न्यूनगंड असल्याची दोन ठळक लक्षणे - हेमंत सांबरे
न्यूनगंड असल्याची दोन ठळक लक्षणे - हेमंत सांबरे
ही माझी निरीक्षणे आहेत , प्रत्येकाने सहमत व्हावे अशी अपेक्षा नाही .
न्यूनगंड ( Inferiority Complex ) असलेले लोक कसे ओळखावे यावर हा लेख आहे .
अशी बरीच लोकं आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्यात ही काही प्रसंगात न्यूनगंड असतो, तो आहे (न्यूनगंड ) असे ओळखण्यात आपण ही कमी पडतो . माझ्यात न्यूनगंड आहे हेच बऱ्याच वेळा आपण स्वतः ही सांगू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही .
माझे अनुभव व चिंतन यातून मी दोन ठळक लक्षणे शोधून काढली आहेत , ज्याद्वारे असे न्यून आपल्यात आहे हे सांगता येईल /ओळखता येईल .
न्यूनगंड आहे , हे ओळखण्यासाठी
लक्षण पहिले 👇
१. नवीन काही न शिकण्याची तयारी
"मला कुणी काही शिकविण्याची गरजच नाही "
"मला सगळे माहीत आहे" .
"मला कुणी काही सांगण्याची गरज नाही . "
अशी सगळी वाक्ये म्हणजे समजून जावे माझ्यात हा एक मोठा न्यूनगंड आहे . आपल्या आजूबाजूला बरेच काही सतत घडत असते , पण मी माझे डोळे, कान इ झाकून ठेवतो . माझे स्वतःचे आडाखे , निष्कर्ष ठरलेले आहेत , मी त्यावरून तसूभरही हलणार नाही . मी अजिबात लवचिक (Flexible ) राहणार नाही . समूहात असताना मी कुणाचेही ऐकून न घेता फक्त स्वतःचे म्हणणे रेटत राहणार . अर्धवट ज्ञानावर मी बोलत राहणार .
असा न्यूनगंड असणारे काही लोक हुशार ही असतात , पण जेव्हा टीम वर्क करायची वेळ येते तेव्हा त्यांचा प्रभाव कमी होत जातो . त्यांची हुशारी फक्त काही काळ प्रभाव पाडते , नंतर टीम मधील लोकांना असे लोक नकोसे वाटू लागतात .
स्वतःला न बदलण्यात अशा लोकांना फुशारकी वाटते . ' तुमचे म्हणणे मला पटले आहे ' ' माझी चूक झाली आहे ' इ मान्य करणे या प्रकारातील लोकांना खूप अवघड वाटते . आपण चूक मान्य केली तर आपले महत्त्व कमी होईल , असेही यांना अत्यंत प्रकर्षाने वाटते .
अशा प्रकारचे लोक दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेत नाहीत . ऐकले तरी आपले तेच खरे करणे त्यांना आवडते . न ऐकण्याच्या वृत्तीमुळे ते नवीन काही शकत नाही .
न्यूनगंड आहे , हे ओळखण्याचे दुसरे लक्षण 👇
२. सतत तुलना करणे ,द्वेष/असूया/राग या भावनांचा प्रभाव असणे
दुसऱ्याची संपत्ती , दुसऱ्याची हुशारी , दुसऱ्याची चांगली परिस्थिती किंवा अजून इतर काहीही याची तुलना या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची लोक करत राहतात . त्यामुळे ते सतत दुःखी असतात . त्यांना बहुधा कुणाचेही चांगले झाले तर खपत नाही .
असा न्यूनगंड असलेले लोक पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल सतत मनात राग बाळगून वावरतात . अमक्या तमक्या बरोबर झालेल्या वाद /भांडणातून तयार झालेले अगदी छोटे छोटे मुद्दे यांच्या लक्षात राहतात . असे मुद्दे लक्षात राहणे यातही त्यांना फुशारकी वाटते . त्यामुळे त्यांच्या मनातील राग सतत धुमसत राहतो .
अमका तमका व्यक्ती समोर आला तर माझे डोके सटकते असे त्यांना वाटते .
रागाच्या पुढची पायरी आहे द्वेष . या प्रकारचा न्यूनगंड असलेले लोक आपल्यापेक्षा इतरांकडे असलेल्या गोष्टींसाठी त्यांचा द्वेष ही करतात .
@ हेमंत सदाशिव सांबरे.
२३.०८.२०२३.
सहमत आहेत
ReplyDeleteबरोबर आहे
ReplyDelete