#सावरकर समजून घेताना - पुस्तकाचे रेवणसिद्ध लोणकर यांनी केलेले परीक्षण
#लेखक - हेमंत सांबरे
परीक्षण लेखन - रेवणसिद्ध लोणकर,
वारजे , पुणे
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतीसूर्य....सावरकरांविषयी काही लिहायचे म्हणजे मेरू पर्वत उचलण्यासारखे आहे ,कारण स्वतः सावरकरांनी जवळपास ८००० पेक्षा जास्त पाने लिखाण केले आहे त्यानंतर धनंजय कीर, विक्रम संपत , बाळाराव सावरकर , वि.स. वाळिंबे यांचे सुद्धा सावरकरांवर भरपूर लिखाण आहे. मग " सावरकर समजून घेताना "या पुस्तकात नवीन असे वेगळेपण काय आहे हा प्रश्न पडला होता. पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवली, पुस्तकात लेखकाने सावरकरांचे विचार एकदम साध्या व सोप्या भाषेत मांडले आहेत. जेणेकरून एका सामान्य माणसालाही मोजक्या शब्दात त्याचा सार कळेल. पुस्तकाची मर्यादित पृष्ठसंख्या असल्याने कोणताही नवीन वाचक सुद्धा पुस्तक वाचण्यास सहज प्रवृत्त होऊ शकतो.
सदर पुस्तकात लेखकाने फारशा परिचित नसलेल्या गोष्टी न विषयी प्रथम प्रकाश पाडला आहे. जसे नाशिक येथील दुर्लक्षित अभिनव भारत मंदिर , सावरकर - खारचा बंगला आणि cyclostyle machine , सावरकर आणि कविता. १९२५ साली स्थानबद्ध असताना लिहलेले हिंदू एकता गीत व त्यावर केलेले भाष्य, हिंदू म्हणजे नक्की कोण ? याविषयी या गीतात सावरकरांनी केलेली स्पष्टता पण निदर्शनास येते.
माफीवीर हा आरोप सावरकरांवर कायम केला जातो पण माफीचा साक्षीदार आणि सावरकरांचे सुटकेचे प्रयत्न यातील फरक लेखकाने खूपच सहजरीत्या मांडला आहे. सावरकरांना फासावर देण्यापेक्षा स्थानबद्ध करणे हे इंग्रज लोकांना कसे जास्त सोयीचे होते हे ही दाखवून दिले आहे.
सावरकर फक्त एक क्रांतिकारक नव्हते तर ते एक समाजक्रांतिकारक होते. कैदेत असताना खुनी , दरोडेखोर कैद्यांना साक्षर करणे असो की रत्नागिरीत असताना अस्पृश्यता निवारण असो असे अविरत काम ते करत राहीले. सर्वच जाती धर्मासाठी पतीत पावन मंदिर , सामूहिक जेवण पंगती , अस्पृश्यांसाठी ५०० पेक्षा जास्त विहिरी पाणी पिण्यासाठी खुल्या करणे या सारख्या मुद्द्यांवरपण लेखकाने प्रकाश पाडला आहे.
सर्वच जाती आपल्यापेक्षा कनिष्ठ जातीस अस्पृश्य मानीत तसेच हिंदू , मुस्लिम, ख्रिश्चन यांमधील जाती भेद व धर्मभोळेपणा यांवरही सावरकरांनी केलेली टीका , गोपुजन पेक्षा गोपालन जास्त महत्वाचे का आहे यावरही सावरकरांची मते काय होती , त्यांचा स्त्रीयांबद्दल काय दृष्टिकोन होता , विश्वाचा देव कोणता व मनुष्याचा देव कोणता याबद्दल ही लेखकाने मीमांसा केली आहे.
सावरकरांच्या वैयक्तिक जीवनातील काही निवडक संदर्भ ही येथे देण्यात आले आहेत. जसे कवी सावरकर , प्रतिकूल तेच घडेल ही विचार पद्धती , त्यांची प्रेरणा , कुटुंबातील एकता आणि बंधूप्रेम , त्यांची दिनचर्या , पत्नी माई बरोबर असलेले त्यांचे संबंध , व्यवहार व बुद्धीप्रामाण्यवाद , रोजच्या जीवनातील काटकसरी व हिशोबिपणा , व्यक्ती पूजेचा तिटकारा ,लोकप्रियतेपक्षा लोकहित महत्वाचे .
लतादीदी व सावरकरांची भेट याचीही एक आठवण सांगितलेली आहे.
सावरकर हे हिंदूराष्ट्राचे मोठे समर्थक होते. पण त्यांची संकल्पना काय होती समजून न घेता त्यांच्यावर झालेली मत मतांतरे झाली. येथे लेखकाने सावरकरांची संकल्पना येथे मांडली आहे. त्याच बरोबर हिंदू व बाकीचे धर्म , धर्मनिरपेक्षता , धर्मवेडे आणि विस्तारवादी मुस्लिम , पारसी , ख्रिश्चन या सर्वांवर असलेली मते सांगितली आहेत.
राष्ट्रप्रथम हे सावरकरांचे तत्व कायम होते. गांधीजी, चलेजाव चळवळ , सत्याग्रह आणि स्वातंत्र्य आपण हेच जाणतो पण अजूनही काही कारणे स्वातंत्र्यप्राप्ती साठी महत्वाची ठरली, त्यांचा उल्लेख येथे केला आहे ,मला तर वाटते ९०% भारतीयांना ही कारणे माहीतच नसतील. सावरकर लष्कर भरतीसाठी का आग्रही होते ? नेताजी आणि सावरकर यांची भेट..नाविक दलाचे निर्णायक बंड यांचा येथे विशेष उल्लेख आहे, सोबत काही पुरावेपण जोडले आहेत.
सावरकर का नको ? हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
प्रथम लेखक हेमंत सांबरे यांचे हार्दिक अभिनंदन, त्यांनी हा महामेरू पर्वत सहज उचलून धरला आहे. त्यांचा सावरकरांच्या विषयी केलेला दीर्घ अभ्यास यातून लक्षात येतो.. सावरकर थोडक्यात जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे...
📚 श्री रेवणसिद्ध लोणकर
८२३७२४७३१४
पुस्तक घ्यायचे असेल तर 9766183857
Comments
Post a Comment