जहाज कधी सोडू नकोस !


'जहाज कधी सोडू नकोस !'

वाटेवरती केव्हातरी
गोष्टी चुकत जाणारच, 
दम घोटणारी , न संपणारी 
चढण चटके देणारच .

निर्वाहाचे सारे निधी,
तळापर्यंत पोचलेले 
आणि कर्जाचे टोकदार ढिगारे
आकाशाला भिडलेले 
ओठांवरती  हसण्याभोवती 
सुस्काऱ्यांचा जालीम फास
काळजीपूर्वक चालतानाही
पायाखाली काट्यांची रास ,
थकला असशील...
 बैस जरासा ,
जोड श्वासाला श्वास 
रण सोडण्याचा विचार नको
दिसलं जरी सारंच भकास 

आयुष्याची विचित्रवीणा
किती वळणे किती पीळ,
या शिकण्याच्या धुळाक्षरांना,
पडत नसते खीळ 
पकड सैल होताक्षणी ,
दोरखंडाचा साप होतो 
डोंगरकड्याचा थांग तेव्हा
केसभर दूर असतो
आवेग हरवला गतीचा तरी
गळ्यातल्या सुराला 
देशील दाद
एकाच बुक्कीच्या मुक्कामावर
यशच उभे देईल दाद 

माणसाची दृष्टीच कधी 
इतकी अधू आणि धूसर बनते 
इप्सित शेजारी उभे तरी ,
अनोळखीपणे पुढे निघते 
विजेत्याच्या चषकावर मग,
उमटत नाही यशोखुणा ,
अर्धवट सोडलेल्या झुंजीच्या 
आठवणी कडू, उगारती फणा 
सुवर्ण मुकुटावर उगवतीच्या
दवात भिजली रात्र सरते
हरलेल्या वाटेच्या ,
हताश हाती झळाळीतही
धुकेच उरते 

यश म्हणजे खरं तर अपयशच
खाली डोके वर पाय झालेले 
शंकेखोर  ढगांचे टवके
चंदेरी साज ल्यालेले
धृवबिंदू असा 
क्षणाच्या अंतरावर 
तरीही क्षितिज 
भेडसावतच राहणार
जिथे संपणार सद्दी त्याची 
तिथेही इंगा दाखविणारच 
थंडीने केला जरी काळजावर घाव 
तरी सोडू नकोस वेड्या
मनाचा ठाव 
जेव्हा जेव्हा प्राक्तन आणते 
ब्रह्मसंमधाचा आव 
तिथेच साऱ्या सृजनदेवता 
पटकन घेतात धाव 
हिमविवरात अडकलास तरी
पांढरे निशाण रोवू नकोस 
आली दाटून शेवटची लाट 
तरी जहाज कधी सोडू नकोस ,
आली दाटून शेवटची लाट 
तरी जहाज कधी सोडू नकोस ! 

- आनंद नाडकर्णी 
स्वभाव विभाव या पुस्तकातून

ही कविता माझ्या जुन्या डायरीत सापडली . मूळ इंग्रजी कविता खाली दिली आहे , वरची मराठी कविता म्हणजे आनंद नाडकर्णी यांनी केलेला खूप सुंदर भावानुवाद आहे . 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर