सावरकर कधीही बदलले नव्हतेच !
पण या मधल्या काळात बरेचसे बदल भारतात , इंग्रजांशी लढण्याच्या पद्धतीत होत गेले .पण भारताला स्वातंत्र्य केवळ शस्त्र हाती घेतल्यानेच मिळणार याबद्दल सावरकरांची खात्री होती व ते त्यांनी करून दाखवले .
सावरकरांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज व श्रीकृष्ण हे दोघे होते ..त्यांच्या अनेक कविता , लेखन यांत या दोघांचा वारंवार उल्लेख येतो .
सावरकरांचे शत्रू ब्रिटिश होते व ब्रिटिश सावरकरांना आपले सर्वात ' धोकादायक शत्रू ' मानत होते .ब्रिटिशांना सावरकरांना मोकळे राहू द्यायचे नव्हते , त्याचवेळी सावरकरांना ब्रिटिशांची कैद नको होती .मुक्त राहिलो तरच आपण देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतो हे त्यांना पक्के ठाऊक होते .आणि सावरकर इंग्रजांसाठी इतके धोकादायक होते की ते बाहेर राहिले तर ब्रिटिशांचे साम्राज्य गदगदा हालवून सोडतील इतकी त्यांची क्षमता आहे हे त्यांनाही माहीत होते .
मग सावरकरांना फासावर का लटकावले नाही ?
हा प्रश्न ही साहजिक आहे .तर त्यांना फासावर दिले असते तर क्रांतीचा आगडोंब प्रचंड उसळला असता .कारण या क्षणापर्यंत ( सन १९१० ) सावरकर जगातील सर्व भारतीय क्रांतिकारकांचे प्रमुख नेतृत्व झाले होते , त्यामुळेच अंदमान सारख्या दूरच्या बेटावर त्यांना ५० वर्षे काळे पाण्याची शिक्षा देऊन त्यांना विस्मृतीत ढकलणे ही रणनीती त्यांनी आखली .
सावरकरांनी सुटकेचे किती प्रयत्न केले ?
पहिला प्रयत्न
जून १९१०
इंग्लंडमध्ये सावरकरांचे ब्रिटिश मित्र डेव्हिड गारनेट यांनी त्यांना कारागृहातून न्यायालयात नेत असताना त्यांची सुटका करण्याची योजना आखली .पण ब्रिटिश पोलिसांना याबद्दल कुठून तरी कुणकुण लागण्याने गारनेट , आलड्रेड आणि अनेक आयरिश तसेच फ्रेंच क्रांतिकारकांचा त्यांच्या भारतीय मित्राला सोडविण्याचा हा धाडसी प्रयत्न फसला .
दुसरा प्रयत्न
८ जुलै १९१०
मार्सेलीस ला मारलेली उडी
मोरिया नौकेने सावरकरांना भारतात नेत असताना दिनांक ८ जुलै १९१० रोजी शौचालयात जाण्याच्या बहाण्याने , त्याच्या पोर्टहोल मधून त्यांनी सागरात सुटका करून घेण्याच्या हेतूने उडी मारली .व बंदरावर पोहोचून ते पळू लागले .पण तेथे जवळपास आलेल्या अय्यर ,मादाम कामा व विरेंद्रनाथ यांना सावरकरांच्या जवळ पोहोचायला उशीर झाला व त्याआधीच सावरकरांना परत अटक झाली होती .अशा रीतीने हा प्रयत्न ही फसला .
मग अनेक प्रयत्न !
त्यानंतर सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत ५० वर्षे शिक्षा देऊन डांबण्यात आले .या अशा भयंकर ठिकाणी राहून शिक्षा भोगण्यापेक्षा मृत्यू बरा असे वाटणे साहजिक होते .मृत्य ही सुद्धा एक प्रकारची सुटका होती . पण ते ही त्यांच्या नशिबात नव्हते .
माफीचा साक्षीदार होणे व सुटकेसाठी प्रयत्न करणे यातला फरक काय ?
वाचकांनी सावरकरांनी स्वतः लिहलेले आत्मचरित्र , ' माझी जन्मठेप ' नक्की वाचावे .त्यात सावरकरांनी ब्रिटिशांना अनेकदा , अनेक प्रसंगी पत्रे , विनंत्या , अर्ज इ लिहून अंदमानातून आपली सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले .त्यावेळी काही कैदी ब्रिटिशांच्या दयेचे पात्र होऊन त्यांच्या वेळोवेळी शिक्षा कमी झाल्या किंवा त्यांना सोडून दिले , पण ब्रिटिशांनी सावरकर बंधूंना एक दिवसांच्या ही सुटकेची सवलत दिली नाही . बरे ही सुटका होताना , ' माझ्या सर्व क्रांतिकार्याची व माझ्या सहकाऱ्यांची माहिती देतो , पण माझी सुटका करा' , असे सावरकर कधीही म्हणाले नाही .तशा प्रकारे सुटका करून घेणे यालाच माफीचा साक्षीदार होणे असे म्हणतात .पण सावरकरांनी तशा प्रकारे कधीही विनंती केली नव्हती .मुळात ब्रिटिशांचा सावरकरांवर मुळीच विश्वास नव्हता व त्यांची सुटका म्हणजे ब्रिटिश शासनाला " प्रचंड धोका " हेच त्यांना पक्के माहीत होते . पुढे जाऊन त्यांची पूर्ण सुटका न करता रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध केले ते थेट १९३७ साली वयाच्या ५४ व्या वर्षी पूर्ण मुक्तता मिळाली .
मी खाली वेगवेगळ्या काळात सावरकरांची प्रेरणा घेऊन वा त्यांना आपला प्रत्यक्ष नेता मानून ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्यांची यादीच देत आहे , त्यामुळे सावरकर अंदमानात होते , रत्नागिरीत होते किंवा स्वातंत्र्याआधी मुंबईत होते त्यांनी आपले ध्येय कधीही सोडलेले नव्हते .
बाबाराव सावरकर ( भगूर, नाशिक ते अंदमान )
विष्णू महादेव भट ( नाशिक )
एम पी टी आचार्य , अय्यर , मादाम कामा , मदनलाल धिंग्रा , हरणामसिंग , लाला हरदयाळ (यांनीच पुढे गदर पार्टीची अमेरिकेत स्थापना केली ) , निरंजन पाल , विरेंद्रनाथ चटर्जी, डेव्हिड गारनेट , गाय आलंड्रेड ( सर्वजण लंडन येथील सहकारी )
अनंत कान्हेरे , कर्वे , देशपांडे ( जॅकसन वध ) - नाशिक
अभिनव भारताचे जगभर पसरलेले इतर अज्ञात क्रांतिकारक
भगतसिंग व राजगुरू
नेताजी सुभाषचंद्र बोस
अशी ही यादी खूप मोठी आहे .सावरकरांनी व त्यांच्या बंधूनी अनेक गुप्त मार्गांनी क्रांतीकारकांना मदत सुरूच ठेवली होती .
मुक्त झाल्यानंतर सावरकरांनी लगेच सक्रिय होऊन लोकांना सैन्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करू लागले .कारण त्यानिमित्ताने निशस्त्र भारतीय तरुणांना शस्त्र चालविणे शिकायला मिळेल हे त्यांना माहीत होते . त्यांचे म्हणणे असे होते की योग्य वेळ आली की बंदुकीची दिशा कुठे वळवायची हे ठरविता येईल .दूरदृष्टी असलेल्या सावरकरांनी सुभाषचंद्र बोस यांना ही आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ( म्हणजे जपान ) ची मदत घेऊन सैन्य उभारायला सांगितले . हेच प्रशिक्षण घेतलेले सैन्य नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही आपल्या उपयोगी कसे पडले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे .
म्हणजेच सावरकर कधीही बदलले नव्हतेच ! ते मृत्यूला कधीही घाबरत नव्हते , शिक्षेला ही घाबरत नव्हते पण विनाकारण इंग्रजांच्या कैदेत खितपत पडून सडत राहणे त्यांना कधीही मान्य नव्हते . शिवाय सशस्त्र क्रांतीनेच भारताला स्वातंत्र्य मिळेल हा ही त्यांचा ठाम विश्वास होता .ब्रिटिश ही आपल्या या खऱ्या शत्रूला सदैव ओळखून होते व सावरकरांपासून ते नेहमीच सावध होते .
ब्रिटिश शत्रूचाही आदर करत , म्हणूनच त्यांनी सावरकर ज्या इंडिया हाऊस मध्ये राहत होते त्या ठिकाणी लिहून ठेवले आहे ,
" The Great Indian Patriot and Philosopher V D Savarkar lived here "
आपल्या शत्रूला अत्यंत योग्य प्रकारे ओळखणारे त्यांचे कौतुक करणारे ब्रिटिश !
व आपल्याच देशातील एका श्रेष्ठ नेत्याला व या थोर क्रांतीकारकाला आपण भारतीय कधी ओळखणार ?
हाच फरक आपल्याला मिटवून टाकायचा आहे .
© हेमंत सांबरे
०५ .०८.२०२१ .
व आपल्याच देशातील एका श्रेष्ठ नेत्याला व या थोर क्रांतीकारकाला आपण भारतीय कधी ओळखणार ?
ReplyDeleteYou keep it up writing about him one day come when everyone admitted the greatness of him.
खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेखन
ReplyDelete