एका वाचन वेड्याचा प्रवास -भाग पहिला


एका वाचन वेड्याचा प्रवास- भाग पहिला 
हेमंत सांबरे 

【लेख मोठा झालाय , जे वाचक पूर्ण वाचतील ते ही माझ्यासारखेच वाचन-वेडे आहेत असे समजून चालूया !☺️) 

वाचनाची आवड हे खरे म्हणजे माझ्यासाठी बरेच काही आहे . हा प्रवास आहे व तो सुरूच आहे . कुठलाही प्रवास हा हवाहवासा वाटतो , त्यातल्या  त्यात मला रेल्वेचा , बसचा प्रवास खूप आवडतो , तो कधी संपूच नये असे वाटते .आपल्या प्रवासाचा उद्देश हा ठिकाणापर्यंत ( Destination ) पोहोचणे  हा असला तरी खरा आनंद प्रवासात असतो व तो  जो मिळतो तो भारीच असतो . तसाच माझ्या वाचन-वेडाचा वा वाचन आवडीचा प्रवास शब्दबद्ध करावा असे सहज मनात आले .तसे हे लेखन ' *आत्म-सुखाय* ' असेच आहे .कारण हे लेखन पूर्ण झाल्यावर मलाच खूप आनंद होणार आहे व त्या रम्य , गूढ , अदभुत, रोमांचक  आठवणी कागदावर उतरणे माझ्यासाठी एक श्रेष्ठ अनुभव असणार आहे .

वाचकहो , हा संवाद माझा स्वतःशी जास्त होणार असला तरी तुम्हालाही आवडेल असे मला वाटते . ज्यांना वाचनाची आवड आहे , असे वाचक माझ्याशी नक्कीच जोडले जातील.
आज तरी नक्की आठवत नाही की 'वाचन करणे' ही प्रक्रिया नक्की आयुष्यात कधी सुरू झाली .पण जीवनाला समृद्ध करणारी ही ' सवय ' वा ' आवड' मला लागण्याचे १०० % श्रेय (Credit ) माझ्या प्रिय आईला जाते . आईला ही वाचनाची खूप आवड होती .तिनेच हे 'बी'  माझ्यात पेरले . आणि पेरले नाही तर त्याला  पाणी देणे , खत देणे , त्या छोट्या रोपाची जोपासना करणे हे ही सगळे आईनेच केले .
मी चौथीला गेल्यावर आम्ही झरेकाठी हे गाव सोडून आश्वि येथे राहायला आलो ( ता-संगमनेर , जिल्हा-अहमदनगर ) . येथे आल्यावर आमच्या घरी आईने चांदोबा , चंपक  इ मासिके सुरू केली होती . येथे अजून एक चांगली गोष्ट सकारात्मक (Positive) झाली होती की आम्ही आश्विला जेथे राहत होतो तेथे समोरच पोष्ट ऑफिस ची बिल्डिंग होती , त्यामुळे येथेच अनेक पुस्तके , मासिके , दिवाळी अंक इ ची ओळख झाली . वाचनाची खरी आवड जर लावली असेल तर ती ' *चांदोबा '* या त्यावेळच्या खूप वाचकप्रिय मासिकानेच लावली असे आज तरी वाटते . कारण या मासिकात खूप सुंदर अशी चित्रे असत , त्यात अनेक सुंदर कथा , महाभारत-रामायण इ तील कथा असत .या मासिकातील चित्रांत जी घरे असायची ती खूप स्वच्छ व नीटनेटकी असायची , माणसे ही खूप साधी असायची . काळाच्या ओघात चांदोबा मासिक बंद पडले याचे मला आजही खूप वाईट वाटते . 


आश्वित आम्ही राहायला आल्यावर तेथील ग्रामपंचायत च्या बिल्डिंग मध्ये लायब्ररी होती . त्याची फी परवडणारी असल्याने मी ती ही सुरू केली .या लायब्ररीत जाणे म्हणजे माझ्यासाठी एक आनंद-निधान होते .लायब्ररी कडे जात असताना  एक वेगळीच आनंदाची लहर मनात येत असायची (जे अजूनही मला पक्के लक्षात आहे ) , ही लायब्ररी  दुसऱ्या मजल्यावर होती , तिच्या पायऱ्या  चढताना मनाला  गुदगुल्या होत असत  .खरं तर घरापासून हे पवित्र ठिकाण फारतर पाचशे मीटर वर असेल , पण शरीराच्या आधीच मन  अलगद तिथे पोहोचलेले असायचे .मागच्या वेळी कोणती पुस्तकं मी बघितली होती , ती आता असतील की दुसऱ्या कुणी नेली असतील , याबद्दल मनात विचार सुरू असायचे . या ठिकाणचा हेडमास्तर ( म्हणजेच लायब्ररीयन ) खूप कडक होता .तिथे किती वेळ थांबायचे , किती पुस्तके बघायची याचे नियम कडक होते .त्यामुळे आम्ही वाचकांनी ' कसे वाचावे ' यापेक्षा ' कसे वाचू नये ' याकडेच त्यांचे लक्ष असायचे (पुढे जाऊन माझी यांच्याशी चांगली मैत्री झाली , व मला येथे मुक्त-प्रवेश व वाट्टेल तितका वेळ पुस्तकं  बघण्याची मुभा मिळाली ही गोष्ट अलाहिदा !) .  या आश्विच्या लायब्ररीत त्यावेळी किमान पाच हजार पेक्षा जास्तच पुस्तके होती . तेव्हा जे पुस्तक हातात मिळेल ते  हावरटा सारखे वाचून काढायचो (हो 😂, हावरट हाच शब्द योग्य ) ...तेव्हा तर (माझे वय वर्ष १०-१२ वगैरे ) शील -अश्लील , हिंसक-अहिंसक , सेक्स -असेक्स(हा माझाच शब्द समजा ☺️) काही म्हणजे काही समजत नव्हते .पुस्तकातील नायकाने नायिकेचे कसे चुंबन (Kiss) घेतले याची तपशीलवार वर्णने , त्यातल्या त्यात रहस्य-कथा वगैरे असलेल्या पुस्तकात असायची व तेव्हा किती कळत होते पण माहिती नाही पण ते ही अगदी ओळन-ओळ वाचलेले असायचे .पुस्तक मिळाले की वाचायचे हाच एककलमी कार्यक्रम वा एकमेव फंडा होता . पण आज विचार केला तर कळते की चांगले-वाईट असे वेगळे कसे करायचे , काय घ्यायचे , काय सोडायचे हे ही ' वाचन' च आपल्याला शिकवत असते !

या आश्विच्या लायब्ररीची एक आठवण अशीही आहे , तेव्हा 'श्रीमान योगी ' , ' स्वामी' , ' छावा ' इ पुस्तकं कायम कुणातरी वाचकाकडे फिरत असायची व मला ती कधीही वाचायला मिळत नसायची (विकत घेऊन वाचणे हा concept तोपर्यंत नव्हता आला व शक्य ही नव्हते  ) त्यामुळे मी अगदी ते पुस्तक कुणी नेले याची माहिती काढायचो व त्या व्यक्तीच्या घरी जाऊन ' बाबा रे , ते पुस्तक लवकर वाच आणि लायब्ररीत लवकर  परत दे ' असे सांगण्याचे ही सोडले नाही (😂😂) .काही दयाळू वाचक वा मित्रांनी परस्पर ते पुस्तक मला देऊ केले व मग मी ते वाचून त्यांनाच परत दिले असेही मला आठवते .अशी ही आम्ही बाहेरच्या बाहेर सेटींग करायचो. मी हा ही अनुभव घेतला आहे की बरेच वाचक लायब्ररीला पुस्तक परत द्यायचेच नाही , त्यामुळे अनेक दुर्मिळ पुस्तके कायमची गायब व्हायची , याचे मला व लायब्ररीमन असे दोघांनीही सारखेच वाईट वाटायचे.

एकदा पुस्तक हातात आले की माझी वाचण्याची ठिकाणे व त्याबद्दल च्या आठवणी ही खूप रंजक आहेत . माझे वाचण्याचे मुख्य ठिकाण असायचे आमच्या समोर असलेल्या पोस्टाच्या बिल्डिंगच्या पायऱ्या ...खाली पोस्ट ऑफिस व वर पोस्ट मास्तर राहायचे , त्याच्या मधल्या पायऱ्या वर निवांत बसावे व तासनतास माझी वाचन-समाधी लागावी असे खूपदा व्हायचे . या पायऱ्यांवर माझा उजवा  हात पायरीवर टेकवलेला , डाव्या हातात पुस्तक (किंवा याउलट ) या अवस्थेत एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखा मी तासनतास बसून वाचत असायचो . पोस्टाच्या गच्चीवर ही मी बसायचो .तेथे दिवसभर ऊन जसे वाढेल तसे सावलीची जागा बघून जागा बदलत राहावी लागायची . दुसरे ठिकाण आमच्या मारुती मंदिराच्या गाभाऱ्याची मागची बाजू (प्रदक्षिणा करताना मागची बाजू ) म्हणजे अगदी मारुतीरायाच्या पाठीला पाठ लावून मी बसायचो ! हे ठिकाण ही खूप एकांत असलेले होते (निदान दिवसभर तरी! ) , अजून तिसरे ठिकाण म्हणजे आश्विच्या नदीकाठी असलेले महादेव मंदिर ! येथे त्यावेळी मंदिराच्या मागच्या बाजूला एक चिंचेचे मोठे झाड होते , त्याखाली ही खूप छान वाचन व्हायचे . हे असे ' वाचन ' करणे म्हणजे स्वतःला , आजूबाजूच्या परिस्थितीला  'विसरणे 'म्हणजे काय याचा मी शब्दशः अनुभव घेतला आहे . त्यावेळच्या पुस्तकामध्ये ' परकाया प्रवेश '  असा एक प्रकार गूढकथा इ मध्ये वर्णन केलेले असायचा ,  तसेच काहीसा 'पुस्तकांचा माझ्यामध्ये  झालेला परकाया प्रवेश' किंवा ते अध्यात्म मध्ये  ' योग-समाधी ' असते ते ही  यापेक्षा काही वेगळे असेल असे मला तरी वाटत नाही .

घरात बसून तेव्हा प्लास्टिक ची खुर्ची तिरकी करून , भिंतीवर टेकवून वाचणे ही ही एक वाचण्याची position असायची .बसमध्ये प्रवास करताना पुस्तक वाचत जाणे हे ही खूप आवडायचे , त्या अर्थाने बस ठिकाणावर  पोहोचली की खूप  वाईट वाटायचे .

बहुतेकांना वाचनाची आवड लागते व ती नंतर टिकून राहते ती रहस्यकथा व भयकथा या प्रकारांमुळे ! माझेही त्या काळातील वाचन आडम-धडम (खास आमचा नगरी शब्द!) असल्याने मी ही खूप हा प्रकार वाचला आहे . पण हा प्रकार मुळात मलाही खूप आवडतो .कारण  मनोरंजन हाच वाचनाचा वा कुठल्याही छंदाचा मुख्य हेतु असतो . या रांगेत खूप आधी बाबुराव अर्नाळकर आले ! त्यांची पुस्तकं आश्विच्या वाचनालयात खूप संख्येने होती व मी ती बहुतेक वाचली . काळापहाड (उर्फ चंद्रवदन), झुंजार , धनंजय-छोटू इ सारखी अनेक पात्रे  व त्यांचे नायक खूप लोकप्रिय ! मला अजूनही ते " झुंजारने अचानक ठोसा कसा मारला व त्याला लोळविले किंवा काळापहाडच्या हातात अचानक पिस्तुल आले ' अशा प्रकारची वाक्ये आठवतात .  विशेष म्हणजे माझे आदर्श असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हेच बाबुराव यांचे ही आदर्श होते . सावरकरांच्या सांगण्यावरून ते सैन्यात ही सामील झाले होते . या रहस्यकथा इतक्या उत्कंठा वाढविणाऱ्या असत ती पूर्ण वाचून होईपर्यंत माझी झोप उडालेली असे !  पुढे गुरुनाथ नाईक , नारायण धारप (भयकथा ) इ लेखक ही खूप वाचले . भुते , प्रेतं , चेटकीण , पुरातन वाडे , मिती-त्रिमिती यावरचे लेखन म्हणजे धारप यांचा विशेष हातखंडा होता .त्यांची पुस्तक वाचून खरोखर भीती वाटायची व अंधार दिसला की त्यांच्या पुस्तकातील प्रसंग आठवत . या लेखकाने त्या विशिष्ट काळात मनावर विलक्षण गारुड केलेले होते. भीती ही भावना प्रत्यक्षात नकोशी असली  तरी धारप यांची पुस्तकं वाचताना वाटणारी " भीती " हवीशी वाटायची व परत परत तो अनुभव घ्यावा असेच वाटायचे . मध्यमवर्गीय वा स्वतःला स्टेटस वगैरे असणारे लोक प्रत्यक्षात अर्नाळकर , धारप , गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर  यासारख्या लेखकांना फारसे मानत नाही असे दाखवतात ,पण मला वाटते ते सुद्धा त्यांच्या कथा , कादंबऱ्या चोरून वाचत असावेत😂😂 ( रोमान्स , अंगावर शहारे आणणारे भय , रहस्य हे प्रत्येकाला हवेसे असतेच ! ) . अलिकडेच गाजलेला " तूंबाड" चित्रपट हा धारप यांच्याच कथेवर आधारलेला होता असे म्हणतात. .  
आपल्या रोजच्या आयुष्यात खरे तर जे कधीच घडत नाही वा घडू शकत नाही ते या रहस्यकथा-भयकथा मध्ये इतक्या रोमांचक पद्धतीने घडते की , ते वाचताना खूप मज्जा येते व निरस-कंटाळवाणे आयुष्य रंगीबेरंगी होऊन जाते.
गुरुनाथ नाईक हे अजून एक मोठे लेखक ! त्यांनी अर्नाळकर यांच्या इतक्याच कादंबऱ्या वा रहस्यकथा लिहल्या !  खरे तर मराठी चित्रपटांना कथांची व विषयांची  कमतरता पडायलाच नको , इतके या त्रयीने (अर्नाळकर-नारायण धारप-गुरुनाथ नाईक ) लिहून ठेवले आहे . माझ्या त्या वेळच्या विचार-विश्वावर या तीन लेखकांचा खूपच प्रभाव होता .

शेरलॉक होम्स ( लेखक-आर्थर कॉनन डॉयल ) तसा मी खूप उशिरा (म्हणजे ११ वीला )वाचला , पण त्याआधी या लेखक त्रयीने रहस्य कथा , गूढकथा , भयकथांचे वेड लावलेच होते .
मराठीत पुरस्कार वगैरेंनी या लेखकांची उपेक्षा जरी केली तरी माझ्यासारख्या असंख्य मराठी वाचकांचे हे अतिशय ( All Time Favorite ) आवडते लेखक आहेत .

पुढे सातवीत असताना माझ्या वाचन-आयुष्यात टर्निंग पॉईंट आला तो " माझी जन्मठेप " या स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित आत्मचरित्ररुपी पुस्तकाने ! कारण या पुस्तकाने आयुष्याला एक नवेच वळण मिळाले ! अनेक हालअपेष्टा , कष्ट , दुःख , उपेक्षा, अपमान इ मिळूनही सावरकरांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा सकारात्मक ( Positive ) असायचा हे वाचून माझे जीवन तरी आमूलाग्र बदलून गेले .  खरं तर सातवीत सावरकरांची भाषा मला खूप जड वाटली होती व फारशी पचलीही नव्हती  , पण त्यातल्या भावना मात्र मनावर पक्केपणाने कोरल्या गेल्या होत्या व त्या अजूनही तितक्याच पक्क्या आहेत . माझी जन्मठेप मी त्यानंतर आत्तापर्यंत १८ ते २० वेळा वाचले आहे . या पुस्तकाने माझ्यासारखेच अनेक वाचकांना प्रेरणा दिली असेल (हे नक्की ! ) पण माझ्यासाठी हे पुस्तक खूप अनमोल असा ठेवा आहे . ( ज्या वाचकांनी अजूनही हे पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा , तुमचेही जीवन बदलून जाईल हे नक्की ! ) .


श्यामची आई हे पुस्तक ही मी त्याच दरम्यान कधीतरी वाचले असावे . या पुस्तकाची ही खूप पारायणे नंतर केली . हे ही माझे आजही एक आवडते पुस्तक आहे .
पुढे जाऊन श्रीमान योगी , स्वामी , झुंज , शहेनशहा इ अनेक ऐतिहासिक पुस्तके-कादंबऱ्या वाचल्या .त्यात श्रीमान योगी मला विशेष आवडली . ह ना आपटे हे ही मुख्य आवडते लेखक ! त्यांची ,' मी ' , ' यशवंतराव' , ' पण लक्षात कोण घेतो ' , ' गड आला पण सिंह गेला ' ही पुस्तके तेव्हा वाचली .  त्यांची अतिशय विस्तृतपणे ( Detailing ) वर्णनं करण्याची शैली भारीच होती . विशेषतः ऐतिहासिक कथा रंगविताना ह ना आपटे त्याला रहस्याच्या पद्धतीने उलगडत न्यायचे . अनेक पात्रांची सरमिसळ करायचे , त्यांचे प्रसंग ही वेगवेगळे करून मग त्या सर्व पात्रांना-प्रसंगांना मग पुढे कादंबरीत अतिशय खुबीने एकमेकांशी जोडायचे. ते खूप रोमहर्षक वाटायचे . व ही पात्रे वा प्रसंग , घटना इ जोडताना दिलेले संदर्भ (References ) इतके बिनचूक असत की आपल्याला ह  ना आपटे यांच्या बुद्धी व चातुर्याचे कौतुक वाटत राहते . गो नी दांडेकर , बाबासाहेब पुरंदरे  इ लेखकांची ही खूप पुस्तके वाचली होती . तेव्हा तरी माहिती घेणे वा अभ्यास करणे असला काही हेतू नव्हता त्यामुळे वाचनाचा छंद जोपासणे व मनाचा आनंद घेणे हेच होते .

याच काळात केव्हातरी श्री ना पेंडसें यांचे गारंबीचा बाप्पू हे पुस्तक वाचले . खूप आवडले होते तेव्हा ! विशेषतः पहिल्यांदा कोकणातील निसर्ग , तेथली माणसं इ ची ओळख झाली . खूप खूप भावली होती ती माणसं , निसर्ग ! अलीकडे २०२० साली गारंबीचा बाप्पू परत वाचले , त्या बरोबरीने ' तूंबाडचे खोत ' ही महाकादंबरी ही नेटाने  वाचली . या कादंबरीत एक पात्र संताजी हा वीर सावरकरांचा भक्त आहे असे दाखवले आहे व पानोपानी सावरकरांचे विचार मांडले हे बघून सुखद अनुभव मिळाला .

आनंद यादव यांचे झोंबी ही खूप आवडले होते .त्यात त्यांची शिक्षण घेण्यासाठीची धडपड बघून आपण खरे तर किती सुखी आहोत याची जाणीव झाली होती .त्यानंतर त्यांचीच काचवेल , नांगरणी ही ही वाचली पण झोंबी इतकी ती नाही आवडली .

हेच सगळे सुरू असताना आमची गाडी दहावीला पोहोचली .तेव्हा (कदाचित आजही आहे ! ) दहावीचे वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचे समजले जायचे , त्यामुळे आमच्या घरात ही तसे सिरिअस वातावरण तयार झाले . आजूबाजूला ही'  खूप अभ्यास करावा लागतो ' अशी कुजबुज सुरू झाली होती . त्यातच माझी 'स्वातंत्र्यवीर सावरकर ' या विषयावर अभ्यास करण्याची इच्छा अजून मोठी झाली होती . बहुधा म्हणूनच आईने मला शब्द दिला की जर मी दहावीला केंद्रात  पहिला नंबर ( त्यावेळी केंद्र म्हणजे १९ शाळांचे मिळून असे आश्वि येथे होते ) मिळवला तर मला सावरकर समग्र खंड विकत घेऊन देईल . मग तर आम्ही झपाटून अभ्यासाला लागलो , व खरोखरच केंद्रात माझा प्रथम क्रमांक आला ( १९९७ साली ). हा पहिला क्रमांक आला याच्या आनंदापेक्षा मला समग्र सावरकर वाचायला मिळतील याचा मला खूप आनंद झाला . मग १९९७ साली आमच्याकडे हे सावरकर लिखित ९ च्या ९ खंड आले व त्यांनतर पुढच्या वर्षभरात मी ते वाचून ही काढले होते .

दहावीच्या सुट्टीतील विशेष आठवण आहे . तेव्हा कुठूनतरी मला ' तुकाराम गाथा ' मिळाली व ती मी पूर्ण वाचली . ते अभंग वाचून मला कविता रचण्याची खरी प्रेरणा मिळाली व मी खऱ्या अर्थाने कविता करणे सुरू केले . याच काळात ' दासबोध ' ही निम्मा वाचल्याचे आठवते . लिखाण सुरू केल्यावर सुरुवातीला नक्कल करणे वा अनुकरण करने साहजिक असते , मी ही तसेच केले व खालील अभंगासारखी कविता रचली , जी त्यावेळी माझ्या अनेक मित्र , शिक्षक इ ना ही खूप आवडली होती , ती कविता अशी होती 👇👇

वाचन माझी भूक, वाचन माझे सुख 
वाचनाने दुःख , गेले पळोनि ! 
वाचन जीवन , वाचनी मरण 
वाचनावीण मी , राहू कसा ?
वाचन भजन, वाचन कीर्तन
वाचन चिंतन , जगदिशाचे ! 
ब्रह्मानंद आहे , वाचनात माझा
स्वर्गीचेही सुख  , फिके वाटे !
अमृताचे सार , वाचनाची धार
पडो मुखी माझ्या , नित्यदिनी !
पाण्याविना मासा , बाळावीन आई
वाचनावीण तसा , राहू कसा ?
या वाचनाने जपले, एक तन, एक मन
केले खरंच सधन, याने मला !

(अर्थात या कवितेत मी केलेली नक्कल वा Copy/Paste असलेले शब्द वाचकांना स्पष्ट दिसतील ) .

वाचन करताना selective असे कधीच नव्हते , जे हातात मिळेल ते अधाशीपणे वाचून काढायचो , त्यामुळे निदान २० वर्षांचा होईपर्यंत असेच होते .पुढे पुढे जाऊन कादंबऱ्या वाचताना ओळ न ओळ न वाचता फक्त महत्वाचे असे ओळखून नजरेने scan करत पुस्तक speed ने कसे वाचावे हे ही शिकलो , त्यामुळे माझा वाचनाचा वेग अजून वाढला .
वाचनाने अनेक फायदे होतात , माझ्याआधी ही अनेकांनी सांगितली आहेतच पण *माझ्यासाठी* काय झाले ते ही सांगतो ते असे , 

१.वाचनाने एक Positive Attitude निर्माण होतो . 

२.आयुष्यात कधीही एकटे वाटत नाही.

३.कोणत्याही संकटकाळी कसे वागावे व शांत कसे राहावे हे आपोआपच कळू लागते .

४.पुस्तकांच्या रूपाने एक कायमचा मित्र आयुष्यात जोडलेला राहतो ; जो कधीही आपणास सोडून जात नाही .

५.रागावर नियंत्रण आपोआपच राहते , कारण वाचन आपल्या विचारांना योग्य दिशा दाखवत राहते.

६.विचारांचा व ध्येयाचा अचूक मार्ग सतत  दिसत राहतो. .

 अजूनही बरेच काही जे कदाचित मला शब्दांत मांडता येणार ही नाही ! 

तर वाचकहो ! असेच वाचत राहु,असेच समृद्ध होत राहु !  👍
 खूप खूप धन्यवाद !
© हेमंत सांबरे 
Contact -9922992370 . 

काही उत्तम प्रतिक्रिया ----
प्रियांका आचार्य --
एका वाचन वेड्यांचा प्रवास ..  खूप छान लिहिलंय हा लेख. अगदी माझ्या लहानपणात घेऊन गेला. 
मलाही वाचनाची सवय आईमुळेच लागली. आणि आता माझी मुलेही खूप वाचतात. 
पेशाने शिक्षिका असल्याने माझा तर सतत पुस्तकांशी संबंध येतो. पण ललित पुस्तकंप्रमाणे ही अभ्यासाची पुस्तके मी खूप जपते. आवडलेले पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला मला आवडते. चांदोबा....उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या....दुपारी, शांत निवांत ठिकाणी  आम्ही सगळी भावंडं एकत्र येऊन वाचत असू. वाचून झाले की पुस्तके एकमेकांकडे देत असू....धमाल यायची. 


खूप छान वाटले लेख वाचून....लहानपण भेटले पुन्हा....😊😊👍

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लेख आहे ...वाचनाची वेड असणाऱ्या प्रत्येकाला relate करेल हा लेख

    ReplyDelete
  3. सावरकर खंड वाचायला मिळतील या " लालसेने " (तुमचा शब्द हाव अगदी बरोबर 😀 ) तुम्ही केंद्रात प्रथम येता आणि वर्षभरात ते खंड वाचून ही काढता हे पराकोटीचे प्रेम . तुम्ही वयाने माझ्यापेक्षा बरेच लहान असलात तरी खूप साधर्म्य आढळले .वाचन वेड नक्कीच चांगले ..वाद नाहीच.

    ReplyDelete
  4. छानच लिहीले आहे...अभिनन्दन

    ReplyDelete
  5. यामध्ये त्यावेळी मिळणारं स्वराज्य साप्ताहिक आणि किशोर मासिक चा उल्लेख राहून गेलाय.हे आणण्यासाठी आपण पलीकडच्या आश्वि ला कुऱ्हाडे पेपर वाल्यांकडे जायचो

    ReplyDelete
  6. Mast lekh aahe.... Me pan vachan veda aahe😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर