हिंदू धर्म नष्ट का होत नाही ?


हिंदू धर्म नष्ट का होत नाही ? 

हिंदू धर्माला जगातील सगळ्यात प्राचीन धर्म समजले जाते. हा धर्म नक्की किती वर्षे जुना आहे यावर वेगवेगळी मते व्यक्त होतात.
कुणी असंही म्हणते की 'हिंदू' हा धर्म नसून ती एक जगण्याची आदर्शवत अशी जीवनपद्धती आहे . या हिंदू धर्माची स्थापना कुणी केली , माहीत नाही !याचा कुणीही प्रेषक वा संस्थापक नाही , तरीही हा धर्म हिंदुस्थानच्या मूळ भूमीवर तरी आजतागायत टिकून आहे , नष्ट असा झाला नाही .

 
हिंदुस्थान ची ही  मूळ भूमी अतिशय विशालकाय अशी होती , ज्या भूमीला आज आपण " अखंड भारत " असे नाव देतो (जो भूतकाळ आहे ) .अगदी काश्मीर पासून ते थेट खाली हिंद महासागर व आत्ताचा ब्रह्मदेश ते थेट अफगाणिस्तान च्या सीमा व कदाचित त्या ही पुढे ही भूमी विस्तारलेली होती . पण या भूमीचे तुकडे धर्माच्याच आधारावर झाले , विविध कालावधीत! धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर होते हे वेळोवेळी सिद्ध होत राहिले (तरीही हिंदू झोपून राहिले व पुनरावृत्ती होत राहिली ) 

मोहम्मद बिन कासीम या मुस्लिम हल्लेखोरांपासून सुरू झालेले हे युद्ध , पुढे अल्लाउद्दीन खिलजी , तैमुर , ते थेट औरंगजेब , टिपू सुलतान इ नी हिंदू धर्म व हिंदूंना नष्ट करण्याचे कसोशीने प्रयत्न केले ,पण तरीही त्याच ताकदीच्या किंवा त्यापेक्षाही सामर्थ्यवान तलवारीने हे प्रयत्न हाणून पाडले व हिंदू पुन्हा पुन्हा उभा राहिला . मधल्या काळात ब्रिटिश , पोर्तुगीज हे ही आले , त्यांनीही हिंदू धर्माच्या मानबिंदू वरती आक्रमणे करत त्याला समूळ नष्ट करण्याचे वारंवार प्रयत्न केले , पण हिंदू त्यांनाही पुरून उरले .

महाराणा प्रताप , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , बाजीराव पेशवे ,अहिल्याबाई होळकर इ महान शासकांनी हिंदू धर्म व हिंदू देवदेवतांची पुनर्स्थापना केली .

 हे सगळे तपशील वाचकांना माहीतच आहे , पण तरीही एक अभ्यासाचा विषय म्हणा किंवा एक उत्सुकता म्हणा पण हे आजच्या आपल्या पिढीला हे सांगणे गरजेचे आहे की आपल्या ' हिंदू ' धर्माची बलस्थाने कुठली आहेत .

अगदी आपण खूप मागे गेलो तर शक , हुण इ नी या भरत भूमीवर आक्रमण  केले होते , पण आज हे शक-हुण कुठे आहेत ?  या हिंदू भूमीने नुसताच त्यांचा पराभव केला नाही तर त्यांना आपल्या महान पाचक शक्तीने गिळवून , पचवुन टाकले . हिंदू धर्म म्हणजे एक विशाल वाहती नदी आहे ज्यात अनेक छोट्या नद्या , ओढे , नाले इ इतर अनेक जीवनप्रवाहाप्रमाणे येऊन मिळत राहिले व याच मूळ नदीचा भाग बनून गेले .कारण या मूळ विशालकाय नदीची सामावून घेण्याची क्षमता अफाट आहे , आपल्याकडे खेचून घेण्याची अमर्याद  इच्छाशक्ती आहे .पण तरीही  हा हिंदू धर्म कुणावरही बळजबरी करत नाही , वा कुठलीही बंधने लादत नाही . आणि हेच त्याचे वेगळेपण व महानता आहे . हिंदूंनी कधीही दुसऱ्या देशावर वा दुसऱ्यांच्या  भूमीवर धार्मिक कारणाने आक्रमण केले नाही ,पण याच मूळ हिंदूंना मात्र  स्वतःची भूमी , स्वधर्म राखण्यासाठी हत्यारे उपसावी लागली व हिंदूंनी ती वेळोवेळी उपसली व आपला हिसका शत्रूंना दाखवला . 

हिंदू जीवनमूल्ये शाश्वत आहेत . हजारो वर्षांपूर्वी येथे असलेल्या ऋषीमुनींनी ही मूल्ये आपले अनुभव अगदी तासून व अतिशय कठोरपणे चिकित्सा करून ती बनवली आहेत . तरीही त्यांनी ती कुणावर लादली नाही वा आम्ही सांगतो म्हणून अगदी  आम्ही अमूक तमुक पुस्तकात /ग्रंथात लिहले म्हणून तसेच करा , त्यात कुठलाही बदल करूच नका, असेही हे ऋषी म्हटले नाही .त्यामुळे काळ बदलला तसा हिंदू धर्म ही बदलत गेला व हे घडत गेलेले बदल मूळ जीवनमूल्ये टिकवून ठेवत झाले . त्यामुळे इथे कट्टरता नाहीच अशी !  स्वातंत्र्य आहे , पण त्याला हजारो वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या जीवनमूल्ये यांचा आधार आहेत .त्यामुळे फांद्या कितीही विस्तारल्या तरीही मूळ वृक्ष मात्र त्याच्या पायावर भक्कम उभाच आहे . 

मधल्या काळात येथे सर्वधर्म समान असतात अशा प्रकारची विचारधारा लादण्याचा प्रयत्न फक्त हिंदूंवर झाला , पण आता काळ बदलत आहे व यातले सत्य बाहेर येऊन हिंदू जागे होत आहेत व ही स्वागताची बाब आहे . सर्व धर्म समान नाहीत , वेगळेच आहेत ही बाब आत्ताच्या हिंदू  पिढीच्या लक्षात येऊ लागली आहे . 

मुळात येथे एक लक्षात घेण्यासारखे आहे की  जर एखादा धर्म लादावा लागत असेल , बळजबरीने घेण्यास भाग पाडावा  लागत असेल तर त्याची जीवनमूल्ये नक्कीच एका भक्कम पायावर उभी नसतात .

 हा हिंदू धर्म सनातन आहे , याच्या स्थापनेची दिनांक कुणासही माहीत नाही , पण अनेक प्रवाह त्याला येऊन मिळत गेले व त्याचा मूळ प्रवाह त्यांना सामावून घेत गेला .

हिंदू धर्मात जो आस्तिक असतो तो ही हिंदूच व जो नास्तिक असतो तो ही हिंदूच! त्यामुळे विरोधी वा वेगळी मानसिकता असलेले विचार स्विकारणे याबाबत माझा हिंदू धर्म खूप पुढारलेला आहे व मला तरी या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे . समूहापेक्षा माझ्या स्वतःच्या वेगळ्या विचारांचा या हिंदू धर्मात नुसताच सन्मान होत नाही तर त्याला एक वेगळा नवीन विचार म्हणून सामावून ही घेतले जाते ( हे केव्हढे मोठे विशेष! ) .जगातील हिंदू हाच एकमेव धर्म आहे जिथे स्रियांना नुसताच सन्मान देत नाही तर त्यांची देवी म्हणून पूजा ही करतात . भारतात तर  अनेक युद्धे ही स्रियांच्या नेतृत्वात झाली आहेत (जसे भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा , जिजाऊ , झाशीची राणी इ ) 

अनेक आक्रमणे , काळाचे क्रूर आघात यामुळे अनेक आपले बंधू , भगिनी इ बळजबरीने, लोभाने , कपटाने ,  छळाने व इतर काही कारणांनी   परधर्मात गेली . हे सतत गेल्या १४०० वर्षांपासून होत आले आहे .पण आता काळ  बदलला आहे व हिंदूनी आपली पाचक क्षमता परत वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे .कारण या परधर्मात चुकून गेलेले आपले अनेक बंधू, भगिनी  तुमच्या एका हाकेची वाट बघत आहेत . कारण कितीही दशके , शतके जरी झाली तरी त्यांना आपल्या हिंदू धर्माची शाश्वत जीवनमूल्ये आकर्षित करत आहेत , कारण तेच त्यांचे मूळ रक्त आहे . 

म्हणूनच आज आपले शंकराचार्य किंवा धार्मिक अधिकारी यांनी ज्यांना स्वेच्छेने परत आपल्या मूळ धर्मात यायचे आहे त्यांच्यासाठी एक सोप्पी व सुटसुटीत प्रक्रिया तयार करावी व या प्रक्रियेला जाहीररीत्या आपली सगळी मंदिरे व धर्मस्थळे इ ठिकाणी प्रदर्शित करावे . जितके हे आपले  हिंदू -संघटन मजबूत होत जाईल , तितके आपले राष्ट्र , आपला धर्म मजबूत होईल .

अलीकडे इंडोनेशिया देशाच्या राष्ट्पतींची कन्या सुकमावती यांनी परत  हिंदू धर्म स्वीकारला  , वसीम रिझवी ही परत आले  व कालच्याच  बातमीनुसार प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्देशक अली अकबर यांनी हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये हुतात्मा जवानांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांमुळे आपल्याला त्रास झाला आहे असे सांगत आपण सहपरिवार मूळ धर्मात परत येण्याचा निर्णय जाहीर केला आहे .ही अशी लाट येत आहेत , या लाटेला आपलं म्हणूया , एक-एक  शृंखला जोडुया व या सर्व बंधूंचे व भगिनींचे आपण स्वागत करूया .तसेच अजूनही हजारो , लाखो ज्यांना परत आपली महान विचारसरणी स्विकार करायची आहे त्यांच्यासाठी आपण आपली मने मोठी करून सज्ज राहूया !
© हेमंत सांबरे

Comments

  1. लक्षावधी वर्षांची परंपरा लाभलेला सनातन हिंदु धर्म,
    अनेक भीषण आक्रमणांना तोंड देऊन, यशस्वीपणे, मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखवत आहे..

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती हेमंत जिं. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. सुंदर लेख. खरंच हे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण ऐतिहासिक लेख सर!👌👍

    ReplyDelete
  5. सुंदर 👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. Hi, good article. I think fundamental reason is social insistance on 'experiencing the supreme truth' before one becomes guru + focussing on 'unity (atman) in diversity' + having fundamental principle of supreme truth as 'non material'.

    ReplyDelete
  7. उत्कृष्ट लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर