बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं

 *बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !* 



अगदी जेव्हापासून कळू लागले ना!


हो अगदी तेव्हापासून मी नेहमी म्हणायचो ,


बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं ! 


तुम्ही खूप साधे (कदाचित गबाळेच म्हणा) राहायचे ,

अगदी साध्या साध्या गोष्टींवर खर्च करताना ,सतत नाही म्हणायचे ! 


म्हणूनच मी  नेहमी म्हणायचो 

बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं ! 


तुमची प्रत्येक कृती मला चुकीचीच वाटायची!


तुम्ही लावत असलेली शिस्त मला खूप कडक वाटायची ! 


 म्हणूनच मी नेहमी म्हणायचो 

बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं ! 


तुम्ही नोकरी करताना खूपच प्रामाणिक होता!


तुम्ही कधीही तत्व सोडले नाही , म्हणूनच तर आपण गरीबच राहिलो!


म्हणूनच मी नेहमी म्हणायचो 

बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं ! 


आज मी आता बाबा झालोय !

तसे बाबा! खूप साऱ्या प्रश्नांचे मोहोळ उठलेय सभोवती !


तुम्ही अनेकांचे आदर्श झाला होतात!


मला आज निदान माझ्या मुलांचे तरी  आदर्श होता येईल का खरंच ?


नक्की सांगता येत नाही !


आज मी तुमच्या भूमिकेत आलोय!


तरीही अजून मी तेच का म्हणतोय 


बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं ! 


पण आताशा हे खूप जड जातेय हो बाबा!


हे कबूल करणे की तुम्ही किती बरोबरच होता !


कारण आज तुमचा चष्मा मी घातलाय !


तुम्ही शून्यातून किती गोष्टी घडविल्या !


सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही निर्माण केले उत्तम चारित्र्य !


त्याची किंमत आज कळते आहे !


म्हणूनच आज मी म्हणतोय ,


 बाबा खरंच तुमच्यासारखे मला थोडेतरी होता येईल का हो?  


बाबा खरंच तुमच्यासारखे थोडेतरी होता येईल का हो?  


© हेमंत सांबरे 

१७.०३.२०२१.

{ कविता आवडल्यास पुढे पाठवू शकता }

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर