गाडगेबाबा व गो नि दांडेकर यांच्या आठवणी
गोनिदा व गाडगेबाबा यांच्या आठवणी
अलीकडे एका लेखांच्या स्पर्धेचे परीक्षण करण्याचा निमित्ताने गो नी दांडेकर यांची भाची निलांबरी जी गानू यांच्याशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली . निलांबरी यांचे वय सध्या सत्तरीच्या पुढे आहेत पण वाचन , साहित्य याविषयी अजूनही तळमळीने काम करत आहेत व स्वतःही बरेच लेखन सातत्याने करत आहेत . गोनिदा म्हणजे आपल्यातील अनेक वाचकांचे आवडते लेखक आहेत ( माझेही आहेत ) . त्यांच्या शितु , माचीवरला बुधा या तर माझ्या विशेष आवडत्या कादंबऱ्या आहेत .. निलांबरी यांच्याशी बोलताना मी त्यांना गोनिदा यांच्या काही विशेष आठवणी असतील तर सांगा अशी विनंती केली , व त्यांनी गोनिदा व गाडगेबाबा यांच्यातील अनोख्या नात्याबद्दल च्या दोन आठवणी मला सांगितल्या .. या दोन आठवणींचे शब्दांकन मी माझ्या पद्धतीने करत आहे , वाचकांस आवडेल ही आशा !
गोनिदा हे सिद्धहस्त लेखक तर गाडगेबाबा हे कर्मयोगी संत ! पण ही गुरू-शिष्याची जोडी होती ..त्यांची पहिली आठवण पंढरपूर जवळची ! तेव्हा गाडगेबाबा चंद्रभागेच्या तीरावर फिरत असताना त्यांना एक कुष्ठरोगी दिसला . त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला आपल्याजवळ नदीत च एका दगडावर बसवले . तेव्हा गोनिदा हा त्यांच्या बरोबर होते ..पण गोनिदा मात्र भयाने वा लज्जेने लांबूनच हे दृश्य बघत होते ...गाडगेमहाराज मात्र अतिशय तल्लीन होऊन त्या कुष्ठरोगी माणसाशी बोलत होते , त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करत होते .
तो मनुष्य हळूहळू त्यांच्याशी बोलू लागला ..मग गोनिदाना ते अपूर्व दृश्य दिसले ..गाडगेबाबा त्या माणसाचे पाय दगडावर ठेऊन ते चंद्रभागेच्या पाण्यात धुऊ लागले ...एरवी कुठलाही साधारण मनुष्य हे कृत्य कधीही न करू शकला असता , स्वतः गोनिदा ही विचार करू लागले ' हे असे बाबांबरोबर झाडू मारने वगैरे ठीक आहे पण हे असे रोग्याला बरोबर घेऊन बसने व त्याचे पाय चेपणे हे अगदी काहीतरीच व किळसवाणे काम आहे " असा विचार करून गोनिदा लांबूनच फक्त बघत राहिले ...गुरूने शिष्याचे मन ओळखले असावे .. गाडगेबाबांनी गोनिदा ना जवळ बोलावले व त्या कुष्ठरोग्याचा दुसरा पाय धुण्यास फर्मावले ...गोनिदा लाजेने का कू करू लागले तर बाबा भयंकर चिडले , रागावून त्यांना म्हटले , ' आत्ताच्या आत्ता चालता हो , व परत मला तुझे तोंड ही दाखवू नको " ही मात्रा लागू पडली .गोनिदा त्या रुग्णाचे पाय धुऊ लागले , पण गमंत अशी की त्यांनी हे करताना डोळे झाकून घेतले ..बाबांना ते बघून हसू आले ...बाबा त्यांना हळूच म्हणाले , " तू डोळे उघडून त्याच्याकडे बघ , तुला तुझ्या काळ्या-सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होईल " गोनिदानी हळूच डोळे उघडून त्याकडे बघितले , तो सर्वांगावर कोड फुटलेला मनुष्य त्याचे पांढरे शुभ्र दात दाखवत अतिशय प्रसन्न नजरेने हसत होता ...बाबा त्यांना म्हणाले , " बघ, हीच ती अनुभूती आहे ,हाच तो अनुभव आहे जो दुर्मिळ आहे " गोनिदाना थोड्या वेळापूर्वी आपण करत असलेल्या विचारांची लाज वाटून ते बाबांच्या पायाशी जाऊन कोसळले ..बाबांनी एक जोराचा फटका त्यांच्या पाठीवर मारून त्यांना उठवले व आपल्या छातीशी कवटाळले ..
गाडगेबाबा हे कृतिशील संत होते ..
रंजल्या जीवांची ,
गंजल्या जीवांची
मनी धरे खंत
तोचि खरा साधू ,
तोचि खरा संत !!
असे ते साधू , असे ते संत होते ..उगाचच स्वतःची खूषमस्करी करून घेणारे भोंदू नव्हते ते व आपल्या आजूबाजूला ही त्यांना असेच शिष्य हवे होते जे काही काम करतील , गरजूंच्या उपयोगी पडतील ..
*दुसरा एक प्रसंग* ही खूप हृदयस्पर्शी आहे ! पहिला प्रसंग शिष्याची परीक्षा घेणारा , तर दुसरा प्रसंग आपल्या शिष्यावर एखाद्या गुरुचे अलोट प्रेम कसे असते ते दाखविणारा ! वाचकहो हा प्रसंग ऐकून माझ्या ही डोळ्यांत पाणी आले , मला खात्री आहे हे वाचून तुमच्या ही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही ...
ते विदर्भातील कडाक्याचे थंडीचे दिवस होते ...अगदी शरीर गोठवुन टाकेल अशी थंडी ..तेव्हा अशाच एका गावी बाबा व त्यांच्या बरोबरची मंडळी थांबली होती ..गोनिदा ही बरोबर होते ...जसजशी रात्र वाढू लागली , थंडीचा कहर वाढू लागला ...देशावर राहिलेले गोनिदा , त्यांना ही थंडी काही सहन होईना , अंगावर कांबळे असूनही दात दातावर आपटू लागले , शरीर बर्फ होतंय की काय असे वाटू लागले ..थंडी कमी व्हावी म्हणून त्यांनी शरीर असे आकसून घेतले ...तेवढ्यात एक कुणीतरी त्यांच्याजवळ आले , व गोनिदा ना त्या मनुष्याने आपल्या कांबळ्यात ओढून घेतले व आपल्या कुशीत घेऊन , राकट हाताने थापटू लागले ...गोनिदाना तो स्पर्श ओळखीचा होता , ते राकट हातांचा प्रसंगी त्यांनी मार ही खाल्ला होता ..पण तेच हात आज थापटू पाहत होते , गोंजारत होते .. त्यांनी हळूच डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न केला ..चांदण्यांचा मंद प्रकाश सगळीकडे पसरला होता , बरोबरची इतर सर्व मंडळी थकली होती व गाढ निद्रेच्या आहारी गेली होती केव्हाच ! चांदण्यांच्या त्या मंदप्रकाशात गोनिदाना दिसले की खुद्द बाबांनी आपल्या कुशीत त्यांना जवळ घेतले होते ...गोनिदा विचार करू लागले , " असे भाग्य कुणास लाभते ? जे मला लाभले ! " त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रूंची धार वाहू लागली .. ते हमसून हमसून रडू लागले ...त्यांना तो फुटलेला आवेग आवरता आवरेना .. बाबा त्यांना थोपटत म्हणू लागले , " झोप आता खूप रात्र झाली आहे , उद्या सकाळी आपणास परत पुढच्या मुक्कामाला पायी चालत जायचे आहे " यावर गोनिदा मनात म्हणू लागले , ' बाबा , तुमच्या प्रेमळ कुशीत मला माझा मुक्काम , माझा ब्रह्मानंद मला मिळालाय आज !! आता पुढच्या कुठल्याही मुक्कामाची काय काळजी ? "
वाचकहो ! खरेतर या प्रसंगाचे वर्णन करताना माझे शब्द कमी पडत आहेत ..पण एका गुरुचे आपल्या शिष्यावरचे प्रेम कसे असते ते हा प्रसंग वाचून आपणास समजते ..
हे दोन प्रसंग सांगून येथेच थांबतो , आवडल्यास आपल्या सारख्या इतर वाचकांना ही पुढे पाठवा ..
शब्दांकन - हेमंत सांबरे
आठवणी - निलांबरी गानू
भावस्पर्शी आढवणी व उत्तम लेखन
ReplyDeleteस्वाती
सुंदर लेख
ReplyDelete