरीही सावरकरांनी हे कार्य चालूच ठेवले .अगदी या कैद्यांना क ख ग शिकविणे , आकडेमोड करायला शिकविणे हे ही त्यांनी नेटाने केले .त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसू लागले .तेथील भांडणे वगैरे कमी होऊ लागली .अनेक राजकीय कैदी जे अशिक्षित होते , ते ही सावरकरांच्या सहवासात आल्यावर त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटून ते ही शिकू लागले .या सगळ्यांतून अंदमानात एक नवचैतन्य सळसळू लागले .याच काळात सावरकरांनी अंदमानात गंभीर झालेला धर्मांतराचा मुद्दाही यशस्वीपणे हाताळला .येथे असलेले मुस्लिम अधिकारी हिंदू कैद्यांचे बळजबरीने धर्मांतरण करत .सावरकरांनी याचा प्रखर विरोध केला व त्याला आळा घातला .येथे तुरुंगात असताना ही स्पृश्य-अस्पृश्यता पाळली जात असे , सावरकरांनी स्वतःच्या कृतीतून त्याला थांबविले .जेवणाच्या वेगवेगळ्या पंगती असत .वीर सावरकर स्वतः भंगी-महार आदींच्या पंगतीला जेवायला बसू लागले .त्यातून या कैद्यांमध्ये सावरकरांबद्दल चा आदर प्रचंड वाढला .अजून एक महान कार्य त्यांनी हाती घेतले , ते म्हणजे अंदमानात हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार .सावरकर 1911 साली जेव्हा अंदमानात गेले तेव्हा तेथे उर्दु भाषा सर्रास वापरली जायची , पण सावरकरांनी तेथे जाताच हिंदी भाषेचे महत्त्व समजून सांगायला सुरुवात केले .त्यामुळे जेव्हा सावरकरांची 1921 च्या आसपास सुटका झाली तोपर्यंत तेथे हिंदी ही अंदमानातील मुख्य भाषा झाली होती .अजूनही बरीच थोर कामे त्यांनी अंदमानात राहून केली , पण या लेखाचा उद्देश मर्यादित असल्याने सगळेच सांगणे शक्य नाही .पण वाचकांनी वीर सावरकर लिखित आत्मचरित्र " *माझी* *जन्मठेप* " जरूर वाचावे .हे आत्मचरित्र म्हणजे कठीण काळातही माणसाने धैर्य न गमावता कार्यरत कसे राहावे हे सांगणारे व शिकविणारे महान स्तोत्र आहे .
अंदमानात असतानाच सावरकरांना हिंदूंचे संघटन किती महत्वाचे आहे याची प्रखरपणे जाणीव झाली होती .या संघटना च्या मार्गातील मुख्य अडथळे म्हणजे जातीभेद व अस्पृश्यता हेच आहे हे त्यांनी ठामपणे ओळखले . पुढे अंदमानातुन सावरकर रत्नागिरीला आले .येथे त्यांना स्थानबद्ध केले गेले , म्हंणजेच रत्नागिरी सोडून कुठेही जायला त्यांना बंधन घालण्यात आले .
मग या रत्नांच्या नगरीत सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन यासाठी कंबर कसली . हे कार्य तसे काय इतके सोप्पे होते का ? तर नाही हे काम म्हणजे त्या काळातले अतिशय कठिणहून कठीण असे काम होते .पण वीर सावरकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ यमुनाबाई यांनी हे काम करून दाखविले .हे काम करत असताना तेथील उच्चवर्णीय समाजाने सावरकर कुटुंबावर बहिष्कार टाकला . या काळात जे अतिशय मोठे काम झाले ते म्हणजे " *पतितपावन मंदिराची* " स्थापना ! हे मंदिर म्हणजे त्या काळातील कदाचित *उभ्या* *जगातील* एकमेव असे मंदिर असावे ज्यात सर्व जातीच्या लोकांना मुक्त प्रवेश होता . या मंदिरात महार, भंगी , चांभार , ब्राह्मण , मराठा असे सगळ्या जातीचे लोक एकत्र जाऊन दर्शन घेत .आज हे वाचताना कदाचित आजच्या परिस्थितीत , ' त्यात काय विशेष' असे वाचकांना नक्कीच वाटेल , पण त्या काळात हे घडणे म्हणजे एक *अभूतपूर्व* *क्रांती* होती . तसेच सावरकरांनी रत्नागिरीत जातिजातींची सहभोजने घडवून आणली , त्यामुळे भेदाच्या या भिंती धडाधड कोसळून पडू लागल्या हा सावरकर प्रेरित हा *अभूतपूर्व प्रयोग* बघण्यासाठी पूर्ण हिंदुस्थानातून लोक येऊ लागले .महापुरुष हे असे असतात , ते स्वतः कृतीतून सर्व घडवून आणतात .सावरकरांचे व्यक्तिमत्त्व च असे होते , त्यांना नेहमीच *लोकप्रियतेपेक्षा* *लोकहीत* महत्त्वाचे वाटले , व अवघे आयुष्यच त्यांनी याच तत्वाला पाळले .त्यांनी उगाचच मोठ्या जनसमुदायाला एखादी गोष्ट पटते म्हणून मान डोलवत न बसता जे *योग्य* आहे तेच सांगितले व स्वतःही तेच केले .
सावरकर यांचे अफाट व्यक्तिमत्वाने हळूहळू पूर्ण रत्नागिरीला आपल्याकडे खेचून घेतले .याच काळात सावरकरांच्या प्रयत्नाने पूर्ण कोकणात *५०० पेक्षा* जास्त *विहिरी* अस्पृश्यासाठी खुल्या झाल्या .हे ही खूप मोठे कार्य झाले ,पण याचा उल्लेख फारसा कुठे होत नाही . सौ सावरकर स्वतः सर्व जातीच्या स्रियांकडे हळदी-कुंकू सारखे कार्यक्रम करत व त्यांनाही स्वतःच्या घरी बोलावत .
*आजच्या काळाचा संदर्भ*
आजच्या काळाच्या दृष्टीने विचार केला तर वाचक म्हणतील की , " आज कुठे जातीभेद उरला आहे ? " , " आज या सगळ्या चर्चा करण्याची गरज आहे का?" .तर वाचकहो! होय आजही या गोष्टी तितक्याच relevent ( लागू ) आहेत . आपल्या देशात अजूनही समान नागरी कायदा आला नसल्याने जातीभेद अजूनही तुमच्या-आमच्या मानसिक पातळीवर आहेच आहे ! तसेच आरक्षण हे आर्थिक परिस्थिती वरून मिळाले पाहिजे ( मग तो भारतीय कुठल्याही जातीचा वा धर्माचा असो )जातीयवाद अजूनही मनामनात कसा आहे , याचे मी एक *सर्वोत्तम* उदाहरण देतो .आजही आपण एकमेकांची नव्याने ओळख होते , नाव/ आडनाव विचारले जाते , तेव्हा त्या आडनावावरून लगेच चर्चा होते तो अमक्या तमक्या जातीचा असेल का 🤔 , मग त्यावरून असेही ठरविले जाते की त्या व्यक्तीसमोर काय बोलायचे काय नाही बोलायचे ! ( याचे दुसरे कारण समानता सरकारी पातळीवरून नाही , त्यांचे मतांचे राजकारण चालावे म्हणून) आपण इतिहासातून काहीच शिकत नाही , हे केवढे मोठे दुर्दैव! सावरकर , डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले इ लोकांनी केलेल्या महान त्याग व कामामुळे तसा फरक पडला आहे हे नक्की ,पण जोपर्यंत हा जातीभेद आपल्या मानसिक स्तरावरून नष्ट होत नाही तोपर्यन्त तरी या महान पुरुषांचे कार्य अपूर्णच आहे असे म्हणावें लागेल!
*महापुरुषांचा पराभव !*
आज काय परिस्थिती आहे ? आपण प्रत्येकाने आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत .महात्मा फुले फक्त माळी समाजाचे ! सावरकर, लोकमान्य टिळक , पेशवे आदी फक्त ब्राह्मणांचे !डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त महार वा दलित समाजाचे ! म्हणजे भावाभावात जसे जमिनीच्या वाटण्या होतात, तसे हे सगळे महापुरुष आम्ही वाटून घेतले आहेत . मग यांच्याविषयी कुणी काहीही बोलले की आम्ही लगेच भांडणे , मारामाऱ्या , फेसबुकवर लाथाळ्या इ सुरू करतो .म्हणजे गंमत बघा , जी गोष्ट नको ( जातीभेद ) म्हणून हे सगळे महान लोक प्राणपणाने लढले , आपण बरोबर त्या विचारांच्या विरुध्द वागून त्यांनाच पराभूत करून सोडत आहोत . म्हणजेच जातीभेद नष्ट होण्याऐवजी तो अशा *भयंकर द्वेषाच्या* पातळीवर येऊन थांबला आहे . *बाहेरील शक्ती* तुमच्या-आमच्यात येऊन हे *द्वेषाचे बीज* पेरत आहेत आणि हे आपण सर्वांनी तत्काळ ओळखले पाहिजे .आपली भांडणे झाल्याने कुणाचा फायदा होऊ शकतो हे दूरदृष्टीने समजून घेऊन ह्या भेदाच्या भिंती नव्याने उध्वस्त करायच्या आहेत .
*जातिभेदाचे पाप*
आज एक नवीन ट्रेंड निघाला आहे , तो म्हणजे जातीभेद , अस्पृश्यता याचे पाप एकाच म्हणजे ब्राह्मण समाजाच्या माथी मारणे ! सावरकरांनी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे सोडविला आहे .ज्यांना हे समजून घ्यायचे असेल त्यांनी या विषयावर सावरकरांनी लिहलेले लेख जरूर वाचावे .त्यांनी पुराव्यासाहित सांगितले आहे *जातीभेद* हा प्रत्येक *स्तरावर* होता व आपल्यापेक्षा दुसऱ्या जातीला कमी लेखता यावे म्हणून जवळजवळ प्रत्येक जातीला तो हवासा होता .म्हणजे वरच्या जातीपासून अगदी खालच्या स्तरापर्यंत हा जातीभेद कसोशीने पाळला जात होता .ज्या अस्पृश्याना अस्पृश्य म्हणून मानले ते ही त्यांच्यापेक्षा खालच्या जातीला अस्पृश्य मानत आणि हा एक मोठा दोष होता .म्हणूनच रोटीबेटी चे व्यवहार या प्रत्येक जातीत होत नसत व कदाचित आजही ते होत नाही .
आज आपण सावरकर , आंबेडकर यांना ही जातीपातीच्या राजकारणात अडकवून ठेवत आहोत हे केवढे दुर्दैव ! खरेतर महामानव आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास आपण केला तर ते असे महान व्यक्ती होते की जगातील सगळे विद्वान त्यांच्यापुढे नतमस्तक होतात इतकी त्यांची थोरवी ! सावरकर स्वतः ब्राह्मण होते पण त्यांनी स्वतः जातपात कधीही मानली नाही , आणि आज त्यांच्याकडे केवळ ब्राह्मण म्हणून बघितले जाते , हा केवढा मोठा दैवदुर्विलास! त्यामुळे हे जातिभेदा चे पाप आपल्या प्रत्येकाचे आहे आणि तोपर्यंत धुऊन निघणार नाही , जोपर्यत आपण फक्त एक हिंदू म्हणून संघटित होत नाही .
*पुरोगामी सावरकर*
आज पुरोगामी हा शब्द सर्रास वापरला जातो .पण या शब्दाचा उपयोग फार चुकीच्या पद्धतीने केला जातो .सावरकरांनी जसे हिंदू समाजातील जाती , धर्मभोळेपणा यावर कडक ताशेरे ओढले तसेच त्यांनी मुस्लिम व ख्रिश्चन समाज यातील विविध जातीभेद व त्याची उतरंड यावर ही प्रखरपणे टीका केली .( आजही बरेच लोक असे मानतात की मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात जातीभेद वगैरे नाही , पण हे पुर्णसत्य नाही ) म्हणजेच सगळीकडे समान भूमिकेतून व समान नजरेने बघू शकणारे व ते निर्भयतेने मांडणारे सावरकर हे *खरे पुरोगामी* होते .
सावरकरांनी गाय या पशूला फक्त एक " उपयुक्त पशु" म्हणूनच बघावे हे सांगितले , तसेच सांगितले को गोपूजन पेक्षा गोपालन जास्त महत्वाचे कसे आहे .तसेच काही खाल्याने धर्म बुडतो हा जो त्या काळचा समज होता त्यालाही त्यांनी खोडून काढले .तो काळ इतका भयंकर होता की ख्रिश्चन मिशनरी नुसता पावाचा तुकडा तळ्यात टाकत व त्याचे पाणी पिले तर पूर्ण गावच्या गाव बाटवले जाई . सावरकरांनी या सर्व खुळचट समजुतींना प्रखर विरोध करून , त्यातला फोलपणा दाखवून दिला . अंधश्रद्धा या फक्त हिंदू धर्मातील दोष नसून , तो प्रत्येक धर्मात हा दोष कसा वेगवेगळ्या स्वरूपात आहे हे ही त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे .हा दोष सर्वांनीच काढून टाकला पाहिजे हे त्यांनी आग्रहाने सांगितले .एक *विज्ञाननिष्ठ* *भारतीय समाज* तयार व्हावा यासाठी वीर सावरकर आग्रही होते .श्रद्धेच्या चष्म्यातून न बघता प्रत्येक घटनेला तर्काच्या व प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहावे असे त्यांनी सांगितले .
आजच्या काळात स्वतःला पुरोगामी म्हणविणारे तथाकथित लोक जातिजातीत भांडणे लावून , त्यावर स्वतःची पोळी कशी भाजता येईल असे बघतात, आणी असे जर कुणी करत असेल तर त्यांच्या पासून सर्वांनी चार हात दूरच राहावे .अस्पृश्य व दलित समाजावर कधीकाळी अन्याय झाला असे सारखे दाखवून व भासवून आज द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत .बौद्ध व नवबौद्ध समाजाला मुख्य हिंदू समाजापासून वेगळे पाडण्याचा कट आखला जातोय, आणि हा कट काही प्रमाणात यशस्वी ही होतों आहे .खरेतर प्रत्येक हिंदू भगवान गौतम बुद्ध यांचा नितांत आदर करतो , त्यामुळे हिंदूंनी बुद्ध व बौद्ध धर्माचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही . आपण प्रत्येक हिंदूने ही आता येथून पुढे जातीच्या चष्म्यातून न बघता एकमेकांकडे एक केवळ हिंदू म्हणून बघण्यास सुरू करावे( हे फार सोप्पे नाही , पण कुठेतरी, कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे ) .तुम्ही एक असाल तर , तुम्हाला एकेकटे गाठून तुमचा गैरफायदा घेणे अशक्य होईल . वीर सावरकरांनी हे ओळखूनच दूरदृष्टीने अखिल हिंदू एक कसा होईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले .त्यामुळे आजही सावरकरांचे विचार याबाबतीत मार्गदर्शन करत आहेत .
तसेच आजकाल *इतिहासाचे* *विकृतीकरण* करण्याचे प्रचंड मोठे काम चालू आहे , व या कामाला बाहेरच्या देशांतून देखील मोठे फंडिंग मिळते , हे आपण लक्षात घेतले पाहिजे .कारण तुमच्यात वादविवाद व जातिजातीत भांडणे लावून , आधी तुम्हाला एकटे पाडले जाते व नंतर आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगून त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो . या अशा गोष्टीपासून अखंड सावधान राहणे गरजेचे आहे .
अशावेळी सावरकर विचार दिपस्तंभासारखे काम करत आहेत , पण आपण ते वाचले व समजून घेतले पाहिजे.
**विश्वाचा देव व मनुष्याचा देव*
सावरकर हे एक महान तत्त्ववेत्ते तर होतेच , पण ते एक काळाच्याही पुढे जाऊन विचार करणारे द्रष्टे होते .त्यांचा एक खूप उत्तम लेख आहे , " विश्वाचा देव व मनुष्याचा देव " जो मुळातूनच सर्वांनीच वाचला पाहिजे .यातील त्यांचे काही विचार पाहा , ' या विश्वाचे नियम आपण नीट समजून घेऊन आपल्या हितासाठी पोषक होतील तेवढा तिचा जमेल तसा उपयोग करून घेणे ,इतकेच मनुष्याच्या हातात आहे .मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट, अशी नीती-अनितीची स्पष्ट व्याख्या केली पाहिजे ' .या लेखातून सावरकर स्पष्ट सांगतात की विश्वाचा देव व मनुष्याने ठरविलेला देव हे दोघेही भिन्न आहेत आणि कुठल्याही धर्म-जातीच्या देवाहून या विश्वाचा देव (म्हणजेच निसर्ग) देव श्रेष्ठ आहे .
वीर सावरकरांना ' *हिंदूहृदयसम्राट* ' असे जरी म्हटले जात असले तरी ते एके ठिकाणी असे म्हणतात की, " आपले सर्वांचे अंतिम ध्येय या समस्त पृथ्वीवर *मनुष्य ही एकमात्र जात* व्हावी व कुठलाही भेद राहू नये हेच असले पाहिजे , आणि हे ज्यादिवशी घडेल त्यादिवशी मी स्वतः प्रथम माझा हिंदू धर्म व माझी जात ही या विशाल मनुष्य धर्मात विलीन करून टाकेल " . पण जोपर्यंत इतर धर्म स्वतःचा धर्म म्हणून सांगत आहेत तोपर्यन्त हिंदू धर्मानेही स्वतःचा स्वाभिमान न सोडता आपले वर्तन ठेवले पाहिजे .
तर असे हे महामानव सावरकर आपल्या भारत देशांत जन्माला आले त्यासाठी आपल्या प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला पाहिजे व त्यांच्याविषयी बोलताना मान ताठ ठेवली पाहिजे .
शेवटी काय तर सावरकर समजून घेताना आधी सावरकर सतत वाचत व त्यांच्याविषयी सतत लिहीत राहिले पाहिजे , त्यासाठीचा हा छोटा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल ही आशा आहे .
हेमंत सदाशिव सांबरे
२६.०२.२०२१
( स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ५५ वी पुण्यतिथी ) 【 लेख आवडल्यास पुढे नक्की पाठवा 】 आपल्या प्रतिक्रिया येथे वा मला फोन करून नक्की कळवा ही विनंती .
फोन नंबर-9922992370 .
दूरध्वनी क्रमांक-९९२२९९२३७० .
Email - camsambare@gmail.com .
या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी खालील ब्लॉगवर क्लिक करुन तुम्ही वाचू शकता👇👇👇
https://hemant-sambare.blogspot.com/2020/05/blog-post.html
Comments
Post a Comment