अविरत सावरकर -हेमंत सांबरे
( Persistent Savarkar )
-हेमंत सांबरे
हा माझा स्वतःचा ही अनुभव आहे , आपलाही असेल ! रोजच्या जीवनात आपण चालत राहतो ,काहीतरी करायचे ठरवतो , काम सुरूही करतो ,पण कितीतरी कामे आपण अर्धवट सोडूनही देतो .. आज नवीन वर्ष २०२२ सुरू होत आहे . आपण प्रत्येक जण यानिमित्ताने काही संकल्प करतो व हे संकल्प बहुधा महिनाभर ही टिकत नाहीत आणि हे सुरूच राहते ... सुरू करायचे---सोडून द्यायचे . पण काही लोक असे असतात की जे एखाद्या कामावर आपली पूर्ण श्रद्धा ठेवतात व ते काम पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही .
सावरकर चरित्राचा आवाका प्रचंड मोठा आहे ...या चरित्रसागरात आपण जसजसे खोल-खोल जातो तसे अनेक मोती , रत्ने मिळत राहतात .सध्या बाळाराव सावरकर लिखित " स्वातंत्र्यवीर सावरकर- रत्नागिरी पर्व " हे पुस्तक वाचताना जागोजागी सावरकरांचा हा पैलू म्हणजे ' अविरत सावरकर - म्हणजेच Persistent Savarkar ' प्रकर्षाने जाणवला व हा गुण वा पैलू मला स्वतःला खूप भावतो म्हणूनच यावर विस्ताराने लिहावे असे वाटले .
Persistent शब्दांचा अर्थ गुगल वर बघितला तर असा दिला आहे -
"तुमची चूक आहे किंवा तुम्ही करणे गैर आहे असे लोकांनी म्हटले तरी एखादी गोष्ट करीत राहण्याचा निश्चय केलेला; ठाम, घट्ट, चिवट"
ब्रिटिशांच्या तुरुंगात उगाचच खितपत पडणे हे सावरकरांसारख्या कृतिशील माणसाला मान्य नव्हतेच .पण तरीही अंदमानात ही अशिक्षित कैद्यांना शिकवणे , शुद्धीकरण मोहीम , तेथील अन्यायाविरुद्ध लढणे , "कमला" काव्याची निर्मिती हे सगळं सावरकर करतच होते .
आपल्याला रोजच्या जीवनात स्थिरता हवीहवीशी वाटते ..त्यामुळे कुठलीही अडचण , संकट आले की बहुधा आपण आपल्या मूळ कामापासून , ध्येयापासून विचलित होतो वा ते मागे पडते . पण सावरकर चरित्रातील हा गुण किती पथदर्शी दिसतो ...ते अंदमानात ही इतका छळ होत असताना कधीही थांबले नाहीत.
रत्नागिरीत तर त्यांच्यावर राजकारणात भाग घेण्यावर बंदी होती . अशावेळी त्यांनी अस्पृश्यता निवारण व हिंदूंचे प्रबोधन, हिंदूंचे शुद्धीकरण अशी कामे हाती घेतली ..अश्या कामांना त्यावेळी स्वतः हिंदूंचाच प्रबळ विरोध होता ..
काहीकाळ सावरकर नाशिक येथे आले असताना तेथील गणपती उत्सवात मानपानावरून वाद व्हायचे व गणपती मिरवणुका वेगवेगळ्या निघत ..पण वीर सावरकरांच्या पुढाकाराने प्रथमच या मिरवणुकीत पुढे राहण्याचा मान महार समाजाला देण्यात येऊन , सगळ्या मिरवणुका एकत्र निघाल्या ..
अनेक कारणांनी निर्बंध असल्याने त्यांना स्वतःच्या नावानेही लेख लिहता येत नसत ...पण ते थांबले नाही ...दुर्दम्य आशावाद कशाला म्हणावे ? बऱ्याचदा ते जे लेख पाठवत ते छापण्याचे धाडस त्यावेळच्या वृत्तपत्र करू शकत नसायचे ..तेव्हा सावरकर म्हणत निदान छापला नाही तरी त्या वृत्तपत्राचा संपादक तरी वाचेल , त्यातूनही काही बदल होईल ! प्रत्येक वेळी मोठीच गोष्ट केलीच पाहिजे , आपली दखल ही कुणी घेतलीच पाहिजे असेही नसते , पण आपण आपला ' खारीचा वाटा ' उचलत राहायचा , मोठमोठी कामे एकदम होत नाही तर त्याला अशा छोट्याशा कामांची जोड देत गेले तरच होते ! केवढी मोठी शिकवण !
शिवाय स्वतः सावरकर कायम क्रियाशील असायचे , नुसताच बोलघेवडेपणा नाहीच ! त्यामुळे त्यांच्या सहवासात जो कोण येईल तो व्यक्ती इच्छा असो वा नसो मनोमन त्यांचा भक्त होऊन जायचा ..
काहीकाळ ते शिरगाव येथे वास्तव्यास होते ..शिरगाव हे कोकणातील खूप छोटे गाव ! पण येथेही त्यांनी हिंदूंची एकी , शुद्धीकरण या विषयावर काम सूरु केले ..सावरकर जेथे जात , तेथे त्यांच्या भोवती एखाद्या चुंबकीय शक्ती असल्याप्रमाणे लोक गोळा होत ..ब्रिटिशांना त्यांची इतकी भीती का वाटत होती , हे यावरून लक्षात येते . शिरगावला ही त्यांनी येथील मंदिरात मोठा समारंभ घडवून आणला व हिंदुमधील सर्व जातींना एकत्र केले व आपण अस्पृश्यता का नष्ट केली पाहिजे ते समजून सांगितले ...
सावरकर कधीही थांबत नव्हते ! कधीही थांबणार नव्हते . टीका त्यांच्यावर त्यावेळी ही खूप होत होती , आताही होतेच आहे ! पण ते होणाऱ्या टीकेमुळे कधीही विचलित झाले नव्हते . लोकप्रियतेच्या मागे न लागता केवळ लोकहिताच्या मागे पळणारा हा आगळावेगळा समाजसेवक होता . कटुता स्वीकारणे , अनुभवणे हा त्याच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता ..त्यांनी विरोध सहन केला , त्यांनी आप्रियता पहिली म्हणून हिंदूंना , भारताला आजचा चांगला दिवस बघायला मिळतोय ..
त्यांच्या पूर्ण चरित्रात सावरकर ' अविरत ' आपल्या ध्येयासाठी काम करतच होते , कुठल्याही पदाची लालसा न ठेवता , लोकांचा अनुनय मिळो ना मिळो, ते थांबले असे नाही !
' केल्याने होत आहे रे ,आधी केले ची पाहिजे ' या उक्तीवर त्यांचा दृढ विश्वास होता .
हा त्यांचा गुण खरंच आपल्यासाठी ही घेण्यासारखा आहेच ना ?
© हेमंत सदाशिव सांबरे
०१.०१.२०२२ .
संपर्क-9922992370 .
Comments
Post a Comment