#गुरुजी नावाचा बाप - हेमंत सांबरे
#गुरुजी नावाचा बाप
- हेमंत सांबरे
सध्याच्या काळात जिथे मुले आपल्या वडिलांना पप्पा , डॅडी इ म्हणतात पण आम्ही आमच्या बापाला गुरुजी म्हणून हाक मारत असायचो .. तेव्हा बरीच आजूबाजूची इतर माणसे , मोठे वयस्कर लोक ज्या नावाने हाक मारायचे तेच नाव बहुधा घरातही रूढ व्हायचे ... माझे वडील म्हणजे श्री सदाशिव बापूराव सांबरे हे प्राथमिक शिक्षक होते ...त्यामुळे अख्खा गाव त्यांना गुरुजी म्हणायचं मग आम्ही त्यांची मुलंही त्यांना ' गुरुजी ' असंच म्हणू लागलो ...विशेष म्हणजे आमच्या आईने ही त्यात आम्ही काही बदल करावा म्हणून काही प्रयत्न केले नाहीत (निदान मला तरी आठवत नाही ) .
त्या काळात ह्या गुरुजी लोकांना तसा कमीच पगार असायचा (१९७० चां काळ) .. आमचे गुरुजींनी (इथूनपुढे मी गुरुजी म्हणूनच उल्लेख करतो )तेव्हा संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे नोकरी सुरू केली होती . गुरुजी स्वतः दहावीला असताना इंग्लिश विषयात ३ वेळा फेल झाले होते व पण पुढे त्यांनी डी एड पूर्ण केलें. आमचे मूळ गाव उंबरी बाळापूर हे झरेकाठी पासून साधारण ६-७ किलोमीटर वर आहे . गुरुजींना नोकरी लागली तेव्हा त्यांचा पहिला पगार रू २७०/- असा आसपास होता . माझ्या वडिलांना एकूण तीन भाऊ व एक बहिण अशी ती पाच भावंडे होती . आमचे आजोबा भिक्षुकी व शेती असं दोन्ही करायचे .म्हणजे घरची स्थिती खूप गरिबीची नसली तरी खूप श्रीमंतीची अशी ही नव्हती . बहुधा गुरुजी व त्यांचे मोठे भाऊ दादा (आमचे मोठे काका ) यांना सरकारी नोकरी लागल्याने काही वर्षांत यात बदल होऊ लागला होता .
गुरुजींचे व माझ्या आईचे लग्न जसे त्या काळात व्हायचे तसे ठरवून असेच झाले . माझ्या आईला खरंतर लग्न करून शहरात जायची इच्छा होती , पण तसे झाले नाही . सांसरिक अर्थाने माझ्या आईचे व गुरुजींचे फार कधी पटले नाही , त्यांचे विचार जुळत नसायचे . त्यांचे विचार जुळत नसले तरी त्यांच्यात प्रेम होते , असे मला आज मागे वळून पाहताना जाणवते . कारण त्यांनी संसाराचा गाडा हाकण्यासाठी एकत्र मिळून अनेक छोटे - मोठे त्याग सहज करत राहिले . त्यावेळी प्रेम असे उघड व्यक्त करण्याची पद्धत नसल्याने, बऱ्याचदा भांडणातून ही प्रेमाचे नवनवे आयाम बाहेर येत राहिले . तेव्हाही किंवा आजही असे म्हटले जाते की जे नवरा बायको भांडत नाही , तर कदाचित त्यांच्यात प्रेमही नसते ..
गुरुजी अत्यंत काटकसरी स्वभावाचे होते , तर आईला मात्र वाटायचे की योग्य ठिकाणी खर्च हा केलाच पाहिजे . पैसे कसे खर्च केले पाहिजे यावर तीव्र मतभेद असायचे . पण आमचे गुरुजी हट्टी स्वभावाचे असल्याने असल्या निर्णय प्रक्रियेत विजय त्यांचाच व्हायचा . त्यामुळे आम्हा मुलांना ही वाटायचे की बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून निसटून गेल्या .. पण आज मी ही दोन मुलांचा बाप झालो आहे , माझ्या पत्नीच्या मदतीने संसार हाकत आहेत , तर आज गुरूजींचे निर्णय कदाचित त्या काळाला अनुसरून बरोबरच होते , असे वाटू लागले आहे .. कारण आज पैसे कमावताना ते वाचवणे किती अवघड असते हे आम्हाला समजू लागले आहे .
गुरुजींना सिगारेटचे व्यसन होते . अर्थात त्यावेळी गावाकडे तंबाखू , सिगारेट , बिडी इ चे व्यसन असणे , ही अगदी साहजिक गोष्ट असायची . संगतीचा परिणाम असेल म्हणून त्यांना सिगारेट प्यायची सवय लागली असेल . मला एक प्रसंग अजूनही आठवतो , आम्ही आशवी या गावात राहत असताना गुरुजी मला सिगारेट आणायला टपरीवर पाठवायचे . एकदा हे आईला कळले तेव्हा त्या दोघांचे खूप जबरदस्त भांडण झाले . त्यानंतर मात्र गुरुजींनी कधीही मला टपरीवर पाठवले नाही .
गुरुजींच्या या सिगारेटचा अजून एक किस्सा आहे . वयाच्या ,४३ व्या वर्षी त्यांना विषमज्वर या आजाराचा त्रास झाला , तेव्हा डॉ नी सांगितले म्हणून त्यांनी जी सिगारेट सोडली ते अगदी मृत्यू होईपर्यंत त्यांनी सिगारेटला परत हात लावला नाही . मला तरी हा त्यांच्यातील एक गुणविशेष वाटतो , कारण मध्यम वयात एखादे व्यसन सोडणे इतके सोपे नक्कीच नव्हते .
त्यांच्या वागण्यात एक अतिशय दुर्मिळ असा तऱ्हेवाईकपणा होता. त्यांचे स्वतःचे राहणीमान खूपच साधे असल्याने , शिवाय त्यात काटकसरी स्वभाव त्यामुळे त्यांना पैशाची कधीही कमी पडली नाही , त्यांनी आम्हा मुलांना ही पैसा कधी कमी पडू दिला नाही . आमचे शिक्षण व्यवस्थित व्हावे यासाठी त्यांनी पैसा सढळ वापरला . आमच्या कितीतरी नातेवाईकांना त्यांनी पैसा व इतर स्वरूपात सतत मदत केली . पण गुरुजींचे बोलणे अतिशय तुसडे असायचे , पटकन कुणालाही ते घालून - पाडून बोलतील की काय याचा भरवसा नसायचा . त्यामुळे गुरुजींनी ज्यांना मदत केली , त्यांना मात्र परतफेड न करताही सहज त्यांच्याशी परत व्यवहार करता यायचा .. त्यामुळे मदत वगैरे प्रकरण नेहमीच एकतर्फी चालायचे , एकतर्फी राहायचे .. याचे कारण मला आज असे वाटते की आमच्या गुरुजींना फक्त निरपेक्ष मदत करायची इच्छा असायची , त्यात त्यांचा स्वार्थ वा परतफेडीची अपेक्षा अशी नसायची. त्यामुळे गोड बोलून आपलेही काम समोरच्या कडून साधून घ्यायचे असते हे त्यांना आयुष्यभर कळले नाही . आपले बोलणे फटकळ असले तरी , त्या त्या मदत घेणाऱ्या व्यक्तीने ते सहन केलेच पाहिजे असे मात्र गुरुजींना वाटायचे , हे ही खरे ! त्या अर्थाने त्यांना जगाचा व्यवहार कळत नव्हता ,असे मला वाटते . आज असे वाटते की त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळी होती , पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना ते फारसे समजून घेता आले नाही . हा स्वभाव इतका जगावेगळा होता की , बऱ्याचदा आम्ही मुले ही त्यांना समजून घेण्यात कमी पडलो . कारण या सगळ्याची दुसरी बाजू अशीही होती की गुरुजी स्वतः कुठलीही मजा मारत नसायचे , अंगावर त्यांनी कधीही असे उंची कपडे कधी घातले नाही, जुनीच चप्पल सतत शिवून वापरायचे ; पण दुसऱ्यांना मदत म्हणून पैसे देताना त्यांच्यातील उदार व्यक्ती बाहेर यायचा . मला असे वाटते की लहानपणापासून अनुभव घेतलेली गरिबी , घरातील विचित्र वातावरण या सगळ्यांचा एकत्रित असा परिणाम गुरुजींच्या व्यक्तिमत्व व स्वभाव यावर झाला असावा . आपल्याला जो पैशाचा अभाव गरिबीमुळे झाला , तो इतरांना होऊ नये असा मदत करताना त्यांचा विचार असावा .
गुरुजींनी आयुष्यभर फक्त सायकल वर प्रवास केला . लहानपणी शेतात देखील त्यांनी खूप कामे केली . त्यामुळे त्यांची शरीरयष्टी मजबूत अशीच होती . दुचाकी शिकण्याचा त्यांचा किस्सा माझ्याशी सबंधित आहे . झरेकाठीला असताना त्यांच्या काही मित्रांनी त्यांना दुचाकी शिकवायला सुरू केले . पण एके दिवशी गुरुजी गाडी शिकत असताना मी त्या गाडीच्या मागे पळायला लागलो , त्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटून ते खाली पडले व त्यांना लागले . या प्रसंगानंतर त्यांच्या मनात कदाचित भीती बसल्याने त्यांनी कधीही गाडी शिकली नाही .
झरेकाठी हे त्यांच्या नोकरीचे गाव तसे छोटे गाव होते , पण गावातील सर्व लोक मनाने खूप चांगली होती , माणुसकी जपणारी होती .. या गावाने गुरुजींना , आम्हा मुलांना , माझ्या आईला खूप खूप प्रेम दिले .. गुरुजींनी ही येथल्या शाळेला खूप काही दिले .. झरेकाठी सोडताना मी खूप लहान होतो , पण माझा भाऊ सुहास कडे या गावच्या खूप आठवणी आहेत . आमच्या भाऊला हे गाव सोडताना नक्कीच खूप वाईट वाटले होते , तसेच गुरुजींना ही वाटले होते .
गुरुजींनी पुढे उंबरी पासून थोडे पुढे असलेल्या भुसाळवस्ती येथे उरलेली नोकरी पूर्ण केली . म्हणजे एकूण आयुष्यात रिटायर होईतो त्यांनी झरेकाठी व भुसाळवस्ती अशा दोन ठिकाणी त्यांची नोकरी पूर्ण केली.
श्रावण महिन्यात त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेण्याचा नियम कधीही चुकवला नाही . त्यांचा स्वभाव धार्मिक असला तरी त्यांनी फार कर्मकांडे कधी केली नाहीत . माझ्या वाचनाच्या आवडीत गुरुजींचा वाटा खूप मोठा होता . त्यांनी पुस्तके विकत घेण्यासाठी सतत मला पैसे काढून दिले . त्यांना मी परीक्षेत चांगले मार्क मिळवत असल्याचा खूप अभिमान होता .
मी इंजिनियरिंग करत असतानाची एक आठवण आहे . आमचे लोणी गावातील इंजिनियरिंग कॉलेज बस स्टँड पासून तीन किलोमिटर दूर होते . पण तरीही गुरुजी बऱ्याचदा माझा आईने करून दिलेला डबा घेऊन किंवा मला पैसे द्यायला म्हणून तीन किलोमिटर पायी चालत यायचे . मला हे आजही आठवले की डोळ्यात पाणी येते.
घरात कुठलीही नवीन वस्तू घेताना , गुरुजींचा सुरुवातीला विरोध असायचा . पुढे आम्ही मुले मोठी झाल्यावर काही निर्णय स्वतः घेऊ लागलो . पण तरीही विनाकारण पैसे खर्च होऊ नये असे त्यांना वाटायचे . मी इंजिनियरिंगला असताना गुरुजींनी टू व्हीलर घेऊन दिली . सुरुवातीला बरेच दिवस गुरुजी या गाडीवर बसलेच नाहीत , पण नंतर मात्र ते आमच्याबरोबर ठिकठिकाणी गाडीवर येत असत .
सगळ्या खर्चाचा हिशोब ठेवणे ही त्यांची सवय होती . त्या हिशोबाने त्यांच्या अनेक वह्या व पाने भरलेली असायची . अगदी तारखेनुसार , वेळ टाकून कुणाला किती पैसे दिले हे त्यांच्याकडे अचूक लिहलेले असायचे . त्यामुळे व्यवहार करताना त्यांना कुणी फसवणे ही अशक्य गोष्ट असायची .
"स्वतः बाप झाल्याशिवाय बापाचे महत्त्व समजत नाही " , असे एक वाक्य आहे. जे यथार्थपणे खरे आहे . मी बाप झालो नव्हतो तेव्हा मला गुरुजींची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायची , पण बाप झाल्यावर कदाचित त्यांना समंजून घेणे मला सोपे झाले .
गुरुजींचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला . (२० नोव्हेंबर २०२१ ) त्या आधी कोरोनाच्या काळात ते दोनदा आजारी पडले , त्यात त्यांना खूप त्रास झाला .
अशा या माझ्या वडिलांना म्हणजे गुरुजींना त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून लेखणी ठेवतो .
© हेमंत सदाशिव सांबरे
फारच ह्रदयद्रावक
ReplyDeleteवडिलांच्या आठवणी आणि व्यक्त झालेल्या भावना खूप छान
ReplyDeleteछान आठवणी त्यांचे आशिर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी कायम रहातील. शुभेच्छुक नितीन मुळीक.
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete🙏
ReplyDeleteव्यक्तिचित्रण सुंदर
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे. आवडलं. 🙏❤️
ReplyDelete