प्रेमाचा धागा - १९९७ दै लोकमत दिवाळी प्रथम क्रमांक प्राप्त कथा -हेमंत सांबरे

'प्रेमाचा धागा '
निबंध स्पर्धा
दै लोकमत 
दिवाळी १९९७-९८
(प्रथम क्रमांक प्राप्त ) 
-हेमंत सांबरे

मी एक कॉलेजात जाणार विद्यार्थी .गावात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्याच्या गावी जावे लागले .परीक्षा नुकतीच संपलेली, घरी जाण्याची ओढ लागलेली ! आमचे गावाकडचे घर नुकतेच बांधून झाले होते , त्यामुळे त्या घरी जाऊन राहण्याची ओढ मनात होती .मागच्या दिवाळी सणाच्या गोड आठवणी मनात दाटून आल्या होत्या .

तो शाळेच्या पहिल्या सत्राचा शेवटचा दिवस होता .परीक्षा झाल्याने कर्तव्यपूर्तीचा आनंद होता .शिपाई सुचनावही घेऊन आल्यावर मुलांच्या मनात आनंदाचे सागर उचंबळून आले .एकदाची आम्हास एकवीस दिवसांची सुट्टी जाहीर झाली . 
घरी निघताना तेथील सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .आमच्या प्राचार्यांनी सर्वांना शुभेच्छा देताना, अतिशय छान भाषण केले .प्राचार्यांनी सर्वांनी ' सुट्टीत एखादे तरी चांगले काम करावे , ज्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल ' असे सांगितले .प्रत्येकाच्या मनात निरनिराळे संकल्प होते , प्रत्येकजण काय करणार याबाबत चर्चा करत होते .
मी अतिशय विचार करून ठरविले की , या सुट्टीत दोन प्रौढ निरक्षरांना तरी साक्षर करणार ! एकदा निर्धार झाल्यावर मग त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी कितीसा वेळ लागणार ? माझ्या मित्रास माझी कल्पना सांगितली , ती त्यास खूप आवडली .

आमच्या गावापासून केवळ आठ किमी अंतरावर एक तुरुंग (कारागृह) आहे .ते एक प्रकारचे सुधारगृह आहे .तेथे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले कैदी ठेवलेले असतात .कैद्यांना सुधरवण्यासाठी बंदी अधिकाऱ्यांना स्वयंसेवकांची नेहमीच गरज असते .आम्ही दोघांनी तेथील तुरुंग अधिकाऱ्यांना भेटून आमची इच्छा सांगितली . त्यांनी सांगितले , " तुमची कल्पना चांगली आहे , पण ही कामे करण्यास आजकाल कुणी तयार होत नाही , निरनिराळ्या प्रकारचे गुन्हे केलेले ते कैदी! त्यांच्या स्वभावाची खात्री देता येत नाही , तुम्हाला त्यांना शिकवायचेच असेल तर परत एकदा विचार करा ",  आम्ही आमचा निश्चय पक्का असल्याने , त्यांना तसे सांगितले .

माणूस कितीही वाईट असला तरी त्यात चांगुलपणा चा अंश असणारच , या श्रद्धेने आमच्या कार्यास आरंभ केला .घरून निघताना काही फराळ घेऊन आम्ही निघालो .तेथे पोहोचल्यावर तुरुंगाधिकार्याने एका खोलीसमोर नेले .त्याने आम्हास ती उघडून दिली .आत ज्याच्या चेहऱ्यावर दाढीचे जंगल वाढले आहे , असा मनुष्य बसला होता .त्याचा चेहरा रागीट होता .त्याजकडे पाहून प्रथम आम्हास भय वाटले .आमच्या येण्याची चाहूल लागताच त्याने वर पाहिले व आम्हांस बसण्याची खूण केली .आमच्या येण्याचे त्याला काहीच विशेष वाटले नाही , याचे आम्हास आश्चर्य वाटले .

माझा मित्र प्रकाशने पुढे होऊन त्याला त्याचे नाव विचारले.प्रकाश कडे क्षणभर पाहून त्याने आपली मान गुडघ्यात खुपसली .काही वेळानं मान वर करून त्याने आमच्याकडे पाहिले तर तो अक्षरशः रडत होता .आम्हाला अत्यंत वाईट वाटले .मग तो स्वतःच बोलू लागला . तो म्हणाला , " मी आमच्या गावात त्यावेळी सुतार काम करायचो ." त्यानंतर तो त्याच्या आठवणी सांगतच राहिला आणि आम्ही ऐकतच राहिलो .जुन्या आठवणींचे असंख्य फवारे आमच्या कानावर पडू लागले .पुढे तो सांगू लागला , " घरात मी एकटाच काम करणारा होतो .वडील अनेक वर्षांपासून गेलेले ! माझ्यावरच घराची जबाबदारी ! तीन बहिणी , दोन भाऊ व आई यांचे करता करता जीव मेटाकुटीस यायचा .आईची मदत असायची , पण ती म्हातारी किती करणार ? बहीण मोठी झाल्यावर तिच्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घेतले .सावकाराने अनेकांना लुबाडले होते .पैसे दिलेल्या दिवसांत परत देऊ न शकल्याने त्याने आमचा जमिनीचा तुकडा व घर बळकावले .घर व जमीन गेल्याचा धसका आईच्या मनाने घेतला, त्यातच तिला मृत्यू आला .मला अतिशय राग आला .मी सरळ कुऱ्हाड उचलली व सावकाराच्या घरी जाऊन त्याच्या टाळक्यात हाणली , तेही भर दिवसा ! माणूस एकदा जीवावर उदार झाल्यावर कसली। भीती ? " असे म्हणून तो गप्प बसला . पुढे सांगण्याची गरज वाटली नाही .माणूस खरोखरच परिस्थितीचा गुलाम असतो .परिस्थिती माणसास काय करावयास लावत नाही ? 

आम्ही दोघांनी त्याचे मन शांत होऊ दिले .मग आम्ही निरनिराळ्या गोष्टी सांगून त्याच्या मनाचा कबजा घेतला .त्यांस शिक्षणाचे महत्त्व सांगितले .मानवी मनाचे हे वैशिष्ट्य की एखादी गोष्ट का करावी , हे पूर्ण समजल्याशिवाय ती गोष्ट करण्यास तो धजत नाही .मी त्यास शिक्षणाचे फायदे सांगितले , " शिक्षा पूर्ण झाल्यावर नव्याने जीवन सुरू करता येईल , जीवनाची मजा चाखता येईल " माणसापुढे एखादा आदर्श असल्यावर तो त्याच्या पदपथावर सहज चालतो .त्या दिवशी त्याचा निरोप घेताना त्यांस आमच्याकडील फराळाचे पदार्थ खाऊ घातले.आम्ही दररोज येऊ असे सांगितले , त्यानेही ' आपण मन लावून शिकू ' असे सांगितले .

दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही कारागृहातील दुसऱ्या खोल्यांत फिरून आलो .माणसाचा स्वभाव वरून कितीही कठोर वाटत असला तरी आतमध्ये कुठेतरी ' *प्रेमाचा धागा*  '  असतोच याची आम्हास पूर्णपणे खात्री पटली .यावरून प्रसिद्ध संस्कृत कवी भवभूती यांचा श्लोक आठवतो,

"व्यतिषजति पदार्थानान्तरः कोऽपि हेतुर् - 
न खलु बहिरुपाधीन् प्रीतयः संश्रयन्ते। 
विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकम् 
द्रवति च हिमरश्मावुद्गते चन्द्रकान्तः।। "
(भवभूतिः    उत्तररामचरितम्) 

म्हणजेच बाह्यरूपावर खरे प्रेम कधीही अवलंबून नसते .

तिसऱ्या दिवशी तुरुंगाधिकार्याने आम्हाला सर्व कैद्यांचा एकत्रित वर्ग घेण्याची परवानगी दिली .

पुढील दिवसापासून आम्ही आमचे इतर मित्र गोळा केले .त्यांनाही आमच्या कामाचे महत्व पटले व ते ही नियमितपणे आमच्याबरोबर येऊ लागले .मनुष्य एखादे कार्य ( चांगले वा वाईट ) एकटा करण्यास धजत नाही , परंतु तेच सांघिक असेल तर इतर सर्व ही बरोबर येतात .

हळूहळू तीव्र ग्रहणशक्ती असलेल्या चार-पाच कैद्यांना दहा-पंधरा दिवसांत वाचताही येऊ लागले , आमची सुट्टी सार्थकी लागत असल्याचे कळून चुकले .

पुराणातही नाहीतरी काय सांगितले आहे ? भारतीय सण हे एकमेकांतील प्रेमाचे प्रतीकच असतात .

© हेमंत सदाशिव सांबरे 
दिवाळी १९९७-९८ .

(दै लोकमत , दिवाळी प्रथम क्रमांक प्राप्त कथा ,
या स्पर्धेत त्यावेळी १५०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर