वैष्णव - लेखक - वि वा शिरवाडकर - कादंबरी - पुस्तक परीक्षण - हेमंत सांबरे

#पुस्तक नाव - वैष्णव 
#लेखक - वि वा शिरवाडकर
#प्रकार - कादंबरी

'दुर्मिळ पुस्तके' नावाचे फेसबुकवर एक पेज आहे ..  त्यांच्याकडून ही " वैष्णव " नावाची कुसुमाग्रज लिखित ही छोटेखानी कादंबरी मागवली होती .  पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गांधींचे चित्र आहे .. आधी मला वाटले की खुद्द गांधींच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक असावे . पण वाचायला सुरुवात केली व विषय समजला .

बरेच दिवस माझ्या पुस्तकांच्या कपाटात हे पुस्तक तसेच पडून होते , परवा सहज चाळायला सुरुवात केली तर ,त्यातल्या भाषेने मला इतकं खिळवून ठेवले की कादंबरी वाचूनच पूर्ण केली . 

या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की , फक्त आणि फक्त मराठी भाषेचा वापर ! ही मराठी देखील अगदी अभिजात . 
कथेचा कालावधी आहे १९३५ ते १९४२ . त्यावेळी घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी घेऊन , त्याभोवती काल्पनिक पात्रांची गुंफण लेखकाने केली आहे .
विनायकराव नावाचे प्राथमिक शिक्षक या कादंबरीचे नायक आहेत . सुरुवातीला त्यांचा स्वभाव अतिशय भित्रा व बुळा असतो . कोणीही काहीही बोलले तरी गुपचूप मान खाली घालून ऐकून घेणे , काहीही उत्तर न देता सहन करणे असा त्यांचा स्वभाव असतो . मुरारवाडी नावाच्या अतिशय छोट्या खेड्यात ही कथा घडत जाते . पुढे गांधीजी यांचे सच्चे अनुयायी असलेले एक प्रवचनकार मालोजी महाराज गावात येतात . हे महाराज त्यांच्या अतिशय प्रभावी भाषेत आयुष्य न घाबरता व स्वाभिमानाने कसे जगावे यावर समजून सांगतात . त्यानंतर नायकाच्या आयुष्यात चमत्कार होतो . त्यांचा छळ करणारे एक सहशिक्षक आबासाहेब म्हणून असतात , हे आबासाहेब विनायकराव यांची वरिष्ठांकडे  बदनामी करत असतात . एकदा वरिष्ठ शाळेत आले असताना , विनायकरावांवर  विनाकारण आरोप केले जातात तेव्हा स्वतः विनायकराव मालोजी महाराज यांची शिकवण आठवून बाणेदारपणे उत्तर देतात , त्यांची जागा दाखवून देतात व सरळ नोकरीवर लाथ मारून नोकरी सोडून देतात .

कथानायक पुढे नोकरीच्या शोधात मुंबईला जातो . पण त्याच वेळी तिथे १९४२ चे सुप्रसिद्ध ' चले जाव ' आंदोलन सुरू होते . तेथील मैदानावर जी भव्य सभा होते , त्यानंतर ब्रिटिश लगेच महत्वाच्या सर्व नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबतात .. सामान्य जनता मात्र आंदोलन सुरूच ठेवते . विनायकराव मुंबई येथील मित्र पोलिसांच्या गोळीबारात बळी पडतो .. मग त्यापासून प्रेरणा घेऊन विनायकराव आपल्या गावी परत येऊन स्वातंत्र्याचे आंदोलन उभे करतात . ही अतिशय रोमहर्षक कहाणी विवा शिरवाडकर यांच्या समर्थ लेखणीतून आपल्यापुढे येते . 

कथेचा शेवट ही खूप अद्भुत असा आहे . विनायकराव व त्यांचे मित्र रंभाजी स्वतःचे मुरारवाडी गाव तर स्वतंत्र करतात पण तालुक्याचे गाव ही ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करतात . तिथल्या पोलीस चौकीतील शस्त्रे लुटून , त्यांच्या बरोबरच्या उत्साही तरुणांच्या मदतीने तात्पुरती सेना ही उभी करतात . या सगळ्या घडामोडीत ब्रिटिश हे बंड मोडून काढण्यासाठी , लष्कराची एक तुकडी पाठवतात . लष्कर आल्यावर सुरुवातीला उत्साह दाखवणारे बरेच तरुण विनायकराव व रंभाजी यांची साथ सोडून माघार घेतात . अंतिम चकमकीत रंभाजी गावातील त्यांच्या फितूर शत्रूला मारतो व स्वतःही पोलिसांच्या गोळीला बळी पडतो .. विनायकराव यांना अटक होते .. इथे कादंबरी संपते .. 

हे पुस्तक सध्या out of print आहे . पण अतिशय भारी कादंबरी आहे .. 

आता अलीकडे आपण खूप चर्चा करत असलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकातील कथेतून ही बाहेर येतात जसे ,

१ . ही 'चले जाव ' चळवळ अजिबात अहिंसेच्या मार्गाने गेली नव्हती . किंबहुना घडलेल्या घटनांवरून जनतेने तिला उलट हिंसकच बनवले होते .. म्हणजेच प्रत्यक्ष गांधी असताना ही अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असा विश्वास तत्कालीन गांधींचे अनुयायी म्हणविणाऱ्या लोकांना ही वाटत नव्हता , असे स्पष्ट दिसते .

२ . स्वतःला गांधींचे अनुयायी म्हणविणाऱ्या मालोजी महाराजांनी जशास तसे वागण्याचा सल्ला देतात .  एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करा , असा सल्ला ते बिलकुल ही देत नाही . 

३ . या गावात आंदोलन करणारे लोक पोलीस चौकी लुटून तेथली शस्त्रे ही ताब्यात घेतात . ही कुठली अहिंसा होती ? 

४ . मुख्य नेत्यांना ब्रिटिशांनी लगेच अटक केली . त्यामुळे त्यांच्या मागे झालेल्या या आंदोलनात जनता दिशाहीन झाली होती .. त्यामुळे केवळ सहा महिन्यांच्या आत हे आंदोलन दडपण्यात आले होते . 
यावरून सिद्ध होते की नेतृत्वहीन असलेले हे आंदोलन पूर्णपणे अयशस्वी झाले होते .

कुसुमाग्रज हे कथेच्या समकालीन लेखक होते . त्यामुळे तेव्हा खरोखर आजूबाजूला जे घडताना त्यांनी पाहिले होते , तेच कादंबरीत उतरले आहे . 
बाकी कादंबरी खूप उत्कृष्ट आहे . वाचताना प्रवाही रीतीने मांडणी केल्याने ,वाचतच रहावेसे वाटते . 

गांधींचे चित्र मुखपृष्ठावर आहे . गांधींचे अनुयायी असलेले नायक , त्याचे मार्गदर्शक मात्र गांधीच्या शिकवणुकीचा विरुध्द वागताना दिसतात , कारण व्यवहारात ही शिकवण निरुपयोगी आहे हे त्यांनाही माहीत असते . 

आजही भारतात, अगदी अजूनही आपल्याला मात्र गांधीजी कसे महान होते , किती थोर महात्मा होते हे का शिकवले जाते , ते माझ्या अल्पबुद्धीला समजत नाही . गंमत म्हणजे या गांधीजींची कुठलीही शिकवण व्यवहारात कोणीही पाळू शकत नसूनही त्यांना महान म्हणन्यात अनेकांना कुठली ' महानता ' वाटते ? 
असो , गांधींची महानता सांगणारी कादंबरी वाचताना या गोष्टी समोर आल्या व मी तुम्हा वाचकांना सांगून टाकल्या .. 
तुम्हाला काय वाटते ? ते ही सांगा ! 

© हेमंत सांबरे 
14-03-2024

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर