बधाई हो ! - हिंदी चित्रपट समीक्षा - हेमंत सांबरे
बधाई हो !
सहज सुंदर अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध झालेला आयुष्मान खुराणा माझा आवडता अभिनेता आहे . हटके चित्रपट करून ते हिट करणारा ही अभिनेता म्हणून तो प्रसिद्ध आहे .
परवाच त्याचा " बधाई हो !" हा अप्रतिम सिनेमा दुसऱ्यांदा बघितला (आधी थेटर मध्ये बघितला होता आता OTT वर बघितला ) .
यातला नकुल कौशिक (आयुष्मान ) बहुधा कुठल्यातरी IT कंपनी मध्ये नोकरी करत असतो . तिथेच त्याला त्याची प्रेयसी रीनी शर्मा भेटते .
या चित्रपटाची कथा शंतनु श्रीवास्तव , ज्योती कपूर ,अक्षत घिडीयाल या तिघांनी मिळून लिहली असून पटकथा संवाद - अक्षत घिडीयाल तर अमित शर्मा दिग्दर्शक आहे .
एका सरळ रेषेत चालणाऱ्या कुटुंबाच्या घरात एक जगावेगळी घटना घडते व त्याने नकुलचे आयुष्य कसे u turn घेते यावर अतिशय अफलातून भाष्य करत ही कथा पुढे सरकत राहते .
नकुलची आई (म्हणजे निना गुप्ता ) उतार वयात गरोदर राहते, त्यामुळे घडणाऱ्या गमती जमती सांगत , हलके फुलके विनोद करत , खुसखुशीत सवांदांची पेरणी करत हा चित्रपट आपले निखळ मनोरंजन करतो .
ज्या आपल्या मुलाचे लग्न ठरवून आता त्यालाच मुल झाले पाहिजे (म्हणजे आपल्याला नातू झाला पाहिजे ) असे वाटण्याच्या वयात, आपल्यालाच आता परत मूल होणार हे कळल्यावर लाजेने काळा-ठिक्कर पडलेल्या व घरात दबून वावरणाऱ्या बापाची /नवऱ्याची भूमिका गजेंद्र राव यांनी अतिशय भारी केली आहे .
कितीतरी प्रसंग इतके भारी जमून आले आहेत . काही प्रसंगात आपण गालातल्या गालात हसतो , काही ठिकाणी आपल्याला हसू आवरत नाही तर काही ठिकाणी आपल्याला हसू दाबून ठेवायची वेळ येते .
त्यांच्या घरातील एक लग्न असते . त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना ही good news आता माहीत झालेलीच असते . अशावेळी नकुल व त्याचा भाऊ लाज वाटत असल्याने या लग्नाला जातच नाहीत . पण गजेंद्र व नीना गुप्ता दोघेही जातात व थोडेसे लाजतच वावरत असतात ... तेव्हा एक प्रसंग फार भारी आहे .. त्यांचा एक नातेवाईक नात्यातील एका मुलाला लग्नाला दोन वर्षे होऊनही मूलबाळ होत नसते , तर तो गजेंद्रला त्या मुलाला काही सल्ला /शिकवण द्यायला सुचवतो . तेव्हाचा गजेंद्र राव चा अभिनय बघण्यासारखा आहे . सुरुवातीला त्याला कळत नाही , 'मी सल्ला द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे ?', मग त्याला एक महत्वाची गोष्ट आतून कळते , तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावातून तो स्वतःच कसा सुखावतो हे त्याने खूप अप्रतिम असे दाखवले आहे (म्हणजे बघा इतक्या तरुण मुलांना देखील मूलबाळ होत नाही , मी मात्र या वयात देखील करून दाखवले हा स्वतःचा अहंकार सुखावणारे भाव😜😜 ) .
नकुल उतार वयात आपली आई गरोदर असल्याने खूपच तोंड लपवत फिरत असतो . त्याच्या लहान भावाचीही अवस्था तीच असते . नकुलच्या आजीची भूमिका सुरेखा सिक्री ने केली आहे . ही अभिनेत्री ही कमाल आहे . आपली सून गरोदर असल्याचे कळल्यावर ती आपला मुलगा व सून यांच्याशी बोलताना इतकी तुफान बॅटिंग करते की आपली हसून हसून मुरकुंडी वळते .
या प्रसंगात ह्या म्हातारीचा एक संवाद बघा ,
ती मुलाला म्हणजे गजेंद्र ला उद्देशून म्हणते ,
" मैं नकुल को तो जोक मे बोल रही थी की , तेरे बालक के साथ खेलू फिर बाद मे मैं मर जाऊ, तेरी औरत ने तो seriously ले ली मेरी बात ! सबसे पहले मुझे ये बता की टाईम कब मिला तेरे को ये सब करने को ? मेरे साथ दो पल बात करो बोलती थी ,तो तेरे को टाइम नही है ऐसे बोलता था ! "
असे अनेक खुसखुशीत संवाद ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे .
पुढे लग्नाच्या प्रसंगात जेव्हा नीना गुप्ताच्या जावा तिला नावे ठेवत असतात तेव्हा हीच म्हातारी आपल्या सुनेची बाजू घेऊन तिच्या बाजूने ठाम उभी राहते , तो प्रसंग ही खूप छान जमला आहे .. सतत आपल्याला घालून पाडून बोलणारी सासू योग्य वेळ आल्यावर आपल्या बाजूने उभी राहिलेली बघून नीना गुप्ता च्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहताना दिसतात .
रीनाची आई बोलत असताना , चुकून नकुल तिला ऐकतो . तेव्हा त्याला realize होते की , आपण आपली आई गरोदर असल्याने उगाच embrass होतोय . तेव्हा मग तो आपल्या parents ला साथ देण्याचे ठरवतो . इथे कथा एक जबरदस्त टर्न घेते . यावेळी सगळे एकत्र येऊन होणाऱ्या बाळाचे आनंदाने स्वागत करण्याचे ठरवतात . आपल्याला प्रेक्षक म्हणून ही, नकुलचे रीनाशी ब्रेकअप करून आपल्या फॅमिली बरोबर ठाम उभे राहण्याचा निर्णय पटतो.
अर्थात नंतरचा चित्रपट छोटे मोठे भावूक प्रसंग दाखवत एक आनंदी शेवट दाखवत संपतो .
आयुष्मान खुराणाचां सशक्त अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान असेल , पण या चित्रपटाचा पहिला नायक नकुलचा बाप गजेंद्र राव , दुसरा नायक या चित्रपटाचे खुसखुशीत संवाद आहे.
हिंदी मध्ये पूर्वी जे विनोदी चित्रपट म्हणून आपल्याला दाखवले जायचे , ते म्हणजे एक प्रकारे आपल्या सारख्या सुजाण प्रेक्षकांची चेष्टा केली गेली होती (काही अपवाद ). पण हा चित्रपट म्हणजे खऱ्या अर्थाने विनोदी चित्रपट असून , अडीच तास आपले निखळ मनोरंजन करतो , म्हणून नक्की पाहा !
© हेमंत सदाशिव सांबरे
९९२२९९२३७० .
Comments
Post a Comment