आझाद शेर!- ( चंद्रशेखर आझाद ).

आझाद शेर ! 

आझाद शेर ! 
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ या दिवशी उत्तरप्रदेश मधील भावरा नावाच्या गावात झाला होता .त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम  तिवारी ! आझाद ( हे नाव त्यांना नंतर मिळाले ) लहानपणापासून ते धाडसी वृत्तीचे व निर्भीड होते . 
पुढे ते संस्कृत शिकण्याच्या हेतूने काशी येथे गेले . एक दिवस पाठशाळेतून येताना काही गुंड मुले , मुलींची छेड काढत होते .तेव्हा व्यायामाने शरीर कमावलेल्या बलदंड चंद्रशेखर ने सर्व गुंडांना चोपून काढले . असे होते पराक्रमी कुमार चंद्रशेखर ! 
लहानपणापासून स्वतंत्र वृत्तीचे असलेले चंद्रशेखर साहजिकच स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले .तेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ जोमाने सुरू केली . तेव्हा कॉग्रेस च्या घोषणपत्रिका चिकटविण्याचे काम १५ वर्षाच्या कुमार चंद्रशेखर ने केले .  तेव्हा घडलेला हा प्रसंग खूप प्रेरणादायी होता ..या आंदोलनात कुमार चंद्रशेखर ला एका मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल पकडले गेले व तेव्हा जो अधिकारी होता त्याचे नाव होते , ' खारेघाट'  त्याने सुनावणी च्या वेळी विचारले , " तुझे नाव काय ? '
तेव्हा चंद्रशेखर यांनी उत्तर दिले, " मेरा नाम आझाद है !" 
खारेघाट यांनी विचारलं ," वडिलांचे नाव ?" 
' स्वतंत्रता' असे सणसणीत उत्तर चंद्रशेखर ने दिले .
" तू राहतोस कुठे ?" असे विचारताच , तात्काळ उत्तर मिळाले , " कारावासात !" . असे बाणेदार उत्तर देणाऱ्या चंद्रशेखर ला पंधरा फटक्यांची  शिक्षा अतिशय क्रूरपणे देण्यात आली. ही वार्ता वाऱ्याच्या वेगाप्रमाणे बाहेर पसरली व जनतेत संतापाची लाट उसळली . मग हेच चंद्रशेखर कारागृहातून बाहेर पडल्यावर गावातील लोकांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली .त्याच्या या अभूतपूर्व देशभक्तीचा अभिवादन करण्यासाठी एका सभा आयोजित करून त्याचे अभिनंदन करण्यात आले व येथेच  चंद्रशेखर सीताराम तिवारी चे नामकरण झाले पंडित चंद्रशेखर आझाद ! 
पुढे २२ फेब्रुवारी १९२२ दिवशी चौरिचौरा येथे दंगल झाली ते कारण पुढे करून ऐन भरात आलेली असहकार चळवळ गांधींनी मागे घेतली .हा निर्णय ऐकून आझाद निराश झाले , व अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे पक्के उमजून आझाद सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने पुढे निघाले .
मग हेच आझाद अनेक क्रांतिकारकांचे  प्रमूख नेते बनले .ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईचे आझाद हे प्रमुख प्रेरणास्थान बनले.
-------
आझाद अलाहाबाद मध्ये आले . त्या पार्कचे नाव आल्फ्रेड पार्क ! 
त्या पार्क चे नाव परके! कारण राज्य ही परक्यांचेच !! पण त्यात घेरला गेला होता एक शेर ! आझाद शेर !! हा खरोखरच शेर होता ज्याला आज घेरले गेले होते चहुबाजूंनी !! भ्याड शिकारी अनेक संख्येने आले होते ,या वाघाची शिकार साधायला !  तो दिवस होता २७ फेब्रुवारी चा १९३१ चा ! 

सध्या आझाद यांचे जे स्मारक आहे  ते गेट क्रमांक तीन च्या जवळ आहे , जेथे प्रत्यक्षात ते हुतात्मा झाले होते . 
चंद्रशेखर आझाद यांनी प्रतिज्ञा केली होती , ' मी जिवंतपणी या ब्रिटिशांच्या ताब्यात सापडणार नाही ' 
२७ फेब्रुवारी १९३१ च्या सकाळी ते व त्यांचे सहकारी सुखदेव राज हे या पार्कमध्ये आले तेव्हा पोलिसांचा खबरी दालचांद याने त्यांना पाहिले होते व त्याने लगेच पोलिसांना जाऊन ही खबर दिली ...या वेळी चंद्रशेखर आझाद यांचे वय केवळ २५ इतकेच होते ..पण त्यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन या संस्थेचे जाळे पूर्ण हिंदुस्थानात पसरलेले होते ..एकदा ते व त्यांचे सहकारी यांची चर्चा सुरू होती की आपल्याला ब्रिटिशांनी पकडल्यावर काय होईल अशी--तेव्हा आझाद आपल्या पिस्तूलावर आपला उजवा हात ठेवून म्हटले होते की , " जोपर्यंत हे पिस्तुल माझ्या हातात आहे तोपर्यंत मला कुणीही जिवंत पकडू शकणार नाही , तसा प्रसंग आलाच तर याच याच पिस्तूलाने मी माझा अंत करून टाकेन ."  आल्फ्रेड पार्कमध्ये शेवटी हो अशी अटीतटीची लढाई झाली ...तेथील जांभळाच्या झाडामागे आझाद आपले आवडते पिस्तुल घेऊन बसले होते , तर इंग्रज अधिकारी नॉट बॉवर हा आपला फौजफाटा घेऊन आला व त्याने आझाद यांना घेरले .. त्याने आझाद यांच्यावर गोळी झाडली व ती आझाद यांच्या मांडीतून आरपार गेली तरी आझाद यांनी इतकी वेदना होत असतानाही आपल्या पिस्तूलातून त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या हातावर अचूक गोळी झाडून त्याचा हात निकामी केला ....ही लढाई तब्बल बावीस मिनिटे सुरू होती ..पण एक विरुध्द , शत्रूचे पाच ते सहा जण अशी ती विषम लढाई होती ..पण जखमी असूनही आझाद त्यांना जिवंतपणी असे सापडणार नव्हते ..आपण या प्रसंगाची कल्पना करू शकतो ..तर हे असे आझाद व त्यांचे सहकारी निडर होते व मृत्यूला कधीही घाबरणार नव्हते . आझाद यांच्यावर तिन्ही बाजूनी गोळ्यांचा वर्षाव होत होता   अखेर आझाद यांच्या लक्षात आले की आपल्या पिस्तुल मध्ये शेवटची गोळी शिल्लक आहे , तेव्हा त्यांनी क्षणाचाही वेळ न लावता आपल्या उजव्या कानशिलावर पिस्तुल टेकवून गोळी झाडली ..
अशा रीतीने हा आझाद शेर आझाद राहूनच अतिशय धैर्याने लढत लढतच मृत्यूला समोर गेला ..
आज या वीराचा स्मृतिदिन आहे ! हे सगळे आठवून अंगावर रोमांच उभे राहतात ..हे असे शूरवीर होते , ज्यांनी स्वतःचे हित , स्वतःचे कुटुंब इ सर्वांचा त्याग केला , बलिदान दिले म्हणूनच आपण आज स्वतंत्र आहोत व त्याची मधुर फळे चाखत आहोत , त्यामुळे अशा वीरांना आपण कधीही विसरू नये व पुढच्या पिढीला ही या वीरकथा सांगत राहु !! 


© हेमंत सदाशिव सांबरे 
- 9922992370 .
(हेच ते जांभळाचे झाड ज्याठिकाणी आझाद यांना वीरमरण आले , मूळ झाड इंग्रजांनी कापून टाकले होते पुढे १९३९ साली बाबा राघवदास यांनी याच ठिकाणी नवीन वृक्ष लावला होता ) 

© हेमंत सदाशिव सांबरे 
- 9922992370 .

Comments

  1. अंगावर शहारे आणणारे लिखाण A

    ReplyDelete
  2. https://twitter.com/sanjeevsanyal/status/1118432964570804224?s=20&t=nf2llCnSCI8ZFa7ZnM9fAA
    नेहरूचाचांनी ब्रिटिशांना खबर दिली 🙏

    ReplyDelete
  3. खूप छान लिखाण

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर प्रेरणादायी लेख आहे...
    👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर