" वीर सावरकर "दशकांवरील धूळ झटकणारा चित्रपट
एखादा विषय अत्यंत क्लिष्ट आहे , त्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश व त्यांचे वेगवेगळे घटक असतात तेव्हा तो विषय अगदी सहज हाताळला जात नाही. परिणामी त्यावर हळूहळू धूळ चढत जाते अन् तो विषय इतिहासजमा होतो की काय अशी शंका उपस्थित होते. पण वेळीच त्यावरील धूळ झटकली गेली तर तो विषय पुन्हा पुढे येतो. ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा चित्रपट काहीसा असाच आहे. चित्रपट केवळ सावरकरांचा आहे हे म्हणणं काहीसं चुकीचं ठरेल कारण चापेकर बंधू , वासुदेव बळवंत फडके , लोकमान्य टिळक , अनंत कान्हेरे याच चित्रपटातून संपूर्ण देशभरात बघितले जाणार आहेत. क्रांतिकारक हे भारतीय स्वातंत्र्याचे असे पान आहे जे थोडेसे गुंतागुंतीचे आहे पण त्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. ते पान अतिशय व्यवस्थित रित्या उलगडून दिग्दर्शकाने आपल्या समोर ठेवले आहे. त्यावरील दशकांची धूळ आता बाजूला झाली आहे. जर तुम्ही केवळ एका व्यक्तिरेखेला बघण्यासाठी जात असाल तर तुम्हाला आश्चर्याचा हा सुखद धक्का बसू शकेल इतकं नक्की.
चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव तर पूर्ण चित्रपट धरावा लागेल इतकं हे शिवधनुष्य रणदीप ने लीलया पेललं आहे. सावरकरांची विदेशी कपड्यांची होळी , लंडन मधील क्रांतीपर्व , अंदमान पर्व , रत्नागिरी व हिंदुमहासभा पर्व ह्या सगळ्या विषयांना चित्रपट स्पर्श करतो. या दरम्यान कुठेही चित्रपट अडकून राहिल्यासारखा वाटत नाही. काही ठिकाणी संथ असला तरी कथानकाची गरज म्हणूनच वाटतो. गांधी व सावरकर ह्यांच्या विचारांतील फरक इथे दाखवण्याचा काहीसा प्रयत्न केलेला आहे पण चित्रपट नायकाचा कुठेही उदोउदो केलेला दिसत नाही. भारताची फाळणी रोखण्यासाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न व नेहरु, जिन्ना व गांधी यांच्या तत्कालीन मतांचा योग्य तो आढावा घेण्यात कथानकाला यश आले आहे. सावरकरांना झालेली १९५० सालची अटक ह्या घटनेचा समावेश सुधीर फडके यांच्या चित्रपटात नव्हता तोही इथे घेतलेला आहे हे विशेष.
चित्रपटातील उणीव सांगायची झाली तर सावरकरांच्या कवितांचा पुरेपूर उपयोग केला गेला नाही हे जाणवत आहे. अनादी मी अनंत मी , मला देवाचे दर्शन घेऊ द्या , जयोस्तुते या गीतांचा कुठेतरी समावेश व्हायला हवा होता. परंतु कदाचित कथानकाच्या विस्तारभयास्तव हे टाळण्यात आलं असावं.
एखादा इतिहासपट काढताना कायमच एकाच व्यक्तिमत्त्वाभोवती सतत फिरत बसावं लागतं. अनेकदा त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा त्याहून पुढे जायच्या पात्र असूनही उपेक्षित राहतात तसे इथे होताना दिसत नाही. हा एक चित्रपट टिळक , चापेकर यांच्यापासून धिंग्रा , कान्हेरे , भगतसिंग , श्यामजी कृष्ण वर्मा , मादाम कामा , व्ही.व्ही.एस.अय्यर इत्यादी सगळ्यांची कहाणी आपल्याला सांगून जातोय. काही ऐतिहासिक पात्रांची हतबलता अतिशय योग्य पद्धतीने हाताळण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. व्यक्तिरेखा देखील तितक्याच प्रभावी जमल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. बाळाराव सावरकर यांच्या भूमिकेला अजून न्याय मिळायला हवा असं मात्र मनापासून जाणवलं.
रणदीप हुडा याचे दिग्दर्शन थोडेसे नवखे आहे व ते काहीसे जाणवते. अमित सयाल यांनी बाबाराव सावरकरांची भूमिका त्यांनी अप्रतिम साकारली आहे. हा चित्रपट असा पहिलाच प्रयत्न असावा जो पूर्ण देशभर क्रांतिकारकांचा इतिहास सांगेल. हा चित्रपट सर्वांनी जरुर बघावा असाच आहे .
-सुमेध श्रीवर्धन बागाईतकर
+91 70306 30292
चित्रपट : स्वातंत्र्यवीर सावरकर
दिग्दर्शक : रणदीप हुडा
Really thanks for review
ReplyDeleteछान विश्लेषण
ReplyDelete