"त्या तिघी " डॉ सौ शुभा साठे लिखित पुस्तकाचे परीक्षण - हेमंत सांबरे
#लेखिका - डॉ सौ शुभा साठे
#लाखे प्रकाशन , नागपूर
आजच सकाळी डॉ शुभा साठे लिखित " त्या तिघी" ही कादंबरी वाचून पूर्ण केली . वाचून पूर्ण होताच त्यावरची माझी प्रतिक्रिया / परीक्षण लिहायला बसलोय .
एखाद्या नाटकातील कसलेला नट जी भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे , तो ती भूमिका इतकी समरसून करतो की , पाहणाऱ्या प्रेक्षकांना वाटते की तो नट स्वतः ती व्यक्ती नसून तो म्हणजे ती भूमिकाच आहे असे वाटते . याला बऱ्याचदा ' परकायाप्रवेश ' असेही म्हटले जाते , इतके ते एकरूप भासते . या कादंबरीच्या बाबतीत ही असेच म्हणावे लागते . त्या तिघी ही कादंबरी सावरकर घराण्यातील तीन बंधूंच्या तीन पत्नी यांच्यावर लिहली आहे . सावरकर बंधू भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या होमकुंडात स्वतःचे योगदान देत असताना , त्यांच्या मागे , ते नसताना घरी जो त्यागाचा होम पेटला होता , तेव्हा नेमके काय घडतं होते , त्याचे यथार्थ पण भावस्पर्शी वर्णन एकूण २५ प्रकरणांच्या या पुस्तकात दिले आहे .
हे वाचताना आपणास असे वाटते की हे सगळे घडतं असताना स्वतः लेखिका ही त्या काळात येथेच जवळपास सगळीकडे वावरत असावी , इतके हे वर्णन जिवंत असे झाले आहे .
शुभाताईची ही कादंबरी या तिन्ही पत्नीचे स्वगत सांगत आहेत , त्या त्या वेळी , त्या त्या प्रसंगात या प्रत्येक स्री चे काय मनोगत होते हे सांगत हे पुस्तक पुढे पुढे सरकत जाते . हे असे स्वगत सांगत पुढे जाण्याचा प्रकार मला खूप आवडला .
त्या तिघी असे नाव असले तरी या पुस्तकाची नायिका आहे , ' सौ शांताबाई नारायण सावरकर ' . अनेक संकटे येऊनही या सहा जणांची टीम ( तीन सावरकर बंधू व त्यांच्या तीन पत्नी ) कशी अभेद्य होती हे वाचून आपणही स्तिमित होतो . या कुटुंबातील प्रत्येकाचे एकमेकांवर असलेले प्रेम, आदर, आपुलकी , जिव्हाळा पाहून आपल्याही डोळ्यात अश्रू उभे राहतात . आजच्या काळात हे असे प्रेम , अशी आपुलकी नष्ट झाल्याबद्दल खंत ही वाटत राहते . सावरकर कुटुंबाचे हे परस्पर प्रेम , विश्वास इ भावना ताकदीने पुढे आणण्यात ही कादंबरी खूप यशस्वी झाली आहे . सावरकरांच्या मागे या तिघी ही जावा-जावा म्हणून न राहता एकमेकांच्या सख्या बहिणी जशा असतात अशाच राहिल्या . वेळ पडेल ते कष्ट या तिघींनी भोगले पण त्यांनी स्वतःच्या पतींबाबत , परिस्थितीबाबत तक्रार केली नाही . त्यांच्यातील एकी संकटात देखील अभंग राहिली . ही खरेतर खूप अद्भुत आहे
सावरकर बंधू अंदमानात असताना त्यांच्या मागे नाशकात काय घडत होते , हे वर्णन अतिशय प्रवाही व आपली उत्सुकता शमविनारे असे आहे . अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केल्यानंतर अभिनव भारत चे सदस्य व सावरकर कुटुंब यांचा भयानक छळ करण्यात आला . त्याचे वर्णन आपल्याला अगदी हलवून टाकते .
येसू वहिनींना शेवटच्या आजारात असताना पती बाबाराव सावरकर यांना भेटण्याची इच्छा असते , पण त्यांचा मृत्यू होतो व त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना पतीच्या भेटीची अनुमती मिळते , हे वाचून आपल्याला खूप वाईट वाटते .
सावरकरांची अंदमानातून सुटका होते व ते घरी येतात ,हा प्रसंग शुभाताईंच्या लेखणीतून अतिशय भावविभोर झाला आहे . या प्रकरणात खूप आनंद झाला म्हणून शांताबाई उस्फूर्तपणे स्वतःच्या गळ्यातील हिराकंठी(तब्बल पाच तोळे वजन असलेली ) माईंच्या गळ्यात घालतात , त्या दिवसाची आठवण म्हणून. पुढे याच प्रकरणात जेवण झाल्यावर तात्याराव आपल्या वहिनीला (शांताबाईंना ) अंदमानात काम केल्यावर जे पैसे मिळत त्यातून कमावलेले तीन चांदीची नाणे भेट म्हणून देतात . हे सावरकर कुटुंबातील त्याग व एकमेकांवरचे निस्सीम प्रेम पाहून आपल्याला ही त्यांचा हेवा वाटतो . हे १५ वे प्रकरण तर मी दोनदा वाचून काढले .
पुढे बाबाराव व डॉ नारायणराव सावरकर यांचा मृत्यू ही असाच चटका लावून जातो .
प्रभावी व प्रवाही संवाद ही " त्या तिघी " कादंबरी ची मुख्य ताकद आहे . त्यामुळे वाचताना काही कामामुळे पुस्तक बाजूला ठेवावे लागले तरी , मन मात्र परत एकदा पुस्तक कधी हातात घेतोय व पुढची प्रकरणे वाचतोय असे आपणास होऊन जाते .
सावरकरांच्या बायका इतक्या भक्कम व धीराच्या होत्या म्हणूनच ' सावरकर ' , हे ' सावरकर ' होऊ शकले . नाटकांत जसे बऱ्याचदा पडद्या मागच्या कलाकारांना श्रेय मिळत नाही , तसेच या तीन सावरकरांच्या तीन महिला योद्धा स्री वर्गाचे झाले होते . पण हे श्रेय त्या तीन पत्नी ना मिळवून देण्याचे काम या कादंबरीने खूप मोठ्या प्रमाणात केले आहे .
ज्यांना आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत , तसेच आपण किती किती सुखी आहोत हे जर माहीत नसेल , कळत नसेल, त्याची जाणीव नसेल त्यांनी हे पुस्तक वाचावे . सावरकर कुटुंबाने देशासाठी नेमके काय भोगले हे जाणून घेण्यासाठी तरी एकदा का होइना हे पुस्तक नक्की वाचावे असे मी वाचकांना आग्रहाने सांगेन ..
धन्यवाद
हेमंत सांबरे
(ज्या वाचकांना पुस्तक घ्यायचे असेल ते वाचक
खूप भावपूर्ण परीक्षण लिहिले आहे. वाचतांना आपणही त्यात पुरेपूर गुंगून गेल्याचे जाणवते. धन्यवाद!.......डॉ शुभा साठे
ReplyDeleteहेमंत जी उत्तम प्रतिक्रिया आणि परीक्षण. पुस्तक वाचण्यास प्रेरणा मिळेल असे..
ReplyDelete