Self Image म्हणजे काय व ती कशी वाढत जाते ! - हेमंत सांबरे
*Self Image म्हणजे काय व ती कशी वाढते !*
-हेमंत सांबरे
हा विषय अतिशय महत्वाचा असूनही मराठी लोकांमध्ये/वाचकांमध्ये हा विषय तितकासा चर्चा केला गेलेला नाही किंवा थोडासा दुर्लक्षित आहे , असे मला वाटते . गेल्या अनेक वर्षांपासून केलेले वाचन व प्रत्यक्ष जे अनुभव मला आले आहेत त्यावरून मी हे मांडण्याचा प्रयत्न करतो . वाचकहो ! यात असा उपदेश वगैरे असे काही नसून , सोप्या पद्धतीने हे समोर आले पहिजे असे मनापासून वाटले म्हणूनच लिहतोय , आपणास आवडेल याची मी खात्री देतो.
सेल्फ इमेज म्हणजे मला स्वतःबद्दल काय वाटते , किंवा मी स्वतःला नक्की काय समजतो ? किंवा स्वतःबद्दल च्या माझ्या काय भावना आहेत इ इ .
खूप जास्त आत्मविश्वास असणे व जास्त सेल्फ इमेज असणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत . जास्त आत्मविश्वास हा कदाचित फाजील असू शकतो पण सेल्फ इमेज ही अनेक गोष्टींचा एकत्र अर्क असू शकते . त्यामुळे बऱ्याच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नुसता खूप जास्त आत्मविश्वास पुरेसा नाही तर सेल्फ इमेज असावी लागते , या सेल्फ इमेज ला प्रयत्नपूर्वक वृद्धिंगत करावे लागते .
*_सेल्फ इमेज -जन्मजात की कमावता ही येते ?_*
बऱ्याचदा आपण बाहेर वावरतो तेव्हा काही लोक आपल्याला , आपल्यापेक्षा श्रेष्ठ वाटतात . त्यांचे वागणे ,बोलणे , कपडे घालणे इ इ असे वाटते की खूप भारी आहे , आपण तर काहीच नाही . म्हणजेच असं वाटतं की , ' याचं तर सगळंच मुळात 'लै भारी' आहे , आपल्याला काही तसं नाही होता येणार . पण खरे तर तसं काहीच नसते . त्या अमक्या तमक्या व्यक्तीने स्वतःला झोकून देऊन develop केलेले असते , ती मेहनत , ते कष्ट आपल्याला माहीत नसतात इतकंच ! जन्मजात , फक्त दुसऱ्याला जमेल असं जगात काहीच नसते , तेच सेल्फ इमेज चे ही आहे , ती प्रयत्नपूर्वक वाढवता येते .
माझे स्वतःचे उदाहरण येथे देतो . लोणी (प्रवरानगर ) सारख्या धड खेडे नाही धड शहर ही नाही अशा ठिकाणी माझे इंजिनिअरिंग झाले . त्या काळात चांगली कपडे घालणे , चांगली शूज इ घालणं याची मला लाज ( की भीती ! ) वाटायची . साधा शर्ट इन करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असे मला व आमच्यातील काही मित्रांना वाटायचे ( तुम्ही वाचक हे वाचून हसत असाल 😄😄) . हेच कारण आहे माझा खालचा कॉलेज मधील ग्रुप फोटो पहा , मला सगळ्यांनी (किंवा फोटोग्राफर ने ) मागे उभे केले आहे .
तेव्हा मी इतरांनी घातलाय तसा सूट नव्हता घातला , की शूज ही नव्हता घातला . शक्य नव्हते असे नव्हते पण तेवढी सेल्फ इमेज नव्हती . येथेच हे ही सांगतो की उलट ही असते , चांगले कपडे (attire ) असले की सेल्फ इमेज वाढते/वाढू शकते पण अर्थात तोच एकमेव उपाय होईल असे ही होत नाही .
*_सेल्फ इमेज आणि पुस्तके_*
बऱ्याचदा अशी चर्चा होते की , ' नुसते पुस्तके वाचून कुठे प्रगती होते का ? ' . पण तसे नाही . चांगली व योग्य पुस्तके वाचल्याने निश्चितच फायदा होतो . ज्याला आपण अलीकडे Self Help किंवा Motivational Books म्हणतो , अशी खूप पुस्तके आहेत . विशेषतः इंग्लिश मध्ये या विषयावर प्रचंड लिहले व वाचले जाते . मी या प्रकारातील खूप पुस्तके वाचली आहेत . पण तरीही काही Selective पुस्तके वाचलीच पाहिजे व परत परत वाचली पाहिजे ती अशी ,
Magic Of Thinking Big , How to Win Friends and Influence People , 7 Habits of Highly Effective People ( हे मराठीत वा हिंदीत वाचले तर अजून छान समजू शकते ) , Think and Grow Rich , Rich Dad Poor Dad . इतरही अनेक आहेत , पण त्यातल्या त्यात या पुस्तकाची पारायणे केली पाहिजेत इतकी ती छान आहेत . अशा पुस्तकांच्या वाचनाने आपल्या विचारांना दिशा मिळते व योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते ..व त्यातून सेल्फ इमेज हळूहळू वाढत जाते .
*_सेल्फ इमेज व आजूबाजूची माणसे !_*
आता पुस्तके झाली , या प्रवासात माणसांचे काय महत्त्व ते पाहू ! इथे माझा एक ठाम विश्वास आहे की पुस्तकांपेक्षा आपण कुठल्या प्रकारच्या माणसांच्या सहवासात राहतो त्याचा , सेल्फ इमेज वर खूप परिणाम होतो . बऱ्याचदा असेच होते की आपण जे आपले मित्र/ सहकारी /शेजारी / इतर कोणी आपल्या सारखे वा आपल्या पेक्षा कमी दर्जाचे (Income wise / Knowledge Wise ) आहेत ,त्यांच्यात उठणे , बसणे , बोलणे , चालणे आपल्याला सुरक्षित (Secured ) वाटते , ज्यामुळे आपल्या कमी सेल्फ इमेज असलेल्या मनाचे समाधान होत राहते .. पण ज्याला खरच यात सुधारणा करायची आहे त्या त्या प्रत्येकाने थोडासा ego बाजूला ठेऊन , जी लोक /मित्र / आपले ऑफिस मधील सहकारी ज्यांना आपल्यापेक्षा जास्त कळते वा आपल्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत त्यांच्या सहवासात राहणे सुरू करावे व त्यांच्या कडून शिकायला सुरू केले पाहिजे .. आपल्याकडे बऱ्याचदा जो जास्त यशस्वी आहे त्यांच्याकडून शिकण्याऐवजी त्यांच्या वर *जळणे ,* ते कसे *चुकीचे* आहेत यावर चर्चा करणे यातच वेळ वाया घातला जातो (मी ही अशा प्रकारच्या मानसिकतेत बराच काळ होतो ) ...नंतर मी हा बदल माझ्यात ही खूप प्रयत्नांनी केला व हा बदल करताना खूप त्रास ही झाला .. कारण *ego* बाजूला ठेऊन ' कुणाकडून ही शिकण्याची व स्वतः मध्ये बदल करण्याची वृत्ती develop करणे ' हे खूप अवघड आहे (मला तरी अवघड गेले , कदाचित वाचकहो आपण माझ्यासारखे नसाल ही ) .
त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त यशस्वी माणसांच्या सहवासात आपल्यालाच गेले पाहिजे .
सतत *नवीन शिकण्याची* वृत्ती ही high self image असेल तर सहज शक्य होते , पण हा मुद्दा आपल्याकडे उलट समजला जातो .म्हणजे मला सर्व कळते , मीच काय तो शहाणा , मला कुणी काही सांगायचे नाही इ इ अशीच बऱ्याच जणांची वृत्ती असते. शिवाय बरेच जण अजूनही याच भ्रमात आहेत की अशी वृत्ती असणारा (म्हणजे स्वतःलाच शहाणा समजणारा ) फार ग्रेट इ असतो .
या चुका आपण दीर्घकाळ करत राहतो . पण ज्याला खरंच पुढे जायचे आहे अशा कुणीही सतत डोळे , कान उघडे ठेवून आपल्यापेक्षा जास्त Successful लोकांच्या सहवासात कसं राहता येईल , त्यांच्या कडून जास्तीत कसं शिकता येईल ते बघितले पाहिजे .. कारण हे शिकले तर आपण चुका करत राहण्याचा आपला वेळ वाचवू शकतो . पण या वाटेवरचा आपला सगळ्यात मोठा शत्रू आपला 'EGO ' हाच आहे .
High self image असणे म्हणजे स्वतःला खूप ग्रेट समजणे व दुसऱ्याला दुखावणे असे नसून , उलट समोरच्याला रिस्पेक्ट देणे हेच आहे . माझे गावाकडचे एक मित्र आहेत , विष्णू उंबरकर , हे साहेब अगदी आपल्या पेक्षा वयाने लहान जे आहेत त्यांना ही अहो जाहो करतात . म्हणजेच हे करायला सेल्फ इमेज खूप जास्त असावी लागते (कित्येकदा ठरवून ही आपल्याला जमणार नाही )
ज्याची सेल्फ इमेज जास्त तो आधी स्वतःचा आदर करतो, त्यामुळेच इतर ही त्याचा करतात , असे मला वाटते .
*_आपण स्वतःला का बदलू शकत नाही ?_*
बऱ्याचदा आपण स्वतःला खूप निश्चय करूनही बदलू शकत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे आपली Low Self Image ! किंवा सेल्फ इमेज म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यात आपण कमी पडतो ..कसं ते सांगतो - बदल घडवण्याच्या प्रक्रियेत आपल्याला स्वतःशी कबूल करावे लागते की आपले कुठंतरी चुकतंय , पण Self Image Low असल्याने आपण मनोमन ते मान्यच करत नाही . तिथेच गोंधळ उडतो सेल्फ इमेज हे तत्व समजून घेण्यात !
*खोटं बोलणे व सेल्फ इमेज*!
जाता जाता या विषयाला हात घालतो . आजच्या व्यावहारिक जगात असे म्हणतात की , ' खोटं बोलावेच लागते , त्याशिवाय जमुच शकत नाही ' . पण खोटं बोलत राहणे व सेल्फ इमेज याचा परस्परांशी खूप नाजूक संबंध आहे हे नक्की ! कारण जितके जास्त व जितकी कारणे इ देऊन आपण खोटं बोलत राहतो तितकीच आपली सेल्फ इमेज कमी कमी होत जाते /होत राहते . याउलट खरे बोलले तर सेल्फ इमेज वाढत जाते व आपण सेल्फ इमेज च्या जिन्यावर पुढच्या-पुढच्या पायरीवर चढत जातो . या दोन गोष्टींचा परस्पर संबंध समजण्यास व स्वीकारण्यास ( Understanding & Acceptance ) अवघड आहे हे मात्र नक्की ! माझा अनुभव मात्र हेच सांगतो की याचा अतिशय जवळचा व impactful असा संबंध आहेच आहे . अर्थात हे जाणवले म्हणून मी हे लिहतोय पण म्हणून मलाही हे पूर्णपणे जमलय असं मलाही वाटत नाही .
'सेल्फ इमेज ' हे एक तत्व ( Principle ) आहे , जे असते म्हणजे असतेच ! भले ते आपण आज लगेच कबूल करू किंवा अजून काही वर्षांनी ! कदाचित अपयशी होऊन , अजून काही धक्के खाल्ले की मग !!
त्यामुळे नेहमी चांगले कपडे घाला , आनंदी राहा , चांगली पुस्तके वाचा व महत्त्वाचे आपल्याला आयुष्यात जसे व्हायचे आहे अशी लोकं शोधा व त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करु या !
वाचकहो , हे सगळे मनमोकळं लिहण्यामागे मी जे अनुभवले आहे ,जे वाचले आहे ते तुमच्या पुढे मांडणे हाच होता . या वाटेवरचा मी ही एक प्रवाशी आहे ,अजूनही शिकतो आहे , बदलण्याचा प्रयत्न करतोय , धडपड सुरूच आहे , पडतोय , उठतोय ,परत चालतोय .
धन्यवाद
© हेमंत सदाशिव सांबरे
Contact - 9922992370 .
खूपच अप्रतिम लेख आणि उपयोगी माहिती
ReplyDeleteछान, प्रामाणिक लेखन..!!!
ReplyDeleteAjun detail lihayala pahije ya wishayawar
ReplyDelete