(बहुतांश ) पुरुष गमावत असलेली सुवर्णसंधी - हेमंत सांबरे
आपल्या समाजात अजूनही काही कामे फक्त पुरुष करतील, तर काही फक्त बायका अशी विभागणी आहेच ! त्यामुळे काही सुवर्णसंधी कशा पुरुषांच्या हातातून निसटत आहेत , त्याबद्दल आज बोलूया .
विशेषतः असे आनंदाचे क्षण माझा मोठा मुलगा अर्जुन लहान असताना मी ही गमावल्या होत्या . पण मुलगी झाल्यावर (२०२० साली ) मला त्याचा आनंद घेता आला .
धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांना वेळ देता येणे , त्यांच्याशी मूल होऊन खेळणे , त्यांच्यासाठी जसे त्यांची आई करते ते ते सर्व करणे (अर्थात बाप ,आईसारखे/आई इतके नाही करू शकत !) यासारखे सुख नाही .
माझी मुलगी आता तीन वर्षांची आहे . म्हणजे lockdown मध्ये तिचा जन्म झाला . त्यावेळी work from home असल्याने मला तिचे लहानपण पुरेपूर अनुभवता आले .
लहान मुलं जेव्हा झोपेतून उठतात किंवा आपण त्यांना बळेच झोपेतून उठवतो, तेव्हा कसली मज्जा येते ना ...यावेळी त्यांचे इतके मुड बदलत असतात की , काहीच सांगता येत नाही . अयोध्या (माझ्या मुलीचे नाव ) , तिला जर मनाच्या विरुध्द आपण उठवले तर पहिले पंधरा मिनिटे ती आपल्याकडे , इतर सगळीकडे अशी भयंकर रागाने बघत असते . तिला आपण हसवायचा प्रयत्न केला तर मग अजून रडत सुटते . मग आपण तिला " हसविणे" हा प्रयत्न सोडून देऊन तिला निदान 'पाणी तरी पी 'म्हणून तिची मनधरणी सुरू होते , इथे मात्र ती अगदी घोटभर पाणी पिऊन " बाबा , मी तुमचे ऐकले बरे !", इतकेच दाखवून परत रागीट चेहरा मात्र तसाच असतो . मग तिला उचलून शी /शू साठी घेऊन जाणे हा एक वेगळा सोहळा असतो . काहीवेळा (तिच्या लक्षात असेल तर 😃) , तिची चड्डी तिला स्वतःच काढायची असते, आपण काढली की मोठ्याने भोकाड पसरते , त्यामुळे इथेही खूपच काळजी घ्यावी लागते 😜.
याच्या विरुद्ध जर अयोध्याची झोप झाली असेल , आणि मग तिला उठवले तर इतकी गोड हसते की बास! मग आपल्याला इतर काहीच नको असे वाटते . पण अशावेळी तिला उठून लगेच खेळायला सुरुवात करायची असते . इकडे तिकडे उड्या मारणे , अर्जुनची खोड काढणे असले उद्योग सुरू होतात . अशावेळी मग थोडेसे तिच्या कलाने घेऊन पुढचे कार्यक्रम आखावे लागतात .
अयोध्या थोडीशी उभी राहायला लागल्यावर तिला 'अंघोळ घालणे ' ही जबाबदारी माझ्यावर यायला लागली . हा " अंघोळ घालणे " प्रकार कसला भारी असतो ना ! तिला मुळात अंघोळ करायची इच्छाच नसते . मग बळेच उचलून 'बाथरूम कडे न्या ' हा मोठाच टास्क सुरू असतो . यावेळी तिचा शर्ट , चड्डी तिलाच काढायची असते , मग आपण तिला ते करून द्यायचे मग कुठे ती बाथरूम कडे वळते . आमच्याकडे एक छोटा बाथ टब आहे , त्यात तिला बहुधा अंघोळ करायची असते . त्या टब मध्ये थोडेसे गार/गरम पाणी एकत्र करून , त्याच्यात मी तिला बसवतो . टबमध्ये बसल्यावर थोडावेळ त्या पाण्यावर हात मारत बसणे हा तिचा खूप आवडता खेळ आहे , दुसरा माझ्या अंगावर पाणी उडवणे (पाणी माझ्या अंगावर उडाले की मी घाबरलो असे दाखवायचे , नाहीतर ती आठवण करून देते " बाबा , घाबरा) अशावेळी मी ही तिचा अंगावर पाणी उडवणे हा आमचा खेळ सुरू असतो . थोड्या वेळाने त्याच पाण्यात उभे राहून तिच्या उड्या मारणे सुरुवात होते (तिच्या मते तिचा हा डान्स असतो ) . मग तिचा मुड बघून आपण हळूच साबण लावायला सुरुवात करायची .' डोक्यावरून पाणी टाकने ' हा प्रकार तर माझी परीक्षा घेणारा असतो . कारण मी कितीही ' डोळे मिटून घे ' असे सांगितले तरी ' मी नीट पाणी टाकतो की नाही ?' हे बघायला ती डोळे उघडते व डोळ्यात पाणी जाते , म्हणून लगेच भोकाड पसरणे सुरू!! तोंडाला साबण लावताना हेच पुन्हा रिपीट होते 😜😜. मग अंघोळ झाल्यावर तिचे अंग पुसणे सुरू असताना आपण तिच्याशी लाडेलाडे बोललेले तिला फार आवडते . मग तिला टॉवेल गुंडाळून बाहेर आणले की ती तिच्या आईला किंवा अर्जुनला सांगते की " आमचा फोटो काढा, फोटो " कारण एक खूप मोठे काम उरकून आम्ही दोघे बाहेर येतो ना!!
पुढे मग तिला लोशन लावणे , पावडर व गंध लावणे (ही कामे मी नाही करत, कारण मला ते अजिबात येत नाही असे बायकोचे मत ) यासाठी बायको कडे तिला सोपवले की माझे काम झाले .
आजकाल बऱ्याच घरांमध्ये नवरा बायको दोघांनीही घरातील बरीच कामे बरोबर मिळूनच करावी लागतात . पण तरीही ' ही कामे पुरुषांची नाहीतच ' असे समजून(किंवा घरातील समजुती/संस्कार इ मुळे असेल ) बरेच नवरे मंडळी अशा कामांपासून दूर राहतात .
मित्रानो शेवटची गंमत सांगतो . इतके सगळे करूनही (किंवा 'इतके सारे प्रयत्न करूनही ' असं म्हणूया) अयोध्याला अर्जुन जेव्हा विचारतो , " मने , तुला अंघोळ चांगली कोण घालते ? आई की बाबा ? " तेव्हा अयोध्या तिच्या आईचेच नाव घेते 😃😃
मुलांसाठी आई जे करते ते ते सर्व बापाने करायचा प्रयत्न करणे यातली मजा वेगळीच आहे . आपल्याला आई होता येणार नाही ,हे खरेच आहे पण हे केलेच पाहिजे , करून बघितले पाहिजे , कारण एकदा मुलं थोडी मोठी झाली की ' त्यांना झोपेतून उठवणे , त्यांना अंघोळ घालणे , त्यांना खाऊ घालणे ' हे परत कधीही करता येणार नाही , त्या आनंदाच्या डोहात परत कधीही डुंबता येणार नाही .
अगदी बरोबर! सुंदर लेख
ReplyDeleteखूपच छान लिहिले आहे. आपल्या मुलांचे लहानपण अनुभवणे , त्यांना मोठे होताना पहाणे खूपच आनंददायी आहे. हे वाचून मला माझ्या मुलाच्या लहानपणीचे दिवस आठवले. निखिल म्हणजे मुलाची शाळा सकाळची सात वजताची. मी त्याचा शाळेसाठी डबा करायची ,कारण शाळेत पोळी-भाजीच द्यावी लागायची आणि मग निखिल चे बाबांच त्याला उठवणे,दात घासून देणे , आंघोळ घालून शाळेचा गणवेश घालून रिक्षात नेऊन बसवणे हे सगळे करत.त
ReplyDeleteजुन्या आठवणीत रंगून जाताना ते मोरपिसाचे क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले.
ReplyDeleteहे सर्व मनाला उर्जा देणारे क्षण पुनपुनःप्रत्यय देवून गेले.सुख म्हणजे नक्की काय असते हो?
ReplyDelete