जर आंबेडकर जन्माला आले नसते तर!

युगपुरूष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏


 *जर आंबेडकर जन्माला आले नसते तर !** 



【 ◆ हा लेख म्हणजे माझे स्वतःचे प्रांजळपणे मांडलेले अनुभव कथन आहे ,  सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे , ज्यांना डॉ आंबेडकर या विषयाची आवड आहे त्यांनी नक्की वाचावा , आवडेल अशी आशा आहे ◆】 
🖋️🖋️- हेमंत सांबरे 

# *_प्रसंग पहिला_* 

साधारण 1990 च्या दरम्यानचा काळ असेल .स्थळ - अहमदनगर जिल्ह्यातील एक खेडेगाव . या गावातील एका गल्लीत एक ब्राह्मण जातीचा  मुलगा व एक महार जातीचा मुलगा दोघांचेही वय आठ-नऊच्या मध्ये असते व या दोघांची खूप मैत्री होते .ही मैत्री अर्थात जी  लहानपणी असते ,  तशीच अगदी निस्वार्थी व जिवापाड मैत्री आहे .दोघेही एकमेकांच्या घरी जातात   , खातात , एकत्र खेळतात  वगैरे वगैरे ! या दोघांचे प्रेम इतके असते की बऱ्याच वेळा त्यांना एकमेकांना सोडून करमत नाही . अगदी एकाच ताटात जेवण करणे , बरोबर बसून अभ्यास करणे , बरोबर शाळेत जाणे व परत येणे , बरोबर खेळणे हे तर रोजचेच झाले ...हे करण्यात दोघांच्याही घरून कुठल्याही प्रकारे जात अडवू शकत नाही वा ब्राह्मण घरातील कुणीही व्यक्ती अहंकाराने वा जातीच्या अभिमानाने त्यांना विरोध ही करत नाही . पुढे जाऊन ही मैत्री खूप घट्ट होत जाते , दोघानाही अभ्यासात सारखेच मार्क पडत असतात .थोडे मोठे झाल्यावर दोघेही इंजिनिअरिंग पूर्ण करून आपापल्या आयुष्यात व्यवस्थित सेटल होतात व दोघांचीही मैत्री आजही तशीच घट्ट आहे. 


# *_प्रसंग दुसरा_* 

हा काळ आहे बरोबर पहिला प्रसंग जो वर्णन केला त्यापूर्वी  90 वर्षांपूर्वी चा , म्हणजे सन 1900 च्या आसपास ...स्थळ - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक खेडेगाव ...येथे एक मुलगा आहे , वय आठ च्या मागेपुढे ! या मुलाला आता थोडेफार कळू लागले आहे .या छोट्या मुलाचे नाव भीम , लाडाने घरचे त्यास भिवा असेही म्हणत ...हा भीम एकदा स्पृश्य हिंदूंच्या पाणवठ्यावर पाणी पिताना सापडला.तेव्हा त्याला काळानिळा होईपर्यंत स्पृश्य हिंदूंनी गुरासारखा बदडला . हा प्रसंग आणि असे कितीतरी प्रसंग या कोवळ्या वयाच्या भीमाच्या आयुष्यात आले .त्यावरून त्याला कळले की आपण त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत जन्माला आलो आहोत आणी हाच आपला खूप मोठा दोष आहे ...अजून एक प्रसंग, हाच भीम हायस्कुलचे शिक्षण घेऊ लागला होता तेव्हाचा ! शिक्षकांच्या सांगण्यावरून भीम गणितातील काही उदाहरणे सोडविण्यासाठी फळ्याकडे जाऊ लागला , तोच वर्गातील सर्व मुलांनी एकच आरडाओरडा केला ,का तर फळ्याच्या मागे ठेवलेले त्यांचे जेवणाचे डबे विटाळतील म्हणून!  भिमाचे शाळेतील  शिक्षक जातीने ब्राह्मण व त्यांचा भिमावर खूप प्रेम असे .ते भिमासाठी घरून जेवणाचा डबा  घेऊन येत , पण त्यांनाही हे जेवण देताना दुरून असे भीमाच्या ओंजळीत टाकावे लागे .त्यांनाही समाजाच्या या क्रूर व माणुसकीच्या विरुद्ध असलेल्या या परंपरेला  पाळावेच लागे . ( हे तेच ब्राह्मण शिक्षक होते ज्यांनी भीमाला आपले  आंबेडकर हे आडनाव दिले व तो जोपर्यंत शाळेत होता तोपर्यंत त्याला शक्य ती मदत केली व भरपूर  प्रेम दिले ) .
हा भिवा किंवा भीम म्हणजेच पुढे जाऊन प्रसिद्ध पावलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर !
{ हे वरील दोन्ही प्रसंग म्हणजे विरोधी टोक आहेत .हा बदल काही सहज घडलेला नाही , त्याला खूप मोठ्या लढ्याची पार्श्वभूमी आहे } .

 # *_प्रसंग तिसरा_* 

1913 चा जुलै महिना ! स्थळ - अमेरिकेतील *न्यूयॉर्क शहर* .  भिवा वा भीमा आता भीमराव आंबेडकर झाले होते .भीमराव आता बडोद्याचे महाराज  सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळवून  पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत .भारतातील एका अस्पृश्य समाजातील मुलाने शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेत जावे , ही त्या काळातील *अभूतपूर्व घटना* ठरली होती  . भारत देशापासून हजारो मैल दूर असलेल्या पण पृथ्वीच्याच एका दुसऱ्या भागात असलेल्या अमेरिकेतील आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अपूर्व अनुभव होता .तेथील विद्यार्थ्यासंगे आंबेडकर बरोबरीने बोलत , चालत , जेवत , फिरत .सर्वच ठिकाणी समतेचे वातावरण ! येथेच भीमरावना लक्षात आले की आपल्या अस्पृश्य व पददलित समाजाची सध्याची परिस्थिती बदलायची असेल तर त्यावर ' *शिक्षण* ' हाच एकमेव उपाय आहे . इथे असताना भीमराव दिवसाचे अठरा-अठरा तास अभ्यास करत .अभ्यास करताना तहान- भूक विसरून जात .शिष्यवृत्ती मिळाली असली तरी जो काही पैसा होता तो कमीच पडत .त्यामुळे त्यावेळचे तिथले विद्यार्थी ज्या प्रकारची चैन व मजा करत , ती भीमरावांनी कधीच केली नाही .येथे संधी असूनही व तसेच पोषक वातावरण असूनही भीमरावांनी सिगारेट वा दारू इ ला स्पर्श ही केला नाही .याचे कारण त्यांना पुरेपूर माहीत होते की त्या काळात ही जी शिक्षणाची अपूर्व संधी मिळाली आहे , ती म्हणजे अनेक शतके लोटून ही त्यांच्या समाजात न मिळलेली दुर्मिळ अशी संधी होती . या संधीचा त्यांना आपल्या अस्पृश्य समाजाला लाभ करून घ्यायचा होता . 

# *_प्रसंग चौथा_* 

काळ- सध्याचा.

स्थळ - भारतातील /महाराष्ट्रातील कुठलेही मोठे शहर .

दिवस - १४ एप्रिल ( डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ) 


एका कारमधून दोन उच्चशिक्षित व ज्यांनी आयुष्यात फक्त करिअर एके करिअर असेच केले  फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला असे  दोन तरुण शहरातून आपल्या कामानिमित्त जात आहेत . वेळ साधारण दुपारी चारची आहे .त्यांना एक महत्वाची मिटिंग असल्याने खूप घाई आहे .अशावेळी त्यांची गाडी एका मोठ्या चौकात येऊन पोहोचते .या चौकात आल्यावर त्यांना दिसते की इथे खूप ट्रॅफिक जॅम झाले आहे .पुढे DJ चा भयंकर मोठा आवाज येत असतो व कितीतरी तरुण त्या बॉलिवूड च्या गाण्यांवर बेभान होऊन नाचत आहेत .त्यांना ट्रॅफिक अडकले आहे , लोकांना आपल्यामुळे उशीर होत आहे , याचे मुळीच भान नाही .कारण त्यांच्या लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस आहे व असे नाचण्याची संधी त्यांना कधीतरीच मिळतेय . या दिवशी असा पूर्ण भारतच जणू रस्त्यावर , चौकाचौकात उतरलाय व बेभान झालाय .त्या गाडीतील दोन तरुणामधील एकजण वैतागून म्हणाला , " अरे ह्या आंबेडकरने आपली तर पुर्ण वाट लावून टाकली आहे , याची जयंती आणि आम्हाला का त्रास याचा , मिटींगला उशीर होतोय बॉसचे बोलणे खावे लागणार बहुधा ! " असे म्हणत त्याने वैताग व्यक्त केला ..जवळपास दीड तासाने त्यांची  या ट्रॅफिक मधून सुटका झाली व त्यांनी सुटकेचा श्वास सोडला ..मग त्या दोघांमध्ये आंबेडकर या विषयावर चर्चा झाली व त्यात आंबेडकरांनी परत दोन तीन शिव्या खाल्ल्या .


 *आंबेडकर आणि अस्पृश्यता* 

अस्पृश्यता हा हिंदू धर्मातील एक मोठा कलंक होता . आंबेडकर जन्माला येण्यापूर्वी भारतात परिस्थिती अशी होती की दलित वा पददलित समाजात जन्माला येणे हे एक पापच होते .मुळात या समाजाला ही देखील जाणीव नव्हती की आपल्या बाबतीत जो  काही अन्याय होतोय तो एक घोर अन्याय आहे म्हणून ! तसेच उच्चवर्णीय असे समजत की अस्पृश्याना असे गुलामासारखे वागविणे म्हणजे त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे . या अस्पृश्यांच्या स्पर्शानेच काय तर त्यांच्या सावलीनेही या लोकांना विटाळ होत असे . हा काळ फार जुना असे म्हणता येत नाही , फार फार शंभर वर्षांपूर्वी हीच परिस्थिती होती ... ही अशी अस्पृश्यता मानण्याची पद्धत म्हणजे फक्त उच्चवर्णीय व अस्पृश्य असे दोनच गट होते असे नाही , प्रत्येक जात त्याच्या खालच्या जातीला हीन व कमी लेखत असत व ही अशी उतरंड खूप खोलपर्यंत पोहोचलेली होती .. ..त्यावेळी ब्रिटिश सरकार होते ...त्यांना इथल्या सामाजिक प्रश्नांशी काही घेणेदेणे नव्हते ...उलट तुम्ही भारतीय एकमेकांशी जेव्हढे भांडत राहाल , जेवढा तुमच्यात भेदाभेद असेल तेच त्यांना हवे होते ..( म्हणून तर मूठभर ब्रिटिशांनी करोडो लोकांच्या हिंदुस्थान वर राज्य केले ) आजही तीच परिस्थिती आहे कदाचित .. आता इंग्रजांच्या जागी आत्ताचे राजकारणी आले आहेत इतकाच काय तो फरक !  पण आंबेडकरांनी या अस्पृश्य समाजातला स्वाभिमान जागा केला व त्यांना संघटित केले . व हे करण्यासाठी डॉ आंबेडकरांनी प्राणपणाने मोठा संघर्ष उभा केला ..एकाचवेळी ब्रिटिश , कॉंग्रेस व स्पृश्य समाज यांच्या विरोधात बाबासाहेबानी अभूतपूर्व लढा उभा केला ...त्यांना कुणीही टाकलेली भीक नको होती तर त्यांच्या समाजाचे जे मूलभूत व माणुसकीचे व समानतेने वागविले जाण्याचे हक्क पाहिजे होते ...व मी तर म्हणेल की ते त्यांनी झगडून , लढून , भांडून , प्रसंगी हिसकावून घेतले ..कारण हे सर्व हक्क त्यांना मिळावे या बाजूने कुणीही नव्हते व बहुतांश विरोधात होते ...डॉ आंबेडकरांचे मोठेपण हेच होते की त्यांना पुरेपूर कळलेले होते की भीक मागून , विनंती करून काही होणार नाही , तर आपले जे हक्क आहेत ते आपणास लढा उभारून व झगडा करूनच मिळतील ...त्यासाठी त्यांनी मोठे संघटन उभारले ..

*शिक्षणाचे महत्त्व*

आजच्या काळात कदाचित आपणाला शिक्षणाचे तितके महत्व कळत नाही , कारण आपल्यातील बहुतेकांना आपल्या आईबापाने सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ! प्रसंग  तिसरा व चौथा मधून हेच दिसते की या महामानवाला समजून घेण्यात या त्यांना जे अपेक्षित होते ते आजच्या काळात करण्यात  आपण पूर्ण चुकत आहोत ....त्यांनी शिक्षण घेण्यात जे अपरिमित कष्ट घेतले त्याचा आदर्श आज कुणीच घेत नाही हे बघून दुःख वाटते ..बराच मोठा समाज त्यांना फक्त दलितांचा नेता असे समजून डॉ आंबेडकरांच्या इतर अनेक थोर कार्य , देशभक्ती व इतर  गुण , त्यांच्या विचारांपासून अजूनही दूरच आहेत (मी ही तसाच होतो ) .प्रसंग चौथा मधील चौकात बेभान नाचणारे तरुण व त्या गाडीतील ते दोन तरुण ज्यांना आंबेडकरांची पूर्ण माहितीच नाही हे दोघेही आजच्या पिढीचे सत्य चित्र आहेत ....माझे तर आता या विषयाच्या बाबतीत पूर्ण डोळे उघडले आहेत . व मी डॉ आंबेडकरांच्या चरित्राच्या  प्रेमात पडलो आहे . मला समजून चुकले आहे की , डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर देशभक्त ही होते , त्यांनी अस्पृश्य समाजाच्या हक्कांसाठी लढताना भारताच्या हितांशी कधीही तडजोड केली नाही .

 *बदल कसा घडला ?* 
आंबेडकर हे खूप महान होते वा महामानव होते हे खूपदा व खूप ठिकाणी ऐकून झाले होते ...पण त्यांच्या बद्दलचा अभ्यास नसल्याने म्हणा किंवा अजून काही कारण असेल , पण  एक प्रकारची मनात गाठ होती .
मी स्वतः अलीकडेच स्टार प्रवाह या मराठी चॅनेल वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर ही मालिका बघायला सुरुवात केली .तसेच धनंजय कीर यांनी लिहलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चरित्रही  वाचत आहे ...मी कबूल करतो की माझे स्वतःचे आंबेडकर या विषयावरचे ज्ञान अतिशय तोकडे होते ..व अजूनही मला खूप अभ्यास करणे बाकी आहे ...मी जसजसा  खोलात गेलो तसा मी इतका प्रभावित होत गेलो की आंबेडकर वाचून स्वतःला खूप भाग्यवान समजू लागलो आहे ..त्यांना *महामानव* असे म्हणतात , मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की ते एक *_युगपुरुष_* होते ..प्रसंग पहिला ( लेखाची सुरुवात ) मधला ब्राह्मण जातीचा मुलगाही म्हणूनच स्वतःला भाग्यवान समजू लागला आहे की त्याला एका अतिशय निर्मळ  मनाच्या महार जातीच्या मुलाची मैत्री लाभली व हे शक्य झाले केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच !

 
आंबेडकरांचा जन्म व त्यांचे कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील एक न भूतो न भविष्यती अशीच घटना आहे .कारण अस्पृश्यता हा  दोन हजार वर्षे पेक्षा जास्त जुनाट रोग झाला होता .आंबेडकर यांच्याआधी ही काही लोकांनी त्यावर प्रहार घातले होते , पण ते लोक स्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील होते . डॉ आंबेडकर मात्र पाहिले असे नेते झाले , अस्पृश्य समाजात जन्म घेऊन , त्यांनी नुसता अस्पृश्यांचा उद्धार नाही केला तर अवघ्या हिंदू धर्माला या शापातून मुक्त केले ..म्हणूनच आंबेडकरांच्या कार्याचे महत्त्व सहस्त्र पटीने वाढते . म्हणूनच _आंबेडकर_ जन्माला_ _आले नसते_ _तर_ , ही कल्पनाही सहन होत नाही व हे सत्य ( आंबेडकरांचा जन्म व त्यांचे कार्य ) हवेहवेसे वाटते . या अर्थाने डॉ आंबेडकर हे हिंदू धर्म उद्धारक देखील आहेत .  म्हणूनच आत्ताच्या सर्वच जाती व धर्मातील लोकांनी आंबेडकर साहित्य व त्यांचे कार्य याचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे असे मला मनापासून वाटते. 

संदर्भ - डॉ बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर या पुस्तकातून 🙏
【 या लेखाचा उद्देश कुठल्याही प्रकारे जातीय वा राजकीय नाही, तर हे माझे  स्वतःचे एक मोकळ्या मनाने व्यक्त केलेले मनोगत आहे . माझ्या विचारांत जो बदल होत  गेला , त्याबद्दल वाचकांशी केलेले हे हितगुज आहे . या लेखाच्या पहिल्या प्रसंगातील ब्राह्मण मुलगा मीच असून , माझा मित्र मिलिंद , आमची मैत्री  याबद्दल मी सांगितले आहे.माझ्यासारखेच असे अनुभव इतरांचेही असतील याबद्दल मला खात्री आहे  】 .
© हेमंत सदाशिव  सांबरे 
 *9922992370* .
Email - camsambare@gmail.com 
लेख आवडल्यास फोन करून / SMS / Whatsapp  वर नक्की कळवा 🙏.

Comments

  1. खरं आहे सर आज बाबासाहेब यांना समजून घेणे खूप गरजेचे आहे व ते केवळ वाचन करूनच होईल .खूप छान सर💐💐

    ReplyDelete
  2. बरोबर आहे हेमंत जी. आपण समजून घेत नाही, म्हणजे आता कालबाह्य व्हायला लागलेले असे स्पृश्य आणि अस्पृश्य. दोघांनीही. दुःख एवढेच की शिक्षणापासून दूर असलेले , शिकलेल्या लोकांकडून बहकवले जातात.
    बदलते संदर्भ यांनी बघायला सुरुवात केली पाहिजे. पूर्वी जात ही समाजात विभागणी दाखवत असे, पण आता जात हळू हळू फक्त स्वतःच्या घरापर्यंत मर्यादित ठेवावी हे पटलंय लोकांना आणि तसं वागणं पण होऊ लागलंय.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर , आपली ओळख झाली तर बरे वाटेल

      Delete
  3. खूप छान विचार आपण मांडले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची ओळख करून दिली.

    ReplyDelete
  4. नमस्कार. छान सादरीकरण..धन्यवाद.

    "डॉ आंबेडकर मात्र पाहिले असे नेते झाले , अस्पृश्य समाजात जन्म घेऊन , त्यांनी नुसता अस्पृश्यांचा उद्धार नाही केला तर अवघ्या हिंदू धर्माला या शापातून मुक्त केले ..म्हणूनच आंबेडकरांच्या कार्याचे महत्त्व सहस्त्र पटीने वाढते ."

    या वाक्याचा अर्थ समजला नाही.

    ReplyDelete
  5. डाॅ चंद्रशेखर भारती7 December 2023 at 06:21

    अत्यंत सुंदर लेख आहे. प्रत्येकाने आपली जात घरापुरती मर्यादित ठेवावी. म्हणजे सर्व भारतीय समाज सुखी होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर