एक भाकर , तीन चुली - पुस्तक परीक्षण - लेखन - हेमंत सांबरे
सध्या थोडी तब्येत बरी नसल्याने , घरीच असल्याने वेळ मिळतोय तो हे पुस्तक तीनच दिवसांत झपाट्याने वाचून काढले .
केवळ महिनाभरात तीन आवृत्त्या प्रकाशित होत , हे पुस्तक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणार आहे , त्यामुळे वाचण्याची उत्सुकता होतीच ..
आपल्यातील बहुतेकांचे बालपण , नंतरचे आयुष्य, अतिशय सुरळीत , सुखात जर गेलेले असेल तर हे पुस्तक वाचून तुमची गात्र न गात्र थरारून उठतील , तुम्ही स्वतःच्या संकटाला कधीही संकट म्हणणार नाही ... इतके कष्ट , इतका अपमान , इतकी अवहेलना असे सारे काही वाट्याला येऊनही पारू (या पुस्तकाची नायिका ) फक्त पुढे पुढे चालतच राहते .. स्वतः अडाणी , निरक्षर असूनही आपल्या मुलाला शिकवायची जिद्द आपल्याला थक्क करून सोडते ..
रूढी ,परंपरा , अंधश्रद्धा , अज्ञान यामुळे कशा प्रकारे आयुष्याची फरफट होत राहते , याचे जिवंत चित्रण या कादंबरीत पाहायला मिळते . जगाच्या पाठीवर प्रत्येक धर्मात , जाती मध्ये रूढी , अंधश्रद्धा इ मुळे सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर तो स्त्रियांचा झाला आहे .
या कथेची नायिका पारू परिस्थिती पुढे हार मानत नाही . आत्महत्या करण्याचा ही विचार तिच्या मनाला कधी शिवत नाही . ती फक्त लढत राहते . रोजची लढाई रोज लढते , पूर्ण ताकदीने लढते . वयाच्या दहाव्या वर्षी लग्न होते , लगेच महिनाभरात वैधव्य येते . मग सुरू होते आयुष्याची अविरत फरफट ...दुसऱ्या लग्नाने थोडे सुख प्राप्त होते ना होते तिथेही भाऊबंदकी आडवी येते . मग अकारण केल्या गेलेल्या बदनामीने तिला ते ही घर सोडावे लागते ..
लेखकाने हे पुस्तक नोकरी सांभाळून नंतर उरलेल्या वेळात तब्बल साडे -आठसे तास वेळ देऊन लिहले आहे ...आपण पुस्तक वाचताना ही लेखकाचे हे झपाटलेपण आपल्याला ही लक्षात येते .. सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असते , असे म्हणतात .. ते हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर जाणवत राहते .. स्वतःच्या मुलाला स्वाभिमान , प्रामाणिकपणा , निर्व्यसनी राहणे इ शिकवताना पारूची धडपड आपल्याला स्तिमित करून सोडते . हा कादंबरीचा काळ १९४० ते १९९३ पर्यंतचा आहे . या काळात आपला भारत सर्वत्र गरिबी , कमी शिक्षण , सततची भांडणे या सर्व चुकीच्या गोष्टींनी वेढलेला होता . त्याचे प्रतिबिंब आपल्याला या पुस्तकात बघायला मिळते .
तिसऱ्या लग्नात नवरा चांगल्या स्वभावाचा मिळतो पण त्याचाही अकाली मृत्यू होतो . गरिबी म्हणजे काय असते याचे भयंकर वर्णन आपल्याला वाचायला मिळते .
हे पुस्तक मराठी साहित्य विश्वात खळबळ उडवून देणार आहे हे नक्की ! लोक वाचत नाही , हा आरोप खोटा आहे . चांगले दिले की लोक विकत घेऊन वाचतात , हे या पुस्तकाने सिद्ध केले आहे .
आजच्या काळातील मुलांनी, तरुणांनी तर हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे , हे वाचून आपल्या स्वतःच्या आई बापाचे महत्त्व त्यांना नक्कीच लक्षात येईल .
एका ठिकाणी लेखक स्वतः गरीब असूनही पण तो विशिष्ट जातीचा नसल्याने , मागासवर्गीय नसल्याने, त्याला हुशार असूनही इतर मुलांना मिळत असलेले फायदे मिळत नाही . इथे आपणास आरक्षण हे आर्थिक आधारावर का दिले पाहिजे याचे महत्त्व कळते .
हे पुस्तक प्रत्यक्ष लेखकाची कथा असल्याने प्रत्येक वाक्य , प्रत्येक शब्द उस्फूर्तपणे , आर्ततेने लेखणीतून बाहेर पडला आहे . लेखणीतून शब्द बाहेर पडत नाही तर जाळातून ठिणग्या बाहेर पडावे तसे शब्द बाहेर पडतात . या ठिणग्या वाचकाच्या हृदयाला भेदून जातात , मनावर व्रण उमटवत जातात .
लेखक सातवी पास झाल्यावर , पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी निघतो , या ठिकाणी ही कादंबरी संपली आहे . त्यामुळे या कादंबरीचा पुढचा भाग ही लिहण्याचे लेखकाच्या मनात असेल अशी आशा आहे .
कुणी कुणी हे पुस्तक वाचलेच पाहिजे ? त्याची यादी 👇👇
* ज्या कुणाला असे वाटते की , आपल्या आयुष्यात सगळे काही संपले आहे त्यांनी ..
* जे कोण आत्महत्या करून अनमोल असे आयुष्य संपविण्याचा विचार करत असतील त्यांनी ...
* ज्यांना असे वाटते की आपल्या आई बापाने आपल्यासाठी काहीच केले नाही , अशा सगळ्यांनी ...
* ज्यांना शिक्षणाची किंमत कळत नाही , अशा सगळ्यांनी ...
* ज्यांना मुबलक पैसा असूनही त्या पैशाची योग्य किंमत कळत नाही अशा सगळ्यांनी ...
* खरा संघर्ष काय असतो हे ज्यांना जाणून घ्यायचे असेल अशा सगळ्यांनी ...
असे हे अद्भुत पुस्तक प्रत्येक मराठी वाचकाने वाचलेच पाहिजे , व इतरांना सांगितले पाहिजे .
@ हेमंत सांबरे
२४.०२.२०२४.
खूप योग्य रितीने मांडले आहेत
ReplyDeleteवाचायची इच्छा उत्पन्न झाली,इतकं सुंदर लिहीलय
ReplyDelete