#सांगता पर्व -बाळाराव सावरकर -पुस्तक परीक्षण

#सांगता पर्व- बाळाराव सावरकर 
(१९४७ ते १९६६)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षांवर भाष्य करणारे पुस्तक 

हे पुस्तक आज वाचून पूर्ण झाले . या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील १९४७ ते मृत्यूपर्यंत चा काळ आचार्य बाळाराव सावरकर यांनी अतिशय हृदयस्पर्शी असा रेखाटला आहे . 
ही वर्षे म्हणजे वीर सावरकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षे अशी म्हणता येतील . कारण सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या भारतभूमी च्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम केला, ते स्वातंत्र्य ' याची देही याची डोळा ' बघण्याचे भाग्य स्वातंत्र्यवीरांना  लाभले . याच काळात त्यांना गांधी खून खटल्यात विनाकारण गोवले गेले , व त्यातून ते पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले . पुढे १९६० साली त्यांचा मृत्यूजय दिवस ही भारतीय जनतेने मोठ्या उत्साहात साजरा केला . याच काळात त्यांनी सहा सोनरी पाने या महत्वपूर्ण ग्रंथाचे लेखन पूर्ण केले . 
याच काळात बाळाराव सावरकर हे वीर सावरकरांचें स्वीय सचिव होते व त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात असल्याने त्यांनी या काळाचे अतिशय सुक्ष्म वर्णन केले आहे . विशेषतः ज्या सावरकर भक्तांना त्यांची दिनचर्या ,स्वभाव याबाबत उत्सुकता असेल त्यांनी तर हे पुस्तक नक्की वाचावे . एके ठिकाणी बाळाराव खूप छान माहिती देतात ,
" त्यांच्या (सावरकरांच्या ) वागण्या-बोलण्यात संतांचा सुसंस्कृत पणा आणि अनभिषिक्त सम्राटाचा थाट होता .त्यांच्या बोलण्यात क्रोध , शिवीगाळ , आरडाओरड मी तरी कधी बघितली नाही .रागावून बोलताना त्यांचा तर्क अथवा समजूतदारपणा कधी सुटत नसे .ते कोणावरही अन्याय करत नसत .तसाच सहसा कोणाचा अन्यायही खपवून घेत नसत .त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सुखासाठी , स्वार्थासाठी कधी कुणाकडून ही काही अपेक्षिलेले नाही , त्यांचा आर्थिक व्यवहार व हिशोब खूप काटेकोर असे " .
त्यांची जेवण्याची पद्धत , जेवणाची वेळ , खाण्यात कोणते पदार्थ आवडत याबद्दल ही खूप छान या पुस्तकात वर्णन केले आहे . 
याच पुस्तकात त्यांचे मृत्यूपत्र ही दिले आहे . हे मृत्यूपत्र वाचून आपला सावरकर यांच्या विषयीचा अभिमान अजूनही शतगुणीत होतो . या मृत्युपत्रात सावरकर एके ठिकाणी सांगतात ,
" माझे प्रेत विद्युत दहिनीत जाळावे . माझ्या मृत्यूनिमित्त कुणीही त्यांची दुकाने वा व्यवहार बंद ठेऊ नये .माझ्या निधनाविषयी कुणीही सुतक पाळू नये वा ज्यायोगे समाजाला , कुटुंबाला त्रास होईल अशा रूढी पाळू नये " 
हे मी थोडेसे संक्षिप्त सांगितले आहे , पण वाचकहो हे मृत्यूपत्र मुळातच वाचण्यासारखे आहे . विशेष म्हणजे आपल्या संपत्तीचा मोठा वाटा त्यांनी मुलीच्या नावे करून दिला .
जो व्यक्ती आयुष्यभर मृत्यूला सतत सामोरा गेला , शेवटी त्यांनी शेवटी प्रायोपवेशन करून धैर्याने मृत्यूला सामोरे गेला . 
पण त्यांच्या मृत्यूचे शेवटचे वर्णन वाचून रडू मात्र बिलकुल आले नाही . कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यातील प्रत्येक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगले , त्यामुळे प्रत्यक्ष शेवटचा दिवस म्हणजे इतर दिवसासारखा वाटतो . 
त्यांनी जाण्याच्या काही दिवस आधी " आत्महत्या आणि आत्मार्पण " हा लेख लिहला होता , तो लेख ही या पुस्तकाच्या शेवटी पूर्ण दिला आहे . 
आयुष्यात आता सगळे काही मिळवले आहे या समर्पित भावनेने सावरकरांनी आत्मार्पण करत मृत्यूला स्वतःहून कवटाळले . 
जय सावरकर !

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर