धनंजय माने इथेच राहतात का ??
या जगात आपल्याला रडवणारे लोक तर आपल्या आजूबाजूला खूप भेटतात पण खूप कमी लोक आपल्याला हसवतात,काही क्षण दुःख, यातना विसरायला लावतात,त्यापैकी एका महान कलाकाराबद्दल आज मी या लेखातुन माझ्या भावना तुम्हांसमोर मांडणार आहे.
अशोक सराफ हे नाव घेतले की प्रथम , नकळत आपल्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य उमटू लागते , नंतर आपल्या मनात काही सुखद आठवणी जाग्या होऊन आपल्याला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागतात .कारण नुसता अशोक सराफचा चेहरा जरी समोर आला तरी त्याच्या चित्रपटातील विनोद आठवायला सुरुवात होतात , हा अनुभव तुम्हालाही आलाय ना ? 😊
म्हणूनच अ-शोक म्हणजे ज्याला बघूनच सारा शोक (दुःख ) पळून जाईल व ज्याच्या फक्त आडनावातच सराफ असले म्हणून काय झाले ? हास्यरसाचे सोने रसिकांना भरभरून वाटले तो तुमचा आमचा लाडका हा *अशोक सराफ* !
दुसऱ्याला प्रचंड व लोटपोट हसविणारा हा मात्र स्वतः गंभीर दिसायचा ....बहुधा सर्वश्रेष्ठ विनोद निर्माण करताना गंभीरपणे राहावे लागत असेल का 🤔 . अशोकच एके ठिकाणी म्हणतो की , " आपले काम करताना आपण खूप प्रामाणिक असले पाहिजे , व जीव ओतून काम केले पाहिजे ." हीच वृत्ती त्याच्या विनोद निर्मिती मध्ये दिसून येते , म्हणूनच हा अशोक आपल्याला प्रचंड भावतो .
मला तर अजूनही आठवते आम्ही लहान असताना दर रविवारी ठीक चार वाजता सह्याद्री चॅनेल वर मराठी चित्रपट लागायचा .बहुधा तो लक्ष्या-अशोकचाच असायचा .
.. आणि ही रविवारची संध्याकाळ त्यावेळच्या आयुष्याचा एक अविभाज्य व अविस्मरणीय भाग बनून गेला होता .. ( बऱ्याच वाचकांना हे आठवत असेलच ) . हे चित्रपट म्हणजे एखाद्या मेजवानी सारखेच वाटत व त्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो , कारण तेव्हा आत्ता सारखे भारंभार चॅनेल चा भडिमार नव्हता . शिवाय हे चित्रपट म्हणजे संपुर्ण कुटुंबाने एकत्र बसून हास्याचा खजिना लुटण्याची अपुर्व पर्वणी असायची .
खरेतर अशोकने (इथे मी लेखनाच्या सोयीसाठी थोडेसे एकेरी संबोधन वापरतो , बाकी अशोक सराफ म्हणजे ग्रेटच आहे असेच मी मानतो , जसे आपण मानता 🙏) आयुष्यभर ' अभिनय एके अभिनय ' च केला , कारण त्याला खूप आधीपासूनच स्वतःची ताकद माहीत असावी . यावरून मला किशोर कुमारचा एक किस्सा आठवला .सुरुवातीला किशोर कुमार सगळेच करू बघत होता , त्याचा झुमरू किंवा 'दूर गगन की छाव मे' आठवा बरे ! त्यात सबकुछ किशोरदाच ! पण नंतर अशोक म्हणजे दादामुनी (अशोक कुमार ) ने त्याचे *कान* उपटले व *गळ्यावर* लक्ष दे असे सांगितले . मग आपल्या इंडस्ट्री ला किशोर कुमार मिळाला . पण अशोक सराफने त्याच्यात इतर अनेक गुण असूनही फक्त अभिनय सोडून काहीही केले नाही .(निदान मला वाटते की अशोक सराफ एक चांगला लेखक ही होऊ शकला असता , असो ) . पण याच focussed राहण्याने आपल्याला एक सर्वश्रेष्ठ अभिनेता मिळाला .
अशोकचा प्रवास खूप आधी म्हणजे १९६९ मध्ये जानकी चित्रपटाने सुरू झाला असला तरी त्याची अभिनयाची ताकद बघायला मिळाली १९७५ मधल्या दादा कोंडके च्या , " पांडू हवालदार " मधील सखाराम हवालदार मध्ये ! या पिक्चर ने अशोकला खरा स्टारडम मिळाला . हिंदीतील अशोक सराफ म्हणजे अमिताभ बच्चन ( इथे मी आपला थोडा उलटा क्रम लावलाय , त्यामुळे हे वाक्य परत वाचा , आपल्या मराठी माणसाला आपणच कमी का समजायचे ?😂😂😊) चा ही शोले १९७५ चाच चित्रपट ! म्हणजे या दोघांचंही प्रवास समांतर चालू झाला होता ... पांडू हवालदार मध्ये तर अशोकने दादांना ही चितपट केले , मग दादांनीही ' राम राम गंगाराम ' नंतर अशोकला कायमचा रामराम केला 😜. पण अशोकची गाडी सुसाट सुटली होती . अशोकची चित्रपट सृष्टीत मागणी वाढली होती . पण त्याचवेळी मराठीत चांगले व दर्जेदार व प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणतील असे चित्रपट तयार होणेच जणू बंद झाले होते .
१९८० चे दशक उलटल्यावर मराठी चित्रपट अडगळीत पडल्यासारखा झाला होता . त्यात मराठी माणसाला हिंदी ही खूप चांगले समजते , त्यामुळे बराच प्रेक्षक हिंदीकडे वळाला होता .अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन बनून मोठा पडदा खाऊन टाकत होता . चित्रपटगृहे मराठी माणसाला पारखे झाले होते .मराठी चित्रपट आता संपलाच असे वाटू लागले होते . त्याचवेळी २३ सप्टेंबर १९८७ ला सचिन दिग्दर्शित , " *अशी ही* *बनवाबनवी* " प्रदर्शित झाला . या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला त्याचा सुवर्णकाळ परत मिळवून दिला . 'भाड्याचे घर मिळविणे' इतक्या साध्या विषयाभोवती फिरणाऱ्या या कथेने महाराष्ट्रात धुमाकूळ उडवला . वसंत सबनीस यांचे संवाद म्हणजे चटपटीत मेजवानी होती . ' धनंजय माने इथेच रहातात का ?' , ' हा माझा बायको पार्वती ' , ' सत्तर रुपये वारले ' इ संवाद आजही प्रत्येक मराठी माणसाला पाठ आहेत ( आम्ही तर बनवाबनवी कमीत कमी ५० वेळा तरी बघितला असेल ) . असे म्हणतात की ८७ साली या चित्रपटाने तीन रुपयांचे तिकीट असताना तीन कोटीची कमाई केली होती , म्हणजे करा गणित, त्यावेळी एक कोटी लोकांनी हा चित्रपट , थेटरात जाऊन बघितला होता ! 👍.
अशोकने तर या चित्रपटात धमाल उडवून दिली होती , पण हा चित्रपट म्हणजे एक टीम वर्क होते .यात लक्ष्या , सचिन , सुधीर जोशी या सगळ्याचा वाटा ही तितकाच होता . स्वतः अशोक एके ठिकाणी या चित्रपटाचे श्रेय मोकळेपणाने वसंत सबनीस यांच्या संवादांना देऊन मोकळा होतो . ' सगळेच काही उत्तम जमून येणे ' म्हणजे काय तर 'बनवाबनवी' होता .
बनवाबनवी च्या थोडा आधी धुमधडाका आला होता .महेश कोठारेच्या या चित्रपटाला ही मराठी रसिकांच्या मनात एक विशिष्ट स्थान आहे . तिकडे जगाला बिल गेट्स , झुकेरबर्ग इ लोक कितीही श्रीमंत व मोठे वाटू द्या , पण आम्हा मराठी माणसाला *उद्योगभूषण यदुनाथ* *जवळकर* हेच फक्त जवळचे व सगळ्यात श्रीमंत आहेत .असे हे आपले दानवीर ,कर्मवीर, धर्मवीर आणि बरेच काही वीर..अर्थात नवकोट नारायण उद्योग भूषण यदुनाथ जवळकर म्हणजे अगदी 😀 वक्खा विक्खी वुक्खू...
यात यदुनाथ जवळकर त्या वाकडोजी धने ( धनाजी वाकडे हे खरे नाव - अशोक यात शरद तळवलकर किती तुच्छ आहे हे दाखविण्यासाठी त्याचे नाव कधीच सरळ घेत नाही ) ला तुम्ही कसे व किती गरीब आहात हे दाखविताना चहाची बशी ज्याप्रकारे खाली-वर , वर खाली अशी हलवतो ते दृश्य म्हणजे कळस आहे कळस ! मला नाही वाटत की त्यानंतर यापेक्षा कुणी कुणाला इतके तुच्छ लेखले असेल 😜😜. *धुमधडाका* तर मला असा व इतका आवडतो की ,कितीही वेळा बघा त्यातली अवीट गोडी संपत नाही , व दरवेळी कुठला तरी नवीन विनोद क्लिक होतो मग असे वाटते ' अरे हे मागच्या वेळी आपल्या लक्षात कसे आले नाही बरे 🤔शिवाय परत परत बघून ही कंटाळा मात्र कधीच येत नाही .
धुमधडाका मध्ये अजून एक गंमत आहे .यात निवेदिता सराफ यदुनाथ जवळकरांच्या पाया पडते ,तेव्हा अशोक तिला आशीर्वाद देतो की , " तुला तुझा इच्छित वर प्राप्त होवो " , पुढे जाऊन प्रत्यक्षात निवेदिता- अशोक चे लग्न होते .
धुमधडाका नंतर मला अशोकचा ' फेकाफेकी ' हा चित्रपट ही खुप आवडतो . यात लक्ष्या-अशोक या जोडगोळीने नेहमीसारखी धमाल उडवून दिली आहे . यातले अशोकचे कॅरेक्टर आहे , ' संशयी बायकोचा नवरा ' . फेकाफेकी हा अतिशय सुंदर चित्रपट असूनही त्यामानाने दुर्लक्षित राहिला असे मला वाटते ..सतत खोटे बोलावे लागल्याने कशी मज्जा येते हे फार भारी दाखविले आहे ..
खरेतर विनोद निर्माण करणे व दुसऱ्याला हसविणे हे महाकर्मकठीण काम आहे .कारण दुःख गोंजारत बसणे व त्याचा बाऊ करणे हा मानवी स्वभाव आहे . अशोक सराफ हा टायमिंग चा सम्राट आहे . अभिनय म्हणजे लेखकाने लिहलेले शब्द व दिग्दर्शकाला हव्या असलेल्या गोष्टींचे जिवंत सादरीकरण ! अशोक सराफ या सर्व अपेक्षांच्या कित्येक पावले पुढेच असतो . वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करणे यात तो मास्टर आहे . अशोक सराफ ' सुस्कारा' देखील कसा सोडतो , हे बघाच😂 . ( प्रत्येक चित्रपटात किमान दोनदा तरी तो सुस्कारा सोडतो😄😄 ) .एखाद्या ठिकाणी उभे असताना , आधार आहे असे समजून टेकण्याचा प्रयत्न करणे व पडायला लागल्यावर परत उभे राहण्याची धडपड ( ही ट्रिक लक्ष्या ही बऱ्याच वेळा वापरतो ) , शर्ट ची वरची गुंडी उघडी ठेवूनही सभ्य वाटू शकण्याची कला ( प्रत्येक चित्रपटात अशोक सराफ ची गुंडी उघडी , हे का ? हे मला अजूनही कळले नाही ) , कुठल्या शब्दावर किती जोर द्यावा याबद्दलचे अचूक अंदाज ( जसे हे वाक्य , ' यावर मी *काय* बोलणार ? म्हणताना , ' _काय'_ या शब्दावर जोर देऊन बोलणे ) . आपणच किती योग्य व बरोबर (कितीही चूक असले तरी ) हे आत्मविश्वासाने दाखवणे. बोलताना घशातून वेगवेगळे आवाज काढणे . अशा किती लकबी , आणि किती प्रकारचे हेल ! डान्स करता येत नाही हे पक्के माहीत असूनही केवळ ठेका व लय ( Rhythm ) याच्या जोरावर डान्स करणे ( अश्विनी ये ना , अग अग म्हशी , दत्तू मेला इ क्लासिक उदाहरणे ) कायिक व वाचिक ( शरीर व संवाद याद्वारे केला जाणारा - Body language & Speaking Pattern ) अभिनय कसा असावा यासाठी ' अशोक सराफ ' म्हणजे एकटाच ' एक आख्खे विद्यापीठ (University )' आहे . पण मला कधीकधी वाटते आपण मराठी माणूस आपल्याच मराठी माणसाचे कौतुक करायला कमी पडतो . तिकडे बॉलिवूड , हॉलीवूड कडे योग्यता नसतानाही प्रचंड कौतुक पैसे देऊन विकत घेतात .
आपणास हे माहीत आहे का ? महान गायक किशोर कुमार यांनी मराठीतील पहिले गाणे अशोक सराफसाठी गायले आहे . ते म्हणजे , " *अश्विनी ये ना* " हे गमंत जंमत मधील गाणे ! त्यानंतर ' तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास ' हे माझा पती करोडपती मधील गाणे ! किशोर दा ना मराठी तील "ळ" व " च " अक्षरे उच्चारता येत नसल्याने त्यांनी हे दोन अक्षरे नसतील तरच मी गाईन अशी अट ठेवली होती .. किशोर दा यांनी नंतर मराठीत अजूनही गायचे ठरवले होते , पण दुर्दैवाने त्यांचे त्याचदरम्यान निधन झाले .
काही दिग्दर्शकांनी प्रसंगाच्या गरजेनुसार अशोक कडून गाणी ही गावून घेतली आहेत ..त्यातली ठळक म्हणजे , ' कळत नकळत ' मधील , 'नाकावरच्या रागाला औषध काय ' हे तसेच , ' मी असा कसा , असाकसा वेगळा , वेगळा ' ही गाणी ! तर हा असा अशोक त्याने या गायकाच्या भूमिकेत ही चपखल बसून आपली ' अशोक सराफ ' टाइप छाप तिथेही पाडलीच ! या गाण्यांनाही मराठी रसिकांनी डोक्यावर घेतले व आजही ही गाणी अशोक सराफ ने गायलेली गाणी म्हणूनच लक्षात आहेत.
अशोकने जसा नायक (बऱ्याचदा विनोदी ) उभा केला तितक्याच ताकदीने खलनायक ही उभा केला .पंढरीची वारी मधील त्याचा खलनायक त्याचा राग येऊ नये अशी इच्छा असतानाही(कारण विनोदी अशोक मनात असतो ) आपल्याला राग आणतोच. अनपेक्षित या नितीश भारद्वाज बरोबरील चित्रपटात ही त्याने खूप चांगला व्हिलन रंगवला आहे . वजीर मधील बेरकी राजकारणी तर उत्तमच !
भावनिक भूमिका अशोकच्या वाट्याला कमीच आल्या , पण ज्या आल्या त्यात त्या भूमिकांचं सोने झाले. जसा ' आपली माणसं' मधील वडिलांची भूमिका , अलीकडच्या काळातील ' एक उनाड दिवस ' मधील लक्षणीय भूमिका !
बाकी हिंदीत काम केलेला अशोक सराफ काही अपवाद वगळता मला फारसा आवडला नाही .कारण हिंदीवाले आपल्या मराठी नटाला नोकर , साईड हिरो इ भूमिका देतात . बाकी येस बॉस मधील शाहरुख चा मित्र ( बाकी शाहरुख चा ही मला आवडणारा येस बॉस हाच एकमेव चित्रपट ) , आणि सिंघम मधील हवालदार याच काय त्या चांगल्या भूमिका ! तसेच छोट्या पडद्यावर 'हम पाच' ही सिरीयल खास अशोक सराफ ची म्हणूनच गाजली होती .
बनवाबनवी मध्ये लक्ष्याला , " *धनंजय माने इथेच राहतात का ?"* हा प्रश्न वारंवार पडला होता (😂😂) व त्यात धनंजय मानेला नवीन घर शोधत फिरावे लागले होते , पण त्यानंतर मात्र करोडो मराठी रसिकांनी धनंजय मानेची ही समस्या कायमची सोडवून टाकली .कारण तुमच्या माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसांनी या ' *धनंजय माने* ' ला कायमचे आपल्या *हृदयात* राहायला घर दिले . त्यानंतर मात्र धनंजय मानेला नवीन घर शोधावे लागले नाही , पण दुर्दैव आपले हा प्रश्न विचारणारा "प्रिय लक्ष्या " मात्र आपल्याला कायमचा सोडून गेला आहे .
अशोक सराफ चा हा ५० हुन अधिक जास्त वर्षांचा हा प्रवास आहे , तो एखाद्या अशा छोट्या लेखात खरंच कसा मांडणार ? एखादा खूप मोठा वृक्ष असतो, त्याच्या फांद्या अगदी आकाशाला गवसणी घालतात , पण त्याची मुळे मात्र जमिनीत खोलवर जातच राहतात , अगदी तसाच अशोक सराफचा अभिनय आहे .जितका उंच , तितकाच खोल! जितका विशाल , तितकाच सुक्ष्म व अचूक ! जितका लाऊड तितकाच नम्र ही ! इतकी विविधता असूनही अशोक सराफ त्या त्या भूमिकेत चपखल बसतो ! आणि हाच तो 'अशोक सराफ ' आहे तो दिसायला सर्वसामान्य असूनही त्याचा अभिनय मात्र सर्वमान्य व लोकमान्य आहे .
अशोक सराफ फक्त अशोक सराफ नाही तर तो म्हणजे त्याने जिवंत केलेले प्रत्येक कॅरेक्टर आहे . मग तो धनंजय माने असो किंवा यदुनाथ जवळकर असेल , फेकाफेकी तील राजन असेल , पंढरीची वारी खुनशी खलनायक असेल ,वजीर मधील राजकारणी असेल गुपचूप गुपचूप मधील प्रा धोंड असेल ! आणि अजूनही बराच कोणी !
अशोक सराफ यांचे शब्दचरित्र थोडक्यात मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे . यात बरेच काही मांडले आहे , पण बरेच काही निसटले ही असेल ( विस्तार भयास्तव ) , पण जे काही मांडले ते वाचकांना नक्कीच आवडेल ही आशा 🙏.
जगाच्या पाठीवर *मराठी भाषा* जाणणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' निर्माण करणाऱ्या अश्या सर्वांच्या लाडक्या अशोक सराफांचा हा महाराष्ट्र सदैव ऋणी राहील.
"© हेमंत सदाशिव सांबरे
Contact - 9922992370 .
छान विषय निवडला.
ReplyDeleteसाऊथ मध्ये अशोक सराफ असता तर रजनीकांत सारखा प्रचंड लोकप्रिय झाला असता
ReplyDelete1001% अग्री
Deleteखूप छान...असेच वेगवेगळ्या विषयांवर लिहीत जा
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteखुप छान हेमंत
ReplyDeleteछान लेख 👍
ReplyDeleteखूप छान विषय मांडणी 👍👍👍
ReplyDeleteखुप छान हेमंत
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
Deleteअप्रतिम लेख
ReplyDeleteअप्रतिम.
ReplyDeleteKhupach Chan.....
ReplyDeleteफारच सुंदर लिखाण आहे
ReplyDeleteछानच
ReplyDeleteखुपच छान .! मराठी चित्रपट सृष्टीचा पूर्ण ३०-४० वर्षांचा ईतिहासच सर्वां समोर ठेवलात की ..!!
ReplyDeleteखूप छान लिहिलंय. असेच लिहिते व्हा, लिहिते रहा.
ReplyDeleteराजीव जतकर
खुपच मार्मिक मांडणी केली
ReplyDeleteexcellent article
ReplyDeleteखुप छान मस्तच लिहिले आहे
ReplyDeleteफारच सुंदर माहिती
ReplyDeleteAtishay sunder lekh
ReplyDeleteKhupch bhari
ReplyDelete