# सावरकरांचे वैयक्तिक जीवन व स्वभावदर्शन


 *वीर सावरकरांचे वैयक्तिक जीवन व स्वभावदर्शन !** 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अवघे  जीवन म्हणजे एक धगधगते अग्निकुंड  ! या माणसाने त्याचे सर्वस्व देशासाठी वाहून घेतले होते . ते नेहमी सांगत ,'देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपला देश लागतो व या देशाचे आपण काही  देणे लागतो'

 अशावेळी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप कमी चर्चा झाली आहे वा माहीत झाले आहे .त्यामुळेच सावरकर समजून घेताना या लेखमालेत मी _तिसरा_ _भाग_  या विषयाला दिला आहे .

भगूर हे गाव नाशिकपासून साधारणपणे दहा-पंधरा किलोमीटरवर आहे .या गावात २८ मे १८८३ ला विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला .( आजही भगूर येथे सावरकरांचा वाडा आहे जो सरकारने *स्मारक* म्हणून जाहीर केला आहे ,हे अतिशय प्रेरणादायी ठिकाण असून प्रत्येकाने येथे भेट द्यावी अशी वाचकांना विनंती आहे  , खाली या वाड्याचा फोटो जोडला आहे ) त्यांचा मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे झाला . हा एकूण ८३ वर्षांचा प्रवास म्हणजे अतिशय अदभुत , रोमांचक , असंख्य संकटांनी भरलेला , उपेक्षा व अपमान , हेतुपूर्वक केलेले दुर्लक्ष यांनी भरलेला पण रोमहर्षक व लाखो-करोडोंसाठी प्रेरणादायी असा होता .

सावरकरांना घरातील सर्वजण प्रेमाने  तात्या म्हणत , पुढे जाऊन हेच नाव तात्याराव असे रूढ झाले . असे हे तात्या भगूर ला असल्यापासूनच अतिशय *_ध्येयवादी मानसिकता_* असलेले होते .प्रचंड वाचन , पाठांतर , विचार मांडण्याची अभूतपूर्व हातोटी , संघटन कौशल्य इ गुण असल्याने त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता .

विनायकाचा स्वभाव खूप मनस्वी असे , कुणाचे दुःख त्यांस पाहवत नसे .विशेष म्हणजे ते कुठलीही *जातपात पाळत* नसत . कुठल्याही मित्राच्या घरी जाऊन जेवणे , मिसळणे हे त्यांच्यासाठी सहज असायचे . त्यांच्या घरात नित्य नियमाने सूर्यनमस्कार घातले जात व तात्या स्वतःही खूप व्यायाम करायचे .
त्यांचे वडील दामोदर राव म्हणजे एक करारी व स्वाभिमानी मनुष्य होते . त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले असले तरी आपल्या संस्कृतीचा त्यांचा अभ्यास दांडगा होता व आपल्या मुलांमध्ये आपल्या थोर _हिंदू संस्कृती_ चा अभ्यास व अभिमान तयार व्हावा याकडे त्यांचा कटाक्ष होता .त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते , व त्याही आपल्या पतीस अनुरूप अशाच वागत . या दाम्पत्यास चार मुले झाली.थोरला गणेश ( यांस पुढे बाबाराव म्हणून ओळखले जाऊ लागले ) , दुसरा विनायक , तिसरी मुलगी मैनाबाई व चौथा नारायण ( हेच पुढे डॉ नारायणराव सावरकर म्हणून प्रसिद्ध झाले ) .
{ या लेखासोबत सावरकर कुटुंबाचा एकत्रित फोटो जोडला आहे} 

*कवी सावरकर* 

सावरकर यांच्याविषयी चर्चा करताना कविता व सावरकर यांना वेगळे करून  कसे चालेल ? कविता हा त्यांचा स्वभाव होता .याच कवितेने अंदमान सारख्या अतिशय कठीण काळात साथ दिली .त्या दृष्टीने कविता त्यांची जवळची सखी होती .सावरकर शीघ्र कवी होते , त्यांची कविता खूप संवेदनशील होती .त्यांनी ब्रायटन च्या समुद्रकिनाऱ्यावर रचलेले , ' *ने* *मजसी ने* ' हे जगातल्या सर्वश्रेष्ठ भावगीतामधले एक काव्य मानले जाते .सावरकर जितके बाहेरून  कठोर तितकेच आतून हळवे होते .कवितेने त्यांना आयुष्यभर प्रत्येक प्रसंगात दिली .त्यामुळेच  त्यांच्या वैयक्तिक जीवनात कवितेचे स्थान खूप महत्त्वाचे होते . म्हणजेच कविता हा त्यांचा स्वभावच होता असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही . 

*प्रतिकूल तेच घडेल* !

आज या लेखाच्या निमित्ताने आपण सावरकरांचे विविध  स्वभाव पैलू बघत आहोत . सावरकरांनी बालपणातच क्रांतिकार्यात उडी घेतली होती, त्यामुळे त्याच्या परिणामांची ही सिद्धता त्यांनी कायम बाळगली होती . जे जे प्रतिकूल असेल तेच घडेल .म्हणून प्रत्येक प्रसंगात काय *प्रतिकूल* ( म्हणजे worst) तेच घडेल याचा आधीच विचार करून सावरकर त्याची मानसिक व व्यावहारिक पातळीवर तयारी करून ठेवत .त्यांचे मत यावर असे होते की त्यामुळे जे जे काही घडेल त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता येईल व अनपेक्षित असे काही घडले तरी ( त्यांच्या आयुष्यात तर सतत तसेच झाले ) तरी त्यातून तरून जाण्याची शक्ती घेऊन आपण तयार राहतो . *किती जबरदस्त* *विचार आहे हा* ! हाच विचार आपल्या प्रत्येकासाठी आजही उपयोगी ठरू शकतो , नाही का ?

*प्रेरणा** 

वीर सावरकरांची लहानपणापासूनची मुख्य प्रेरणा म्हणजे *_छत्रपती शिवाजी_ _महाराज*_ हेच होते .विनायकाला महाराजांविषयी नितांत आदर होता .त्यांनी पुढे जाऊन , ' शिवाजीचा पोवाडा ' , ' शिवरायांची आरती' ,  ' हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती तम् तेजा ' ही अशी अनेक काव्ये रचली .ही काव्ये आजही सुप्रसिद्ध आहेत .( यातील बऱ्याच कविता लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत )  १८९७ साली प्लेगची साथ आली असता क्रूरकर्मा ब्रिटिश अधिकारी रँड ने जनतेचा खूप छळ केला .त्याचा सूड म्हणून चापेकर बंधूनी रँडचा वध केला .अशा रीतीने स्वातंत्र्य चळवळीत लहानग्या  विनायकाच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली.याच प्रेरणेतून विनायकांने आपल्या घरातील *अष्टभुजा* देवीसमोर, ' भारताला सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्याची घनघोर शपथ घेतली ' .छ.शिवाजी महाराज व चापेकर बंधू हे त्यांचे _प्रेरणास्थान_ होते .

*स्रियांबद्दल आदर* 

बऱ्याच वेळा आपण जे काही वाचतो , ऐकतो त्यामधून या थोर महापूरुषांचे  जीवन व त्याविषयी वरवर काही गोष्टी आपणास ऐकण्यास मिळतात , पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व त्यांच्या स्वभावाबद्दल सामान्य वाचकाला उत्सुकता असते . कारण दैनंदिन जीवन कसे होते , काही विशिष्ट प्रसंगी त्यांचे वागणे कसे असायचे या गोष्टी ही खूप महत्वाच्या असतात .
विनायक अगदी लहानपणापासून स्रियांचा खूप आदर करत .कदाचित त्या काळात *स्त्री-पुरुष हा भेद* साहजिक वा सार्वत्रिक असला तरी सावरकरांनी तो कधी पाळला नाही .त्यांची आई राधाबाई  विनायक दहा वर्षाचा असताना वारली .नंतर त्यांचे मोठे बंधू  बाबाराव यांचे लग्न झाले व सौ येसुवाहिनी यांचे घरात आगमन झाले .विनायक , नारायण व मैना या भावंडाना या वाहिनीची खूप माया व लळा होता .विनायक येसुवाहिनीना स्वयंपाकासहित सगळ्या कामात मदत करत असे .म्हणजेच कामाच्या बाबतीत _श्रेष्ठ-कनिष्ठ_ दर्जा असा भेदभाव त्यांच्या मनात नव्हता . स्वतःची पत्नी सौ माई यांनाही त्यांनी आयुष्यभर *_समानतेने_* वागविले , त्यातूनच रत्नागिरी येथे ही सौ माई यांनी स्रियांमध्ये अनेक प्रकारे जागृती केली व याला सावरकरांची सक्रिय साथ होती .ही गोष्ट खरोखरच शिकण्यासारखी होती व आहे .पुढे जाऊन याच स्वभावामुळे त्यांना मोठी संघटना उभी करणे शक्य झाले असावे .

*कुटुंबातील एकता व बंधुप्रेम*

आजच्या काळात तर ही गोष्ट दुर्मिळ व कदाचित नाहींसीच झाली आहे .सावरकर कुटुंब तसे सधन होते .म्हणजे सावरकर बंधूनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली नसती तर आरामात जगू शकले असते . पण जेव्हा विनायकांने लहानपणी च ठरविले की सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे , नंतर या अग्निकुंडात त्यांचे कुटुंबीय ही सहभागी झाले .आणि हे करत असताना  संपुर्ण  कुटुंबाला अनेक हालअपेष्टा व संकटे भोगावी लागली.सहसा आपण बघतो की संकट आले की अनेक एकत्र कुटुंबातील एकता भंग पावते , प्रत्येकजण स्वतःचा विचार करू लागतो .पण सावरकर कुटुंबाच्या बाबतीत अगदी उलट घडले , जेवढे संकट मोठे तेवढा त्या सर्वांचा निश्चय आणखी पक्का व आपल्या ध्येयाकडे ( मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देणे ) नेणारे ठरले . _संकटाच्या काळातच तुमचे चरित्र व स्वभाव यांची कसोटी लागते,_ असे  म्हणतात व सावरकर कुटुंबीय या परीक्षेत शंभर टक्के पास झाले . बाबाराव सावरकरांना जेव्हा जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा , तेव्हा वीर सावरकरांनी आपल्या येसुवाहिनी ना जे पत्र लिहले त्यात ते म्हणतात , 

...अमर होय ती वंशलता ।निर्वंश जिचा देवाकरिता।दिगंती पसरे सुगंधता ।लोकहीत परिमलाची ।।

सावरकरांची पत्नी सौ माई व वहिनी या पत्राला उत्तर देताना वीर सावरकरांना कळविले की , " तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला लढा पुढे असाच सुरू ठेवा ! 

संकटात ही त्यांची एकता भंग पावली नाही वा आपल्या ध्येयापासून कुणीही दूर झाले नाही . 
तिन्ही सावरकर बंधूंचे परस्परांवर खूप प्रेम होते . थोड्या अतिशयोक्ती चा अपराध माझ्याकडे घेऊन म्हणावेसे वाटते की आधुनिक काळातील राम-भरत-लक्ष्मण  होते हे बंधू! बाबाराव व तात्याराव यांना जवळपास एकाचवेळी जन्मठेप झाली .त्यांच्यामागे ब्रिटिश सरकारने त्यांच्या घरादारावर जप्ती आणली .देशाच्या कामी या संपुर्ण कुटुंबाचे आयुष्य पणाला लागले .पण तरीही या बंधूनी कधीही एकमेकाला दोष दिला नाही वा इतर कुणालाही दोषी धरले नाही . 
एका प्रसंगात वीर सावरकर भाषण करत असताना अचानक त्यांचे पाय लटपटू लागले व त्यांना नीटसे उभे राहता येईना तर लगेच व्यासपीठावर मागे बसलेल्या  नारायण रावांनी उठून त्यांचे पाय चेपून देऊ लागले .तसेच एकदा नारायणराव आजारी होते तेव्हा स्वतः तात्यारावांनी त्यांच्या उशाशी बसून त्यांची सेवा केली .बाबाराव सांगली येथे असताना खूप आजारी होते तेव्हा नारायणराव यांनी त्यांची खूप सेवा केली . तर असे होते त्यांचे बंधुप्रेम !

*सावरकरांची दिनचर्या* 

तात्याराव सकाळी आठ च्या दरम्यान उठत .त्यावेळचे नवशक्ती नावाचे वर्तमानपत्र ते वाचत .सकाळच्या नाश्त्यात एक उकडलेले अंडे , पाव व लोणी घेत .त्यानंतर त्यांना एक ते दीड कप चहा लागे .साडेनऊ ते बारा पर्यंत विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी ते घेत .या सर्व भेटीच्या वेळा आधीच ठरलेल्या असत .दुपारी भोजन करताना खाली जमिनीवर ,पाटावर बसून जेवण करत .जेवण अतिशय साधे म्हणजे _भात , भाजी , पोळी_ व _आमटी_ असे खात .भाजणीचे _थालीपीठ व भजे_ त्यांना खूप आवडत.जेवण चालू असताना बोललेले त्यांना चालत नसे .संध्याकाळी पाच वाजता चहा होई .त्यानंतर ते बागेत जाऊन फुलझाडे , फळझाडे यांची पाहणी करत .रात्री जेवण झाल्यावर अनेक ग्रंथ , मासिके याचे  वाचन करत ते रात्री बारा-साडेबारा ला झोपी जात . 

स्वतःच्या कामामुळे घरातील लोकांना गैरसोय होऊ नये याकडे त्यांचे लक्ष असे .विशेषतः माईना ते उशीर होत असेल तर आपल्या आधी जेवण करायला सांगत .

*पती-पत्नीचे नाते* 

वाचकहो , विचार करा , ज्या स्त्रीचे एक दिव्य-दाहक विचारांच्या व ज्याला रात्रंदिवस फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागला आहे अशा मनुष्याशी लग्न झाले असेल तर तेथे _वैयक्तिक सुखाचा_ विचार तरी कुठे राहील ? तर अशा या माई सावरकर , ज्यांचे माहेर अतिशय संपन्न घराणे होते .पण जेव्हा त्यांचा विनायकरावांशी विवाह झाला तेव्हा त्यांनी पतीसोबत त्यांच्या _भयंकर क्रांतिकार्याशी_ देखील लग्न लावले . व नंतर आयुष्यात कुठलीही *तक्रार* केली नाही .माई व विनायक रावांचे नाते अद्भुत असेच होते .देशाचा, समाजाचा  स्वार्थ हाच आपला स्वार्थ व  आपला भारत देश हाच _परमेश्वर_ असे समजून सौ माई आयुष्यभर सावरकरांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिल्या . सावरकर ही सौ माईना *बरोबरीचा दर्जा* देत .रत्नागिरीला तर माईंच्या मदतीने त्यांनी समाजात _समानता_ रुजविण्याचे महान कार्य केले .सावरकर बंधू अंदमानात असताना माई व येसुवाहिनी यांना अतिशय उपेक्षेचे व अपमानाचे जीवन जगावे लागले , पण म्हणून  दोघीही डगमगल्या नाही व त्यांनी परिस्थिती पुढे हार मानली नाही .सतत १४ वर्षे त्यांनी हा वनवास व विरह भोगला . यावरून असे दिसते या सावरकर कुटुंबातील स्रियां म्हणजे स्वतंत्र बाण्याच्या नेत्या ( Leader with independent thoughts & capacity ) होत्या . त्यामुळेच या स्रियां एक _स्वतंत्र नेतृत्व_ म्हणून पुढे आल्या . अलीकडच्या काळात या तीन सावरकर स्रियांना समोर ठेऊन , " *त्या तिघी* " , ही कादंबरी सौ. शुभाताई साठे यांनी लिहली आहे  , तसेच , येसुवाहिनी वर , " *तू धैर्याची अससी मूर्ती "* हे पुस्तकही आले आहे .इच्छुक वाचकांनी नक्की ही पुस्तके वाचावीत .

*व्यवहारवादी व बुद्धिप्रामाण्यवादी  सावरकर* 

सावरकरांच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास करता ,असे दिसून येते की ते खूप व्यावहारिक होते . त्यांच्या एकूण जीवनात भावनेच्या आहारी जाऊन कुठलीही गोष्ट केल्याचे दिसत नाही .प्रत्येक गोष्ट करताना त्यांचे काटेकोर नियोजन ( Proper Planning ) दिसते .म्हणजे अगदी लेखक म्हणून कविता / लेख /पुस्तके लिहणे असो वा मार्सेलिस ला बोटीवरून समुद्रात उडी मारून निसटून जाण्याचा प्रयत्न असो! पुढे काय घडू शकेल याचे आडाखे /अंदाज आधीच बांधून , त्याप्रमाणे त्यांची सिद्धता असायची .पण त्याचवेळी ज्योतिष/भविष्य यावर त्यांचा बिलकुल विश्वास नसे .कुठलेही नवीन काम सुरू करताना त्यांनी कधीही _मुहूर्त वगैरे_ बघितला नाही .
कोणता मनुष्य/संस्था/समूह  व्यवहारात कसा वागू शकेल याचे सावरकरांचे जे अंदाज असत ते खूप अचूक असत .याचे ठळक उदाहरण म्हणजे नेहरूंच्या काळात सगळे हिंदी-चिनी भाई भाई असे  म्हणत असताना सावरकरांनी दूरदृष्टीने सांगितले की चीन भारताच्या पाठीत सुरा खुपसेल आणि हे त्यांनी १९५० च्या दरम्यान सांगितले ज्यावेळी चीनने तिबेट गिळंकृत केला होता .
 कुठल्या मनुष्याची कुठली _क्षमता_ आहे , व त्याने नेमके काय केले पाहिजे हे ही ते योग्यप्रकारे सांगत . जसे *नेताजी* *सुभाषचंद्र बोस* सावरकरांच्या भेटीला आले ( वर्ष -१९४० ) तेव्हा कुठल्या तरी क्षुल्लक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पुतळ्याला काळे फासून आंदोलन सुरू करण्या बाबत चर्चा करत होते , वीर सावरकरांनी त्यांना मोठे चित्र ( bigger picture ) दाखवून सांगितले की तुम्ही मोठे नेते ( _A Great Leader_ ) आहात , तुम्ही बाहेरच्या देशांची मदत घेऊन ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारावे  .नंतर आझाद हिंद सेनेच्या रेट्याने व हीच प्रेरणा घेऊन नौदल व इतर सैन्यदलाने बंड केल्याने ब्रिटिश हतबल झाले व  भारताला स्वातंत्र्य मिळाले  हा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच . 
सावरकरांना _कल्पनेच्या विश्वात_ रमणे मान्य नसायचे .स्वतःच्या जीवनात खूप कठोर अनुभव घेतले असल्याने त्यांना व्यवहार पक्का ठाऊक होता . 

 *हिशोबी सावरकर*

सावरकर  रोजच्या जीवनात खूप काटकसरी व हिशोबी होते .स्वतः करत असलेले सर्व पैशाचे व्यवहार ते टिपून ठेवत _.हिशोबातला घोळ_ त्यांना बिलकुल खपत नसे .हिंदू महासभेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी संस्थेचे सर्व व्यवहार बिनचूक ठेवले होते .तसेच त्यांचे राहणीमान खूप साधे होते, गरजा मुळातच कमी ठेवल्या  होत्या .त्यांना ' *व्यक्तिपूजा करणे* 'या प्रकाराचा तिटकारा होता . ते स्वतः सांगत की माझ्यावरही _आंधळेपणाने_ विश्वास ठेवू नका . सावरकर कधीही , " _मलाच मान-सन्मान_ _द्या "_ , असे म्हणत कुणाच्याही मागे लागले नाही . त्याचवेळी स्वतःचे विचार ते ठामपणे मांडत .अंदमानात एवढे प्रचंड कष्ट व हालअपेष्टा भोगूनही क्रांतिकार्याच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळेल यावर ते ठाम होते .
आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असे . त्यांनी कधीही चुकीच्या मार्गाने संपत्ती गोळा केली नाही  वा आपल्या _लोकप्रियतेचा फायदा_ आपल्या मुलांना करून दिला नाही .{ सावरकरांच्या आत्ताची जी  पिढी आहे ते  सर्वसामान्य लोकांप्रमाणे नोकरी करतात. ) स्वतः गांधीजी , गांधींचे शिष्य लालबहादूर शास्त्री असेच कठोर प्रामाणिक व देशभक्त होते .आज मागे वळून विचार केला तर दुःख वाटते  की ही साधनशुचिता व राजकीय काम काम करताना भ्रष्टाचार रहित जगणे  ( जे गांधीजींना  देखील अपेक्षित होते ) , स्वातंत्र्यानंतर कुठल्याच च्या पुढाऱ्यांनी पाळली नाही ( अपवाद वगळता) .

 *लोकहीत महत्वाचे* ! 

वीर सावरकर कधीही आयुष्यात लोकप्रियतेच्या मागे लागले नाही .स्वतःच्या विरोधात होणाऱ्या अपप्रचारालाही त्यांनी कधी विरोध केला नाही .लोकप्रियतेपेक्षा त्यांनी लोकहीत सदैव जपले .म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भयंकर टीका होत असूनही हिंदूंना ब्रिटिशांच्या सैन्यात भरती होण्यास सांगितले .त्याचाच फायदा एक प्रशिक्षित सैन्य तयार झाले व त्याचा उपयोग भारताला पुढे पाकिस्तान बरोबरच्या युद्धात झाला . 

तर असे हे _द्रष्टे सावरकर_ ! अनेक गुण असूनही व सदैव देशाचाच विचार मनात बाळगूनही  त्यांना मुद्दाम  दुर्लक्षित  करण्यात आले .पण सत्य लपून राहत नसते , सद्गुण सूर्याच्या तेजासारखे तळपल्याशिवाय राहत नाही . 
या लेखाबरोबर  मी फोटोसाहित काही संदर्भ देतोय . सावरकर लंडन मध्ये जेथे राहत होते , ते घर ब्रिटिशांनी देखील जपले आहे व त्यावर स्पष्ट लिहले आहे " *VIYATMYAK DAMODAR* **SAVARKAR* 
 *1883-1966*  * , *The* *great indian _philosopher*_ *and Indian* *_Patriot_* *lived* *here** "म्हणजे ब्रिटिश हे सावरकरांचे शत्रू असूनही त्यांना किती किमंत देत होते हे दिसते . तसेच अजून एक त्यावेळच्या वृत्तपत्राचे कात्रण जोडतोय त्यातही  पत्रकाराने त्यांचा उल्लेख " *देशभक्त* *सावरकर* " असाच केलाय . याचवेळी आपल्या देशात सावरकरांवर विविध प्रकारचे खोटे आरोप केले जातात ,ते ही  आपल्याच लोकांकडून ! हे केवढे दुर्दैव आपल्या देशाचे ! पण वाचकहो हे  चित्र आता  आपण बदलायचे आहे . 
आज सावरकरांचे  पूर्ण आयुष्य नव्याने व खोलात जाऊन   अभ्यासणे गरजेचे आहे , त्यांचे विचार काळाच्या पुढे जाणारे होते व त्या विचारांना समोर ठेऊन जर आपला देश चालला तर निश्चितच परमवैभवाचे शिखर गाठेल ! 


 _"_सावरकर समजून घेताना"_
 या लेखमालेचा मूळ उद्देश तोच आहे की सोप्या व सरळ भाषेत सावरकर लोकांना समजून सांगणे व जे योग्य व सत्य आहे ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविणे . 
धन्यवाद 🙏
( हा लेख लिहताना संदर्भ ग्रंथ जे वाचले ते म्हणजे , ' आठवणी अंगाराच्या - विश्वास सावरकर , स्वातंत्र्यवीर सावरकर- धनंजय किर ) 

या पुढचा लेख  व चौथे पुष्प आम्ही घेऊन येत आहोत 
" _सावरकरांच्या नजरेतून हिंदूराष्ट्र_ " 

© हेमंत सदाशिव सांबरे 
दिनांक - ०२/०४/२०२१. 
Contact - *9922992370 .* 
{ लेख कसा वाटला याच्या प्रतिक्रिया वाचक माझ्या वरील क्रमांकावर फोन करून/Whatsapp करून नक्की कळवा } 

याआधी चे दोन भाग वाचण्यासाठी इच्छुक वाचकांनी खाली दिलेल्या माझ्या ब्लॉगच्या लिंकवर भेट द्यावी ही विनंती 👇👇
.सावरकर समजून घेताना 
पुष्प पाहिले 

https://hemant-sambare.blogspot.com/2020/05/blog-post.html

सावरकर समजून घेताना 
पुष्प दुसरे 
अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलक सावरकर 
https://hemant-sambare.blogspot.com/2021/02/blog-post.html

Comments

  1. खूप छान व विस्तृत लिखाण हेमंत जी 👍 हे महान कार्य निरंतर सुरु ठेवावे ही इच्छा 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर