अभिनव भारत मंदिर - नाशिक- क्रांतितीर्थ
-
हेमंत सांबरे
आपल्या देशांत इतिहासाचे बरेच वाचन होत असले तरी ज्या ठिकाणी हा इतिहास घडला त्या ठिकाणाकडे कायमच अक्षम्य दुर्लक्ष होत असते . कारण इतिहास जेथे घडला त्या ठिकाणची रचना शक्यतो जशीच्या तशी जपून ठेवणे , ही त्या इतिहासाला वा तेथल्या स्मृतींना जपण्यासाठी खूप आवश्यक असते . अशी किती ठिकाणे असावीत जेथे ऐतिहासिक पुरुष स्वतः वावरले , त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली ती ठिकाणे जपली तर त्या इतिहासाची , त्या प्रेरणेची आठवण ही तितकीच ठळक राहते .
नाशिक ही तर सावरकरांची सुरुवातीची कर्मभूमी ! येथेच त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे बीजे पडली , व ती पुढे जगभर फोफावली . हे मी त्याआधी त्यांनीच लिहलेल्या पूर्वपीठिका व माझ्या आठवणी व इतर पुस्तके यातून खूप वेळा वाचलेही होते . पण प्रत्यक्षात या ठिकाणी जाणे हा एक अदभुत व रोमांचकारी अनुभव असतो ( अशीच भावना माझी रायगडाला भेट दिली तेव्हाही झाली होती ! ) . १८९९ साली सावरकर मध्य नाशकात ' तीळभांडेश्वर बोळ " नावाच्या गल्लीत राहायला होते असे मी खूप वेळा वाचले होते व हे ठिकाण नक्की कसे आहे हे बघायची खूप उत्सुकता होती व हे ठिकाण बघण्याचा योग अलीकडेच आला .
हे ठिकाण बरोबर पंचवटी घाटाच्या समोर गोदावरीच्या काठावर असल्यासारखे असले तरी दाट घरांच्या गर्दीत आहे . सहसा बोळ/गल्ली अरुंद असते , मुख्य रस्त्यापासून आत असते, तशीच आहे . आता जाताना ' अभिनव भारत गल्ली " अशी छोटी पण ठळक पाटी ही लावलेली आहे ( सोबत जोडतोय ) .त्या पाटीपासून गल्लीत आत वळताना , येथेच सावरकर व त्यांच्या सुरुवातीच्या सहकाऱ्यांची ही पावले पडली होती हे आठवून अंगावर काटा आला . आणि ही पावले एका परम निश्चय असलेल्या थोर क्रांतिकारकांची होती , मग त्या रस्त्याला , त्या धुळीला आम्ही माथी का लावू नये ? या माझ्या भावनिक स्वभावाने मी खाली वाकून नमस्कार केला व ती माती कपाळी लावली . थोडे पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताला अभिनव भारत मंदिराची मुख्य इमारत आहे , ज्याच्या दरवाजावर लिहले आहे की " या परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर , देशभक्त बाबाराव सावरकर व स्वातंत्र्य कवी गोविंद राहत होते -१८९९ ते १९०९ . ती पाटी बघून खूप आनंद झाला .
आत गेल्यावर एक समोर जुन्या वाड्यासारखी दोन मजली इमारत दिसते व त्याच्या उजव्या व डाव्या हाताला इतरही घरे आहेत . सहसा बहुतेक ऐतिहासिक ठिकाणी स्थानिक ( Local ) लोकांना जी अनास्था वा नावड असते तशीच ती इथेही दिसली . आत गेल्यावर मात्र सगळ्या दारांना कुलुपे दिसली व आमची निराशा झाली . वर जिना चढून गेलो व तिथेही कुलुपच होते .पण ' हार मानणे' हे सावरकर भक्तांना मान्य नसते .शेजारच्या घरामध्ये एक काकू खिडकीत दिसल्या व त्यांना तब्बल पाच सहा वेळा हाक मारून , येथे कुणी असते का विचारले , मग त्यांनी सांगितले की (ते ही अर्धवट ! ) शेजारी चावी आहे . मग आम्ही खाली उतरून परत शोधत गेलो तर बरोबर मुख्य दरवाजाच्या बाजूने एक छोटा दरवाजा व खोली होती त्यातून आत गेल्यावर एक साधारण तिशीच्या आतला मुलगा बाहेर आला व त्याला मी सांगितले की , आम्ही अभिनव भारत मंदिर बघायला आलो ..काही मदत होईल का , चावी आहे का ? ....येथेच आमच्या भेटीला एक नवीन वळण मिळाले .कारण हा मुलगा म्हणजे तेथेच राहणारा नचिकेत महाजन ! नचिकेत ने लगेच चावी घेतली व आमच्याबरोबर आला व त्याच्या बरोबर आम्हाला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला .
नचिकेत नुसता चावी घेऊन आला नाही तर त्याने पूर्ण एक ते दीड तास आम्हाला वेळ देऊन अनेक प्रकारची नाविन्यपूर्ण माहिती ही आम्हाला सांगितली . वाचकहो , या लेखाचा स्पष्ट उद्देश ' अभिनव भारत मंदिर ' व हा परिसर जेथे वीर सावरकरांनी त्यांचे सुरुवातीचे क्रांतिकार्य सुरू केले त्या परिसराकडे वाचक , सावरकर प्रेमी व इतर राष्ट्रप्रेमी लोकांचे लक्ष वळविणे हाच आहे व लेखाच्या शेवटी मी यशस्वी होईल यात खात्री आहे .
अभिनव भारत मंदिर ही संकल्पना मूळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीच आहे . हे मंदिर कसे असावे हे ही त्यांनी अतिशय सविस्तर एका पत्रात लिहून ठेवले आहे ( या मूळ पत्राची soft copy मी सोबत जोडत आहे . सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे खालील दोन खोल्यापैकी एका खोलीला " अनंत कान्हेरे " यांचे नाव दिले असून दुसऱ्या खोलीला " कर्वे-देशपांडे " असे नाव दिले आहे .हे जॅक्सन खटल्यातील नाशिक अभियोगातील थोर क्रांतिकारक व सावरकरांचे अभिनव भारतातील नाशिक मधील सहकारी ! ( या सर्वांना फाशीची शिक्षा झाली ). वरच्या मजल्याच्या कक्षाला " देशभक्त बाबाराव सावरकर " यांचे नाव देण्यात आले आहे . वरचा कक्ष म्हणजे विशेष आहे,कारण येथे अभिनव भारताशी संबंधित जगभरातील क्रांतिकारक व मंडळी यांची छायाचित्रे आहेत . तसेच काही पुस्तकांचा संग्रह ही येथे केला आहे . सावरकर लिखित या पत्रात त्यांनी तीन हजार रुपये त्यावेळी असलेल्या नाशिक पालिकेला दिले आहेत व त्यातून अभिनव भारत मंदिराची देखरेख करण्याबाबत सूचना दिल्या आहेत . विशेष बाब म्हणजे या सगळ्या प्रकारात स्वातंत्र्यवीरांनी माझे नाव कुठे टाका वा कुठल्या कक्षाला माझे नाव द्या असे कुठेही म्हटले नाही , तर उलट आपल्या क्रांतिकार्यातील सहकाऱ्यांचे स्मरण ठेऊन पुढच्या पिढीला त्यांची आठवण राहील अशी सोय करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो ( सध्याच्या नेत्यांच्या वागण्याशी पूर्णपणे विसंगत ! ) . अभिनव भारत मंदिरातील वरच्या कक्षातील अनेक क्रांतिकारकांची चित्रे , कात्रणांचे फोटो इ बघताना बराच वेळ गेला .मधून मधून नचिकेत अतिशय उपयुक्त माहिती देतच होता .
नचिकेत माझ्यासारखाच 'सावरकर 'या विषयावर खूप भावनिक वाटला . सावरकर जेव्हा या भागात राहायला आले तेव्हा त्यांचे वय १७-१८ असे होते . नचिकेत ने अत्यंत जिव्हाळ्याने अनेक घटना , गोष्टी सांगीतल्या . सुरुवातीला ही मित्रमंडळी येथे जमत व देशभक्तीच्या , राष्ट्रकार्य करण्याच्या , निस्वार्थी राहण्याच्या शपथा घेत ते हेच पवित्र ठिकाण ! जेव्हा यांची बैठक सुरू व्हायची तेव्हा तिथे एक काचेचा दिवा जळत असायचा व बैठक संपेपर्यंत ती काच चांगलीच तापलेली असायची...मग ज्याला क्रांतिकार्य, गुप्ततेची शपथ द्यायची तो ती काच हातात घेऊन शपथ घ्यायचा ...बऱ्याचदा हाताचा मांसल भाग निघून यायचा पण हे स्वातंत्र्य-वेडे तरुण हातातून ती काच सोडायचे नाहीत .....पुढे प्रत्यक्ष शत्रूच्या (ब्रिटिशांच्या ) हातात सापडल्यावर होऊ शकणाऱ्या छळाची एकप्रकारे ही पूर्वतयारी असायची !
तसेच जरी स्वतः सावरकर शपथबद्ध होते , व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी हे व्रत घेतले असले तरी ते बरोबर येत असलेल्या तरुणांना यातल्या धोक्यांची ही पूर्वकल्पना देत व तुम्हास आवश्यक वाटेल तर प्रथम आपल्या कुटुंबाला महत्व द्यावे असेही सांगत .असे असूनही विनायकाचे व्यक्तिमत्त्व इतके चुंबकीय होते की त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे लोकही त्यांना आपला नेता मानत ( म्हसकर , पागे आदी उदाहरणे ) . साधे अर्धा तासही जो विनायकाच्या संपर्कात आला तरी तो व्यक्ती कायमचा त्याचा स्नेही होऊन जाई . नाशकात ' मित्रमेळा ' ही खूप महत्त्वाची संस्था होती व प्लेग सारख्या आपत्तीत त्यांनी अनेकांना मदत केली होती .
खाली उतरल्यावर डाव्या हाताला सावरकरांच्या कल्पनेतील ' स्वातंत्र्यदेवते' ची मूर्ती आहे .या देवीने विविध शस्रे हाती घेतली आहेत व ही देवी ठणकावून सांगत आहे , ' रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? ' . थोडे पुढे गेल्यावर ठीक प्रवेशद्वार जेथे आहे तिथेच १८५७ ते १९४७ पर्यंत ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना एक शिलालेख लिहून आदरांजली वाहिली आहे .
वरचा कक्ष व इतर महत्वाची ठिकाणे बघून झाल्यावर नचिकेत आम्हाला तो राहत असलेल्या जागेत/घरात घेऊन आला .आम्ही तेथे बसलो ...तो मला आठवले व मी नचिकेतला विचारले की , "माझ्या वाचनात आलं होतं की कवी गोविंद येथेच राहत , तर ती नेमकी जागा तरी कुठली ? " , त्यावर नचिकेत ने सांगितले , " आपण ज्या खोलीत आत्ता बसलोय , ती हीच स्वातंत्र्य कवी आबा दरेकर उर्फ कवी गोविंद यांची खोली! " हे ऐकताच माझ्या शरीरावर खरोखर रोमांच उठले . नचिकेतने कवी गोविंद जेथे बसत ती जागा दाखवली (सोबत फोटो जोडला आहे ) . येथेच बसून कदाचित त्यांनी ' रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' " व इतर अनेक महान काव्ये लिहली असतील . मृत्यू जवळ आल्यावर येथेच बसून त्यांनी अजरामर झालेली कविता ' सुंदर मी होणार ' लिहली . मी भारावून गेलो . (ज्या वाचकांनी ही कविता वाचली नसेल त्यांनी जरूर वाचा , मृत्यूचे स्वागत करणारे इतके सुंदर काव्य जगाच्या पाठीवर कदाचितच कुठल्या कवीने लिहले असेल!) जेथे या अद्भुत काव्यांची निर्मिती झाली त्याच खोलीत मी आज प्रत्यक्ष बसलो होतो . मी त्या जागेला व खोलीला नमस्कार करून बाहेर आलो . ही अशी प्रेरणादायी ठिकाणे आपण जपणार आहोत की नाही ? सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील .याच खोलीच्या आसपास ते भुयार ही असावे जेथे अभिनव भारताच्या गुप्त बैठका होत .
(हीच ती स्वातंत्र्य कवी गोविंद यांची खोली )
सावरकर हे लहानपणापासूनच मैत्रीला जागणारे व जीवाला-जीव देणारे असे व्यक्तिमत्त्व होते. कवी गोविंदाना तर स्वतः सावरकर पाठीवर घेऊन विविध ठिकाणी जात (कवी गोविंद अपंग होते ) . त्रास भोगणे , कष्ट भोगणे यात आपणच पुढे असावे , असेच त्यांना वाटे .त्या अर्थाने ते खरे लीडर होते . ज्या वयात भावी संसाराची सुखस्वप्ने रंगवावीत , त्याच वयात सावरकर मात्र पेशव्यांच्या सरकारवाड्याच्या समोर उभे राहून पुन्हा स्वराज्य कसे आणता येईल त्याबद्दल च्या नियोजनात दंग होते !
बाहेर आल्यावर नचिकेत ला विचारले की सावरकर बंधू जेथे राहत तो वर्तकांचा वाडा कुठला ? नचिकेत ने मला दाखवला व सांगितले की आता सध्या ते घर तिवारी नामक व्यक्तीने विकत घेतले आहे . पुढच्या वेळी गेले की प्रत्यक्ष त्या वाड्यात/घरात जाण्याचे मी ठरवले आहे .
तसेच हे' तीळभांडेश्वर' नावाचे हे नक्की काय आहे हे नचिकेत ला विचारले .तो तेथून जवळच असलेल्या ' तीळभांडेश्वर' च्या महादेव मंदिराच्या आवारात आम्ही गेलो . आता गाभाऱ्यात जाऊन आम्ही दर्शन घेतले . हे मंदिर नाशकातील इतर अनेक मंदिराप्रमाणे चारही बाजूने घरांनी वेढलेले असे आहे . येथली महादेवाची पिंड दरवर्षी तिळा-तिळाने वाढते असे म्हणतात .
(तीळभांडेश्वर मंदिर )
हा रविवारचा दिवस असूनही , मी नचिकेत बरोबर जवळपास दोन तास असूनही ' अभिनव भारत मंदिर ' ला भेट द्यायला अजून कुणीही आल्याचे दिसले नाही . मूळ इमारत जुनी होत असून , त्याचे संवर्धन करणे या गोष्टीकडे कुणाचे ही लक्ष आहे असे वाटत नाही . हे ठिकाण सध्या ट्रस्ट च्या ताब्यात असून ट्रस्टी देखील फार लक्ष देत असतील असे वाटत नाही . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे , " जो देश , देशातील लोक आपला इतिहास , ऐतिहासिक स्थळे यांना विसरतात , तो देश लवकरच रसातळास जातो " येथली सगळी परिस्थिती बघून मलाही असेच वाटले की आपण त्याच वाटेवर प्रवास करतोय का ?
मी या ठिकाणी जाऊन आलो व एक अद्भुत अनुभव घेतला .तुम्ही ही जा , आणी तुमचे ही अनुभव इतरांना सांगा , कारण आपण सारे जितके जाऊ , जितकं या क्रांतीतीर्था बद्दल बोलू तितके जास्त लोक येथे येतील व या पवित्र क्षेत्राचा विकास होईल .
जय सावरकर
© हेमंत सदाशिव सांबरे
Contact -9922992370 .
२५.११.२०२१ .
वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
ह्याच अभिनव भारत मंदिरात मांडवगणे सर अकाउंट्सचा क्लास घ्यायचे. 1978/81 ह्या काळात मी त्या क्लासला जात होते. तसेच खाली महिलांची शाखा (समिती) भरायची तिथे पण नियमित जात असे. माझे आजोबा रामचंद्र भाटे ह्यांचा फोटो अभिनव भारत मंदिरात आहे. सावरकर व त्यांच्या कार्याविषयी मला नितांत आदर आहे.
ReplyDeleteमांडवगणे सरांकडे मीही क्लासला जात होतो.त्यांचा मुलगा सुहास हा माझा मित्र.
Deleteखूप छान वाटल वास्तु बघून व त्याविषयीच वर्णन वाचून.मी पण स्वा.सावरकरांच रत्नागिरीच त्यांना पटवर्धनांनी रहायला दिलेल घर बघितल.खूप छान वाटल मला.तिथे पण रिटायर्ड झालेल्या व्यक्ति प्रवाशांना सगळी माहिती देण्याकरिता एक एक वर्षाची सेवा देतात असे कळले.टिळकांचा पण वाडा तिथे बघितला.
ReplyDeleteज्योती कुळकर्णी.
Khup chaan
ReplyDeleteनवीन माहिती मिळाली
ReplyDeleteछान लेख. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या वाचलेल्या अनेक आठवणी दाटून आल्या.
ReplyDeleteलेख वाचून मनाने तिथे जावून आल्यासारखे वाटते. प्रत्यक्ष भेट दिलीच पाहिजे असे वाटायला लावणारं प्रत्ययकारी लिखाण
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteजयोस्तुते!
ReplyDelete