सुभेदार - शिवाजी - तान्हाजी यांच्या मैत्रीची अद्भुत कथा

सुभेदार - शिवाजी - तान्हाजी यांच्या मैत्रीची अद्भुत कथा - हेमंत सांबरे 

कालच रात्री सुभेदार बघायची संधी मिळाली . आणि लगेच त्यावर लिहलेच पाहिजे ,अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली . 
सध्या चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे . त्यामुळे एखादा  ऐतिहासिक कथेवरचा चित्रपट कसा बनवला गेला आहे याला खूप महत्त्व येते .
शिवराज अष्टक मालेतील दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा हा पाचवा चित्रपट !  या आधीच्या चारही चित्रपटांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे . दिगपाल हा अतिशय हुशार व अभ्यासू दिग्दर्शक , अभिनेता , लेखक आहे . त्याचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर असलेले निस्सीम प्रेम व भक्ती त्याचा चित्रपट बघितला की जाणवत राहते . 
 तान्हाजी , सिंहगड ही आपल्या सर्वांना परिचित असलेली कथा असली  तरी , दिगपाल ने अतिशय अचूक पद्धतीने "  तानाजी - शिवाजी यांच्यात असलेली अद्वितीय मैत्री"  हा कथेचा मुख्य धागा म्हणून आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे . पूर्ण चित्रात आपल्यासमोर या मैत्रीचे धागे उलगडत जातात . या दोघांचे एकमेकांशी असलेला स्नेह, त्यांचे प्रेम इ गोष्टींशी  प्रेक्षक म्हणून आपणही जोडले जातो . तान्हाजी शिवाजी मैत्री " यांची गोष्ट आपल्याला दिगपाल सांगत जातो .

दोन प्रसंग तर इतके उत्तम जमून आले आहेत की ,त्यावर लिहल्याशिवाय पुढे जाणे अशक्य आहे . 

पहिला प्रसंग राजे सन्यांसी वेशात राजगडी परत येतात तो ! इथे खरोखर दिग्दर्शक , चिन्मय मांडलेकर,  मृणाल कुलकर्णी यांनी कमाल केली आहे .
सदरेवर प्रवेश करताच संन्याशी वेशातील राजे रडू लागतात . मग जिजाऊ त्यांच्या जवळ जाऊन त्याचे सांत्वन करू लागतात , त्यावेळी जिजाऊंचे संन्याशा चे डोळे दिसतात व त्या त्याचे डोळे बघतच राहतात . जिजाऊ शिवबाला लगेच ओळखतात .  आई -मुलाची दीर्घ काळानंतर भेट होते . शिवबा आईचे चरण पकडतात व मातेचे  पवित्र चरण  अश्रूंनी भिजवून टाकतात . 
शेर शिवराज मध्ये शिवरायांचे पराक्रमी व कणखर रूप समोर आले तर सुभेदार मध्ये त्यांचे भावनिक व विलोभनीय असे  दर्शन घडते . 
 (माझ्या मते ) जुन्या काळातील चंद्रकांत यांच्या नंतर मला आवडलेले सगळ्यात उत्तम शिवराय चिन्मय मांडलेकर हेच आहेत . अष्टक मधील सर्व चित्रपट पूर्ण होईपर्यंत चिन्मय मांडलेकर यांनी शक्यतो दुसरी भूमिका करू नये असे मला वाटते . 


दुसरा प्रसंग म्हणजे  तानाजी ने बेल भंडार उचलून शपथ घेण्याचा प्रसंग !
शिवराय व जिजाऊ उंच आसना वर बसलेले आहेत . त्याखाली काही पायऱ्या आहेत . त्यातल्या एका पायरीवर बसून तान्हाजी तळमळीने विचारतो की या कोंढाणा मोहिमेतून मला दूर का ठेवले जात आहे ? सगळ्यांच्या अशा वागण्याने तान्हाजी दुखावला गेला आहे . इथेच या पायरीवर बसून आपला उजवा  हात वर करून तान्हाजी कोंढाणा परत स्वराज्यात आणून देण्याची शपथ घेतो. या चित्राची फ्रेम आपल्या सर्वांच्या मनात अगदी लहानपणापासून कोरली गेलेली आहे . विशेष म्हणजे कॅमेरा या ठिकाणी थोडावेळ  थांबतो व या प्रसंगाला परत एकदा आपल्या मनावर  कोरून मग पुढे जातो .
मराठी चित्रपट VFX तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबत आता मागे राहिलेला नाही .  चित्रपट बनवताना खर्च ही आता भरपूर केला जातो . शिवराज अष्टक मधील  चित्रपट अजून उत्तम उत्तम  होत जात आहेt . 

 मुघल हे कसे क्रूर होते हे अगदी जसेच्या तसे दाखवले आहे . चुकून मुघलांचे निशाण ओलांडले जाते म्हणून एका छोट्या  व निष्पाप बकरीची हत्या केली जाते व नंतर त्या छोट्या मुलाची ही आधी  उपाशी ठेवून व नंतर दगडाने ठेचून हत्या केली जाते . होय! मुघल असेच क्रूर होतें. ते जसेच्या तसे दाखविल्याबद्दल समाधान वाटले .  महिलांची कशा प्रकारे खुल्या बाजारात विक्री होत असे व त्यांच्यावर अतिशय अमानुष अत्याचार होत असत ते ही एका प्रसंगातून दाखवले आहे .

अजय पुरकर ने अतिशय दिमाखात तान्हाजी मालुसरे रंगविला आहे . तान्हाजी असाच असावा हे आपल्याला मनोमन पटत राहते . ही भूमिका करताना अजय पूरकर यांनी घेतलेली मेहनत आपल्याला जाणवत राहते . 
आता हिंदीत जो " तान्हाजी - The Unsung Warrior" आला होता त्याची तुलना करता अजय देवगण यांच्या पेक्षा अजय पूरकर यांनी रंगविलेला तान्हाजी सहज व नैसर्गिक वाटतो . हिंदीतला उदेभान राठोड (तोच तो सैफ अली खान) हा राजपूत वाटण्याऐवजी मुस्लिम जास्त वाटला . सुभेदार मधला उदेभान आलमगीर शी एकनिष्ठ असला तरी एका प्रसंगात तो शिवरायांचे कौतुक करतानाचां प्रसंग अतिशय उत्तम झाला आहे .
इतर उल्लेखनीय  असे म्हणजे स्मिता शेवाळे यांनी तान्हाजीच्या पत्नीची भूमिका अतिशय समरसून केली आहे .  दिगपाल स्वतः बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत रमला आहे व अतिशय चपखल रित्या ही भूमिका करत आहे  . अभिजित श्वेतचंद्र या नवीनच कलाकाराने सूर्याजी मालुसरे यांची भूमिका खूपच भारी केली आहे . 
एकूण हा अतिशय दमदार चित्रपट तीन तास आपल्याला अक्षरशः शिवकाळात घेऊन जातो . 
आपल्या नव्या पिढीला म्हणजे मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा . मी तर म्हणेल की अष्टक मधील सगळेच चित्रपट मुलांनी बघावेत . 
शेवटी दिगपाल लांजेकर व त्यांच्या टीमला अष्टकातील पुढच्या चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा!

@ हेमंत सदाशिव सांबरे 
०३.०९.२०२३ . 

Comments

  1. Excellent review

    ReplyDelete
  2. तुम्ही एवढ्या तळमळीने लिहिले आहे की अक्षरशः ते प्रसंग जिवंत झालेत
    सिनेमा बघावासा वाटतोय
    यातच सारे श्रेय सामावले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर