रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

*रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ?* 
-हेमंत सांबरे .
                 आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून या १५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वर्षे पुर्ण होत आहेत ...हा दिवस पूर्ण भारतात अतिशय उत्साह व आनंदाने साजरा होत आहे . पण त्याचवेळी ज्या थोर क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबून आपल्या देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले , त्यांच्या बद्दल आपणास किती माहिती असते ? किंबहुना आजतागायत ही माहिती आपणापासून दडवून ठेवण्याचाच प्रयत्न झाला का ?  ज्या देशातला खरा इतिहास लपविला जातो व खऱ्या पराक्रमी लोकांची माहिती जर नव्या पिढीला माहीत करून दिले नाही तर त्या देशातले पौरुष व पराक्रम  संपून तो देश परत पारतंत्र्यात जाण्याची शक्यता निर्माण होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एके ठिकाणी म्हणतात की ,'जो देश इतिहासाचा अभ्यास करत नाही , त्यापासून काही शिकत नाही तो देश रसातळाला जातो ',  म्हणूनच वाचकहो आज आपण काही भारतीय क्रांतिकारक मंडळींच्या माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत . 

हे क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग , सुखदेव , राजगुरू , बटुकेश्वर दत्त , चंद्रशेखर आझाद इ होय .

 हे सर्वजण एकाच वेळी , एकाच संघटनेचे सदस्य होते व सर्वांनी देशासाठी मरण्या-मारण्याची शपथ घेतली होती . 

चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव *चंद्रशेखर सीताराम  तिवारी ,* त्यांचे मूळ गाव भावरा हे मध्यप्रदेश  राज्यातील . त्यांचा जन्म २३ जुलै १९०६ या रोजी झाला .  लहानपणापासूनच आझाद खूप पराक्रमी व हूड होते . आझाद यांनी ब्रिटिश पोलिसांच्या हातात कधीच जिवंतपणी लागणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती व त्याचप्रमाणे शेवटच्या क्षणी अलाहाबाद (आत्ताचे प्रयागराज)  येथील पार्क मध्ये पोलिसांशी लढता लढता त्यांना वीरमरण आले .मरण्याआधी त्यांनी तीन पोलिसांना यमसदनी धाडले व शेवटी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून स्वतःस गोळी झाडून घेतली . त्या काळात ते अनेक क्रांतिकारकांचे गुरू व मार्गदर्शक होते . 

राजगुरू यांचे पूर्ण नाव *शिवराम* *हरी राजगुरू* . त्यांचा जन्म खेड ( आत्ताचे राजगुरूनगर ) येथे २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला . राजगुरू हे अतिशय विचारांचे दृढ , शरीराने व मनाने बलदंड असे होते .लहानपणी स्वतःला मजबूत बनविण्यासाठी ते अनेक प्रयोग करत . जसे रात्रीच्या वेळी  स्मशानात जाऊन झोपणे , कित्येक मैल पळत जाणे , उघड्या अंगाने भर थंडीत झोपून दाखवणे , जळत्या चिमणी वर हात ठेवून तोंडातून वेदनेचा एक शब्द ही बाहेर न काढणे इ .पुढे जाऊन त्यांना करायचं असलेल्या क्रांतिकार्यासाठीची ही पूर्वतयारी होती .असा हा महान देशभक्त तुमच्या आमच्या महाराष्ट्रातील असूनही आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय तुटपुंजी माहिती असते . राजगुरू यांनी काशी येथे जाऊन संस्कृतचे शास्रशुद्ध शिक्षण घेतले होते . शास्त्र बरोबर शस्त्र ही चालविण्यात ते निपुण होते . त्यांचे सहकारी सांगत की उलटे झोपून ही त्यांच्या  पिस्तुलाचा नेम अगदी  अचूक  असायचा .तसेच शब्दवेध कसा करायचा हे ही त्यांना अवगत होते ( इतिहासात सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी अशाच प्रकारे शब्दवेधी बाणाने घोरीचा वध केला होता ) . पुढे जाऊन जेव्हा भगतसिंग , राजगुरू यांनी लाहोरला सौन्डर्स या इंग्रज  अधिकाऱ्याचा वध केला तेव्हाही राजगुरूंनी लांबूनच एकाच गोळीत त्याच्या कपाळाचा वेध घेतला व त्याला ठार मारले . असे हे राजगुरू पुढे जेव्हा पुणे येथे पकडले गेले , त्यानंतर पोलिसांनी त्यांचा अनेक  प्रकारे छळ केला . त्यांना बर्फाच्या लादीवर कित्येक तास  झोपवले , डोळ्यांत तिखट घातले , खिळे मारलेल्या बुटांनी लाथा मारल्या , चारही बाजूने शेगड्या पेटवून त्यामध्ये बसवले , विष्ठा  ( संडास ) भरलेल्या टोपल्या अंगावर ओतल्या , इंद्रिये पिरगाळली ( हे आपल्याला व आत्ताच्या पिढीला  माहीत पाहिजे की आपले खरे हिरो हेच क्रांतिकारक आहेत , न की बॉलिवूड चे हिरो ) . एवढा छळ करूनही राजगुरू बधले नाही की त्यांनी कोणतीही माहिती फुटू दिली नाही ..हे होते खरे शौर्य ,  हे होते आपले खरे पराक्रमी पुरुष ज्यांचा आदर्श आपण बाळगावा असे मला मनापासून वाटते . 

सुखदेव यांचे पूर्ण नाव *सुखदेव* *लाला थापर* . त्यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी पंजाब मधील लायपूर येथे झाला . सुखदेव १२ वर्षाचे असताना १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले . त्यावेळी हे १२ वर्षांचे सुखदेव आपल्या काकांना( आचितराम )भेटण्यासाठी कारागृहात गेले तेव्हा त्यांनी आपल्या काकांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना सलाम करणार नाही हे ठामपणे सांगितले .सुखदेव व भगतसिंग यांची ओळख लाहोर येथील नॅशनल कॉलेजमध्ये झाली . दोघांनीही देशासाठी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला व या निर्णयावर ते ठाम राहिले .सुखदेव यांची स्मरणशक्ती अफाट होती , एखादे तत्वज्ञान चे पुस्तक ते दोन दिवसांत वाचून काढत व त्यातले संदर्भ पटापट सांगत .तर असे हे क्रांतिकारक कुशाग्र बुद्धीचे होते व त्यांनी क्रांतिकार्य न करता सामान्य जगले असते तर खोऱ्याने पैसा कमावला असता पण त्यांनी तुमच्या-आमच्या साठी अतोनात छळ सहन केला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले .
२३ मार्च १९३१ या दिवशी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली , पण त्यामुळे हा क्रांतीचा यज्ञ थंड न होता अजून पेटून उठला . 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या काही पिढ्या आम्हाला खोटेच सांगितले गेले की फक्त अहिंसेच्या मार्गाने आम्हाला स्वातंत्र्य मिळाले .पण त्यामुळे या *खऱ्या* *वीरांचा* इतिहास आम्हाला सांगितलं गेलाच नाही .खरे तर ब्रिटिशांनी युद्ध करूनच मराठेशाही कडून आपला  प्रिय भारत देश ताब्यात घेतला होता ,तर असे हे साम , दाम , दंड , भेद अशा सर्वच मार्गांचा अवलंब करणारे  इंग्रज फक्त अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य परत द्यायला काय मूर्ख होते का ? अगदी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापासून , वासुदेव बळवंत फडके , चापेकर बंधू  , स्वातंत्र्यवीर सावरकर , अनंत कान्हेरे , मदनलाल धिंग्रा , चंद्रशेखर आझाद , भगतसिंग , सुखदेव , राजगुरू  ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या थोर क्रांतिकारकांनी ही क्रांतीची मशाल सतत पेटती ठेवल्यानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले  . कारण अहिंसेने ऐकायला ब्रिटिश काय भारतात पर्यटन करायला आले होते का ? शस्राला शस्राचीच भाषा समजते . आझाद हिंद सेनेने बाहेरून हल्ला केला , त्याचवेळी नाविक दलाने ब्रिटिशांना सहकार्य करण्यास नकार दिला व दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज साम्राज्य खिळखिळे झाले व भारतात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला .

 *स्वातंत्र्य कवी गोविंद*( हे सावरकर बंधूंचे मित्र व सहकारी होते )  यांनी एक कविता लिहली होती , " रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? "  या कवितेने तेव्हा इंग्रज सरकारचें धाबे दणाणले होते .याच कवितेच्या प्रसिद्धी साठी व छपाई साठी बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती .यावरून लक्षात येईल की या कवितेचा किती प्रचंड धसका त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने घेतला असावा .. या कवितेचा आशय सरळ होता की इतिहासात देखील  कुठल्याही देशाला युद्ध केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही, तसेच  ते हिंदुस्थानास देखील मिळायचे नाही .सशस्त्र क्रांती केली तरच त्वरेने आपण स्वातंत्र्याच्या जवळ जाऊ . तर ही    जहाल कविताच येथे आम्ही पूर्ण *अर्थासहित*  देत आहोत व सांगू इच्छितो की *शस्रसज्ज* व *सामर्थ्यशाली*  देशांच्या तोंडीच शांतीची भाषा शोभून दिसते . 
(स्वातंत्र्यकवी गोविंद उर्फ आबा दरेकर ) 

 *रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ?* 
                 -स्वातंत्र्यकवी गोविंद .


घनश्याम श्रीराम कां मूढ होता?
कराया स्वमाता मही दास्य मुक्ता।
वृथा कां तयानें तदा युद्ध केलें? 
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।१।।

किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी।
बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी।
तधीं काय तद्राज्य झोळीत आलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।। २।।

तुम्ही मेळविला कसा राष्ट्र-मोक्ष।
विचारा असे ग्रीक लोकां समक्ष।
न युद्धाविना मार्ग मोक्षा निराळे।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ?।।३।।

खलांच्या बलांच्या धरुनी भयाला।
प्रतिकार मेंगा स्विसांनी न केला।
झणी ते सुसंग्राम यज्ञा निघाले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।४।।

नमीना रिपुंना अहो ! टायरोल।
वरीना भिकेला अहो! टायरोल।
स्वखड्गास त्याने परी प्रार्थियेले|
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?।।५।।

करावा परांचा वृथा प्राण नाश।
अशी होति कां? हौस त्या श्री शिवास।
किती बंधुंचे रक्तबिंदू गळाले|
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।६।।

तशा स्थापुनी गुप्त संस्था सुवेळी।
रणीं झुंजली वीरशाली इटाली।
तिला हांक मारीत मांगल्य आलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।७।।

अहो ! तेंच केलें अमेरिकनांनी।
दिली देश-दास्या गचांडी लढोनी।
तदा दास्यते पुर्वभागी पळालें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।८।।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।९।।
____________________________
नेदरांनी – नेदरलँड्सच्या लोकांनी, डचांनी
भिक्षेश्वरांनी – डच क्रांतीकारकांनी भिकाऱ्यांची संस्था हे आपल्या गुप्त संस्थेचे नाव ठेविले होते, त्यास उद्देशून हा शब्द
मेंगा – दुबळा टायरोल – स्वातंत्र्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रियन साम्राज्याशी लढणारा एक लहान प्रदेश.

{ या कवितेवर इंग्रज काळात सदैव बंदी होती ,पण प्रत्येक क्रांतिकारकाला ही कविता तेव्हा  तोंडपाठ असायची .आज मात्र ही कविता काहीशी दुर्लक्षित झाली आहे , या लेखाच्या माध्यमातून तिला पुढे आणण्याचा अल्प प्रयत्न  } 

© हेमंत सदाशिव सांबरे . 
१५ ऑगस्ट २०२१ . 
(भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वे वर्ष व  स्वातंत्र्य दिवस )

Comments

  1. छान कविता, स्तुत्य प्रकाशन
    डॉ सचिन चिंगरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर