मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे?- हेमंत सांबरे
*मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे ?*
- हेमंत सांबरे
मरहट्टा=मराठा
जो मरेगा लेकीन हटेगा नहीं!
*लढाई करताना एकवेळ हा मृत्यू पत्करेल , पण मागे हटणार मात्र नाही .*
अशी ज्याची ख्याती सांगितली जाते तो म्हणजे *मराठा* !
पण शिवरायांच्या काळात व पुढे मराठ्यांनी जेव्हा ७५% भारत जिंकून जिकडे तिकडे आपली सत्ता स्थापन केली होती , तेव्हा उत्तरेकडे ' मराठा ' म्हणजे जो महाराष्ट्रातून उत्तरेत लढायला आला तो तो प्रत्येक सैनिक हा ' मराठा ' च समजला गेला . मग या सैनिकांत महाराष्ट्रातील सगळ्याच जातींचे सैनिक होते, त्यामुळे त्या अर्थाने लढाई करणारे सगळेच मराठा !
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अतिशय ज्वलंत बनलेला विषय म्हणजे , ' *मराठा आरक्षण* ' .
माझे अनेक मित्र याच समाजातील आहेत . शिवाय हे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय शांतपणे व शिस्तबध्द असे सुरू आहे . त्यामुळे माझ्या सारख्या कुंपणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीला खूपच उत्सुकता होती . म्हणून , मी सर्व मित्रांशी बोलायला सुरुवात केली , या विषयाच्या खोलात जाऊन मी अभ्यास करू लागलो .
इतर (मराठा नसलेले ) लोकांकडून येत असलेले आक्षेप , शंका अशा आहेत ,
* मराठा समाज सधन आहे , त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का ?
* आज आपण समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करत असताना , हे असे आरक्षण देऊन /घेऊन समाजात /हिंदूंमध्ये फूट पडेल का ?
* आर्थिक आधारावर आरक्षण का दिले जात नाही ? केवळ जातीच्या आधारावर आरक्षण देऊन प्रश्न सुटणार आहेत का ?
वाचकहो ! या सर्व अभ्यासात मी मला काही नवीन व अद्भुत शोध लागले आहेत .
इंग्रज भारतात आले , तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले काम कोणते केले तर त्यांनी भारतीय लोकांच्या हातातील शस्त्रे काढून घेतली . त्यामुळे साहजिकच मराठा ही जी लढवय्या जमात होती त्याचा पहिला रोजगार इंग्रजांनी हिरावून घेतला . इंग्रजांनी सैन्यात आपल्या विश्वासाचे गुरखा , व इतर जातींचे लोक भरायला सुरुवात केली . इंग्रज असताना किंवा त्याच काळात हा समाज शेतीकडे ओढला गेला . बारा बलुतेदार पद्धतीमध्ये हा समाज कुणबी - मराठा किंवा मराठा - कुणबी असा ओळखला जात होता . शेतीत पिकणारे विविध प्रकारचे धान्य, कडधान्य व इतर पिके करून ते व्यापाऱ्यांना विकणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय झाला .
*मग पुढे काय झाले?*
भारताला स्वातंत्र्य मिळून काही वर्षे होईपर्यंत मराठा समाजात एकत्र कुटुंब पद्धती होती . किंबहुना अगदी पन्नास ते शंभर माणसांची ही कुटुंबे एकत्र राहत . ही सर्व लोक फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून होती . तेव्हा एकत्र असल्याने शेतीचे क्षेत्र जास्त होते व त्यामुळे सगळ्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायचा . पुढे ही एकत्र कुटुंब व्यवस्था उध्वस्त होऊ लागली . त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला येणारे शेती क्षेत्र कमी कमी होऊ लागले . वाढती लोकसंख्या हे कमी होत जाणाऱ्या शेती क्षेत्राचे मुख्य कारण असावे . शिवाय नोकरी करण्यात वाटत असलेला कमीपणा , शेतीलाच चिटकून राहण्याची वृत्ती या गोष्टीमुळे नोकरी (खासगी वा सरकारी ) या क्षेत्रात इतर समाजानी आघाडी घेतली . वाढती लोकसंख्या , आधुनिक शेती आत्मसात न करता आल्याने घटते उत्पन्न हे एकाच काळात घडू लागले . बाहेर नोकऱ्या नाही , इकडे शेतीचे कमी उत्पन्न अशा दुहेरी कात्रीत हा समाज सापडला .
*राजकीय नेत्यांचा स्वार्थीपणा*
महाराष्ट्रात जर मराठा समाजाची संख्या जास्त आहे , तर साहजिक याच समाजाचे नेते दीर्घकाळ आमदार , खासदार म्हणून निवडून येत राहिले . म्हणजेच याच मराठा समाजाच्या जीवावर हे नेते , राजकारणी गडगंज श्रीमंत होत गेले . मराठा लोकांच्या मतांचा वापर करून , त्यांनी या समाजाला गृहीत धरून त्यांच्या भल्यासाठी काहीही केले नाही . यातल्या काही नेत्यांनी तर मराठा लोकांना वाऱ्यावर सोडून , दुसऱ्या धर्मातील लोकांचे मात्र लांगूलचालन केले . याच नेत्यांनी स्वतःच्या मतदार संघात मोठमोठे साखर कारखाने , शिक्षण संस्था इ काढल्या . याच संस्था , कारखाने इ मध्ये त्यांनी या लोकांना नोकऱ्या तर लावून दिल्या पण अगदी किरकोळ पगार देऊन ! हा पगार ही दर महिंन्याला न देता तीन महिने , सहा महिने असा रखडवून दिला जातो (आजही तेच चित्र आहे ) अगदी पिढ्या, दोन पिढ्या मराठा समाजातील तरुणांनी घरचा दुधाचा , शेतीचा व्यवसाय सांभाळून या साखर कारखाने , शिक्षण संस्था येथल्या नोकऱ्या ही केल्या . पण अलीकडच्या काळातील पिढी गाव सोडून बाहेर पडली . त्यांना बाहेरचे , शहरातील , परदेशातील विशाल जग माहीत झाले व त्यांना कळून चुकले की या आपल्याच नेत्यांनी आपल्या वाडवडील, पूर्वीच्या पिढ्यांना कसे फसवले .
हे शिकलेले तरुण वाचू लागले , बाहेरचे विस्तारित होत जाणारे जग उघड्या डोळ्यांनी बघू लागले . गेल्या वीस वर्षात तर मराठा समाजातील मुलीही मोठ्या प्रमाणात शिकून , मोठ्या कंपन्या ,खासगी क्षेत्र इ मध्ये नोकऱ्या ही करू लागल्या . पण तरीही शेतीवर अवलंबून असणारा वर्ग ही खूप संख्येचा अजूनही होताच . मुलींचा कल शहराकडे वाढल्याने , गावातील मराठा समाजातील मुलांची लग्ने जमायला खूप अडचणी येऊ लागल्या . मुलींना गावाकडे राहणे कमीपणाचे वाटू लागले (हा प्रॉब्लेम सगळ्याच जातींमध्ये आहे , पण आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असल्याने , मराठा समाजातील ही समस्या गंभीर आहे ) . आत्महत्या होण्याचे मुख्य कारण दीर्घकाळ लग्नच न होणे हे देखील आहे .
काही मराठा मित्रांनी व तरुणांनी एक वेगळीच माहिती दिली . जेव्हा हे मराठा तरुण आपली शासकीय कामे करून घ्यायला जातात , तेव्हा कागदपत्रे बघून त्यांची जात बघितली जाते व मुद्दाम त्यांची कामे एकतर उशिरा केली जातात किंवा त्यांच्याकडे ते काम करून देताना अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते ..अशावेळी आपली (म्हणजे मराठा समाजाची ) माणसे त्या प्रशासकीय पदांवर कुठेच नसणे किंवा खूप कमी असणे ही वेदना अजून ठसठसीत होते . अर्थात येथे वाचक म्हणतील की हे भ्रष्टाचार वा जातीयवाद ही मुख्य समस्या आहे , हे मराठा तरुण मान्य करतात पण ते म्हणतात की , आजवर कुणीही आम्हाला योग्य न्याय द्यायचा जर प्रयत्नच केला नाही , तर आम्ही त्याचा का विचार करू ? शेवटी आमची ही शासकीय कामे होणे महत्वाचे आहे की नाही ?
*भेद*
अलीकडे काही लोकांनी एक व्हिडिओ बघितला असेल ..
" एका मुलीचा बाप स्टेजवर येतो , अतिशय चिडून बोलतो ..त्याच्या स्वतःच्या मुलीला ९८% मार्क पडूनही तब्बल ₹ ६०००० फी भरावी लागली ...त्याचवेळी आरक्षण मिळत असलेल्या दुसऱ्या एका मुलीच्या बापाला फक्त ₹ ५००० फी भरावी लागते .. हा मराठा मुलीचा बाप अगदी कळवळून विचारतो की उत्पन्न नसताना आम्ही देखील इतकी फी कुठून भरायची ?? "
मग आर्थिक आधारावर आरक्षण असावे ही मागणी दीर्घकाळ आहेच ! शिवाय ही मागणी रास्त ही आहे .
एका मित्राने अगदी जवळचे उदाहरण सांगितले .. त्याच्या गावातील ! त्याच्या वडिलांचे एक मित्र आहेत , ते केंद्र सरकारच्या एका विभागात मोठ्या पदावर आहेत. तीस वर्षांपूर्वी आरक्षणाचा फायदा घेऊन हे गृहस्थ आज मोठ्या सरकारी पदावर आहेत . आता त्यांच्या मुलीनेही तशाच प्रकारे आरक्षणाचा फायदा घेत सरकारी नोकरी मिळवली आहे ... आता या केसमध्ये गडगंज पगार असलेल्या या गृहस्थाकडे पैसा असूनही त्यांनी आपल्या मुलीला केवळ आरक्षण आहे म्हणून मिळणाऱ्या सर्व सवलतींचा फायदा घेतला आहे .... त्याचवेळी उत्तम गुण मिळूनही मराठा समाजाची मुले/मुली मागे पडत आहेत .. ही सत्य परिस्थिती मला या मित्राने सांगितली व मी वाचकांपुढे ठेवली ..
कुठल्याही आमदार , खासदार , राजकीय नेता किंवा पक्ष यांच्या हातात आपली चळवळ न देता , मराठा समाजाने मनोज जरांगे सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपला नेता मानला आहे . लाखांच्या संख्येत पण अतिशय शांततेत होणाऱ्या सभा व मोर्चे यांनी भल्या भल्या नेत्यांची झोप उडवली आहे .
मी या प्रश्नाच्या खोलात गेलो ..तसतसे अनेक रहस्यं उलगडत आहेत व माझे ही गैरसमज दूर होत आहेत .
*मूळ मुद्दा* - बहुतेक मराठ्यांना असेच हवे आहे की ,
" सगळ्यांचे आरक्षणच काढून टाका , सगळ्यांना समान करून एकाच पातळीवर आणा "
पण जेव्हा असे लक्षात येते की कुठल्याही पक्षाचे सरकार येऊ देत ते सरकार किंवा तो बहुमताने ही निवडून दिलेला पक्ष ही आरक्षण नष्ट करण्याची हिंमत दाखवत नाही /दाखवणार नाही तेव्हा मग ,
" जर तुम्ही म्हणताय की त्यांच्या समाजात मागास लोक आहेत , म्हणूनच त्यांना गेली ६० वर्षे आरक्षण मिळतेय ना ( कदाचित आज त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे तरीही अजूनही मिळतच आहे ) , त्याचवेळी केवळ आमची जात ओपन कॅटेगरी मध्ये आहे म्हणून आजही आमच्यातील मागास प्रवर्गाला डावलले जात आहे , हे चूक आहे .
आर्थिक परिस्थिती मुळे आरक्षण मिळत नाही ना ,
मग जसे त्यांना मागास जात(फक्त जात मागास असे आपले संविधान म्हणते म्हणून ) आहे म्हणून मिळते आहे ना , मग आम्हाला ही द्या , आमच्यातील कित्येक जण मागासच आहेत . मग अगदी चांगले गुण मिळूनही, आमची योग्यता असूनही आम्ही मागेच राहतोय....
जेव्हा ही वेदना आपल्याला कळते, आपण समजून घेतो , तेव्हा पटू लागते की ,
" *होय ! मराठ्यांना ही आरक्षण हवेच हवे "*
(तळटीप - अनेक मराठा समाजातील मित्रांशी बोलून , त्यांचे अनुभव जाणून घेऊन त्यांची वेदना , त्यांचा आक्रोश मी माझ्या शब्दांत मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे , आपल्याला ही हा प्रयत्न आवडला असेल तर हा लेख पुढे पाठवत रहा )
© हेमंत सदाशिव सांबरे .
मराठयांनाच काय ?कोणालाही आरक्षण नकोच .
ReplyDeleteवास्तव माहिती लिहिली आहे तुम्ही. आता सगळेच समाज सुधारले आहेत, त्यामुळे गरज आहे आर्थिक निकषावर आरक्षणाची. ज्यांनी पिढ्यानपिढ्या राजकारण केलं त्यांना आरक्षणाची गरज नाही. या राजकारण्यानी समाजाला मागे ठेवलं त्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षणाची निश्चित गरज आहे. त्यामुळे मराठा समाजातील आमदार, खासदारांना अजिबात आरक्षण नको. मराठा समाजातील शेतकरी वर्गाला मात्र आरक्षणाची निश्चितच गरज आहे. आणि ते मिळालेच पाहिजे. एक मराठा लाख मराठा.
ReplyDelete